Video : आईशी संवाद : लहान मुलांमधील उलट्या

Children
Children

लहान मुलांमध्‍ये उलट्या वयाच्‍या पहिल्‍या दिवसापासून सुरू होतात. उलट्या खऱ्या अर्थाने पाचवीलाच पुजलेल्‍या असतात, असे म्‍हणायला हरकत नाही. पन्‍नास टक्‍के बालकांना लहानपणी उलट्यांचा त्रास होतो. उलट्या कुठल्‍या आजाराचे लक्षण आहे, की त्‍या नॉर्मल आहेत हे ओळखण्याचे बालरोग तज्ज्ञांसमोर आव्हानच असते. म्‍हणून उलट्यांविषयी आईकडून योग्‍य माहिती मिळवणे आवश्‍यक असते. 

पहिल्‍या वर्षात बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्‍त दूध पाजल्‍याने किंवा अन्‍न खाऊ घातल्‍याने उलट्या होऊ शकतात. त्‍यामुळे बाळ दूध किंवा अन्‍न मागते म्‍हणजे त्‍यासाठी रडू लागते तेव्‍हाच त्याला पाजावे अथवा भरवावे. पन्‍नास टक्‍के लहान मुले पहिल्‍या वर्षापर्यंत दिवसातून एकदा तरी उलटी करतात. बाळाचे वजन योग्‍यरीत्‍या वाढत असल्यास या उलट्या नॉर्मल समजल्‍या जातात. त्‍यासाठी कुठल्‍याही उपचारांची गरज नसते. या उलट्यांमुळे वजन कमी होऊ लागल्यास त्‍यासाठी उलटी व अॅसिडिटी कमी करणारी औषधे द्यावी लागतात. त्‍याबरोबरीने बाळाला मान व डोके झोपण्‍याच्‍या आसनापासून पंचे‍चाळीस डिग्रीवर करून व शरीर डाव्‍या अंगावर कलते ठेवावे. पातळ अन्‍नापेक्षा घट्ट अन्‍न खाऊ घातल्‍याने, एकावेळी जास्‍त खाऊ घालण्‍यापेक्षा कमी अंतराने व जास्‍त वेळा खाऊ घातल्‍यास उलट्या आटोक्यात येतात. 

लहान मुलांनाही अॅसिडिटीमुळे उलट्या होऊ शकतात. अशा वेळी उलटीतून पिवळे पाणी पडते. या बालकांना अॅसिडिटी कमी करणाऱ्या औषधांबरोबरच आहारामध्‍येही काही बदल करावे लागतात. पहिल्‍या वर्षामध्‍ये सतत होणाऱ्या उलट्या जंतुसंसर्गाचे किंवा लघवीच्‍या इन्फेक्‍शनचे लक्षण असू शकते. सतत व प्रत्‍येक वेळी पाजल्‍यावर उलटी होणे, हे लक्षण कुठलातरी आजार असल्‍याचे दर्शवते. वयाच्‍या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणाऱ्या व सतत चालणाऱ्या उलट्या या पोट व आतड्यांमध्‍ये अडथळा दर्शवतात. या उलट्यांमुळे बाळ बारीक होत जाते व त्‍याच्‍या शरीरातील पाण्‍याची पातळी घसरते. तिसऱ्या आठवड्यात अचानक सुरू झालेल्‍या व प्रत्‍येकवेळी पाजल्‍यावर होणाऱ्या उलट्यांकडे दुर्लक्ष करू नये. आतड्यांमध्‍ये अडथळा असल्‍यास हिरव्‍या रंगाच्‍या उलट्या होतात. त्‍याबरोबर पोटातही दुखून येते. 

उलट्या या बऱ्याचदा गॅस्ट्रो म्‍हणजे जुलाबाची सुरुवात असू शकतात. अशा वेळी उलट्यांबरोबर ताप येतो व उलट्या, जुलाबांमुळे शरीरातील पाण्‍याची पातळी घसरते. काविळीची सुरुवातही उलट्यांनीच होते. काविळीच्या उलट्यांबरोबर डोळे पिवळे दिसू लागतात, लघवी पिवळी होते व भूक कमी होते. अॅपेंडिक्‍सच्‍या इन्फेक्‍शनमध्‍येही उलट्या होतात. पण यात पोटाच्‍या उजव्‍या व खालच्‍या बाजूला तीव्र वेदना होतात. मेंदूज्‍वर व मेंदूतील इतर जंतुसंसर्गांमुळे मेंदूभोवतीचे प्रेशर वाढले की उलट्या होतात.

या उलट्या जबरदस्‍त वेगाने होतात. बहुतांश उलट्या नॉर्मल असल्‍या तरी त्‍या काही वेळा आजारांचे लक्षणही असू शकतात. त्‍यासाठी उलट्यांबरोबर कुठलीही लक्षणे असल्‍यास काळजी घ्‍यावी व आजार ओळखावा. हे ज्ञान आईला असणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com