वुमन हेल्थ : गरोदरपणातली गुंतागुंत

Pregnant-Women
Pregnant-Women

माता किंवा गर्भ किंवा दोघांनाही गरोदरपणाच्या काळात किंवा जन्माच्या वेळी गुंतागुंतीचा धोका उद्भवतो. अशा स्थितीला ‘हाय रिस्क प्रेग्नन्सी’ म्हणतात. अशा स्थितीचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून व्यवस्थापन केले जाते, ज्यामुळे चांगले परिणाम दिसून येऊ शकतात. गरोदरपणाच्या आधी उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजाराचा वैद्यकीय इतिहास, आधीच्या गर्भधारणेवेळेस उद्‍भवलेली गुंतागुंत किंवा गरोदरपणात उद्भवलेल्या स्थिती ‘हाय रिस्क प्रेग्नन्सी’ला कारणीभूत ठरू शकतात. याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी व चांगले परिणाम दिसून येण्यासाठी लवकर निदान होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी जागरुकता वाढवणे महत्त्वाचे ठरेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

1) मातेचे वय
गर्भवती स्त्रीचे वय कमी असेल (१८ पेक्षा कमी), तर माता आणि बाळ या दोघांसाठी धोकादायक ठरू शकते. २० ते २४ वर्षे वयोगटातील महिलांपेक्षा कमी वयाच्या महिलांना एक्लॅम्पसिया, प्युर्पेरल एंडोमेट्रायटिस आणि सिस्टिमिक  इन्फेक्शन्सची उच्च जोखीम असते. नवजात बालकाचे वजन कमी असणे, मुदतीपूर्व प्रसुती आणि नवजात बालकांमध्ये गुंतागुंत अशा गंभीर अवस्थेचा धोका निर्माण होऊ शकतो, तर दुसरीकडे मातेचे वय ३५ पेक्षा जास्त असेल, तर गर्भाच्या वाढीस अडथळे निर्माण होणे, सिझेरियनची जोखीम, मुदतपूर्व जन्म, जन्मजात दोष, गरोदरपणात मधुमेह, उच्च रक्तदाब, प्रीक्लेम्पसिया यासारख्या विविध  गुंतागुंतीची जोखमी असतात. 

2) गरोदरपणाच्या आधी असलेले आजार 
गरोदरपणाआधी उच्च रक्तदाब, मधुमेह, लैंगिक आजार, मूत्रपिंडाचे आजार, स्वयंप्रतिकार रोग (ऑटोईम्युन), थायरॉईड यांसारखे आजार असतील, तर माता आणि नवजात बालकांमध्ये गुंतागुंत होण्याची जोखीम असू शकते. 

3) गरोदरपणात उद्‍भवलेली वैद्यकीय स्थिती 
गरोदरपणात मधुमेह, गर्भाशयातील गुंतागुंत- उदाहरणार्थ, प्लासेंटा प्रिव्हिया, पॉलीहायड्रॅमनिऑस (स्वरक्षणात्मक द्रव प्रमाणाबाहेर जमा होणे) अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्यास जोखीम वाढते. 

4) लठ्ठपणा 
लठ्ठपणामुळे  गर्भधारणेच्या चांगल्या परिणामांवर विपरीत प्रभाव पडू शकतो. 

5) चुकीची जीवनशैली
मद्यपान, तंबाखू, धूम्रपान सेवन यामुळे गर्भाची जोखीम वाढू शकते. मुदतपूर्व जन्म, जन्मजात दोष, किंवा बाळाच्या आरोग्याला धोका उद्‍भवू शकतो. 

हाय रिस्क प्रेग्नन्सी टाळण्यासाठी जागरुक राहणे गरजेचे आहे. आपल्याला कुठले आजार आधीपासून असतील, तर गरोदर होण्याचा निर्णय घेण्याआधी आपल्या डॉक्टरांशी संवाद साधा. ते आपल्याला औषधांचे प्रमाण कमी-जास्त करून देऊ शकतात; तसेच संभाव्य  जोखमींबाबत सांगू शकतात. त्यानंतर गरोदरपणाच्या काळात नियमित देखरेखीकरिता विविध तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच धूम्रपान, मद्यपानासारख्या चुकीच्या सवयी कटाक्षाने टाळा. 

हाय रिस्क प्रेगन्सीचे निदान करण्यासाठी डॉक्टर तुमच्या वैद्यकीय इतिहासाची सखोल माहिती घेतील. तुमची सध्याची वैद्यकीय स्थिती बघता अल्ट्रासाउंड चाचणी, विविध लॅब चाचण्यांसाठी सल्ला देतील. योग्य वेळेस संभाव्य जोखीमांचे निदान झाल्यास याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करता येते. प्रारंभिक आणि नियमित प्रसुतीपूर्व काळजीमुळे अनेक स्त्रियांना निरोगी प्रसुतीस मदत होते. हे सगळे करत असताना आपल्या मानसिक आरोग्याकडेदेखील दुर्लक्ष करू नये. हा काळ एक आनंददायी प्रवासासारखा असतो आणि यासाठी सर्व कुटुंबाने एकत्रितरित्या भागीदारी करत हा आनंद द्विगुणित करणे गरजेचे आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com