वुमन हेल्थ : गरोदरपणात हे लक्षात ठेवायलाच हवं

Pregnency
Pregnency

स्त्रीच्या गरोदरपणात साधारणपणे थायरॉइड ग्रंथी आणि हार्मोन्समध्ये बदल नैसर्गिकरीत्या होत असतात. या बदलांचा गर्भाच्या वाढीवर परिणाम होत असतो. त्यामुळे गरोदरपणातील थायरॉइडचे आजार व तपासणीबाबत जागरूक असणे आवश्यक आहे. हायपरथायरॉइडीजम तुलनेने कमी आढळतो. मात्र यामध्ये जास्त जोखीम असते. हायपोथायरॉइडीझम आयोडिनच्या कमतरतेमुळे होऊ शकते. महिलांमध्ये हायपोथायरॉइडीझम आढळण्याची इतरही कारणे आहेत, ज्यामध्ये चुकीची जीवनशैली, ताणतणाव यांचा समावेश आहे.

गरोदरपणात बीटा एचसीजी, प्रोजेस्ट्रॉन आणि ईस्ट्रोजन या तीन हार्मोन्सची निर्मिती होते. एचसीजी व ईस्ट्रोजन हे हार्मोन्स हे थॉयरॉइडच्या हार्मोनसारखे कार्य करतात. यांची पातळी जास्त असते, तेव्हा टी ३ व टी ४ हार्मोनची पातळीदेखील वाढते. मात्र, या हार्मोनचे सहाय्य कमी झाले, तर टी ३ व टी ४ हार्मोनची पातळी कमी होते आणि त्यामुळे टीएसएचची पातळी आपोआप वाढते. अशा परिस्थितीला ‘हायपोथायरॉइडीझम’ म्हणतो. असे झाल्यास औषधे दिली जाऊ शकतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गरोदरपणात प्रत्येक तीन महिन्यात थॉयराइडची पातळी तपासण्यास सांगितले जाते. इतर वेळी प्रत्येक सहा महिन्याने ही पातळी तपासावी. प्रसूती होईपर्यंत ही औषधे घ्यावी लागतात आणि त्यापुढेही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. चांगली जीवनशैली असल्यास औषधे कमी किंवा बंद करण्याचा सल्लादेखील दिला जाऊ शकतो.

हायपरथायरॉडिझम तुलनेने कमी आढळत असले, तरी हे आढळल्यास याचे दुष्परिणाम उच्च जोखमीचे असतात. अशा स्थितीत कधीकधी हदयाचे ठोके इतके वाढतात, की गुंतागुंत होऊन हदय निकामी होण्याचा धोका बळावू शकतो. त्याला ‘थायरॉईड स्टॉर्म’ म्हणतात. याशिवाय मुदतपूर्व प्रसूती, गर्भपात अशा गुंतागुंतीचा धोकादेखील बळावू शकतो. त्यामुळे वेळेवर निदान व उपचार महत्त्वाचे ठरतात. हायपोथायरॉइडीझमचे व्यवस्थापन औषधोपचाराने होऊ शकते. मात्र, वेळीच औषधोपचार न केल्यास जन्मजात दोष, मानसिक दुर्बलता अशा अनेक दुष्परिणामांचा धोका बळावू शकतो. औषधोपचार घेऊन हा आजार व्यवस्थित नियंत्रणात ठेवला, तर बाळावर कोणताही परिणाम होत नाही. तुम्हाला थायरॉईड असेल, तर याचा अर्थ तुमच्या बाळाला थायरॉइड होईल असे नाही. फक्त बाळामधील टीएसएचची पातळी जन्मानंतर चार महिन्यांनी तपासून घ्यावी.

लक्षणे
हायपोथायरॉइडीझम 

आळस येणे, कामातील गती मंदावणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, प्रमाणाबाहेर वजन वाढणे व बद्धकोष्ठता.

हायपरथायरॉइडीझम 
छातीचे ठोके वाढणे, वजन घटणे, अतिरिक्त चिंता करणे, जुलाब होणे, अतिसार.

जीवनशैलीत सुधारणा
गरोदरपणात आहार आणि जीवनशैली या दोन्हींचा समतोल साधल्यास थायरॉइडच्या समस्येवर नियंत्रण ठेवता येते. नियमित व्यायाम आणि उपयुक्त पदार्थांचे सेवन यामुळे मातेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. गरोदरपणात ब्रोकोली, कोबी किंवा फ्लॉवरसारख्या भाज्या टाळा. गरोदरपणात मातेने ग्रीन टी, हर्बल टी, एग व्हाइट, काकडी, गाजराचा समावेश असलेले सॅलड अशा ‘ई’ व ‘क’ जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन आवश्यक आहे. याबरोबरच प्रक्रिया न केलेली धान्ये (होल ग्रेन व्हीट/राइस), कॉडलिव्हर ऑइल, कोकोनट ऑइल, ओमेगा ३, ओमेगा ६ फॅटी अ‍ॅसिडसयुक्त पदार्थ हे पदार्थ अवश्य खावेत. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com