रंगसंवाद : लॉकडाउनमधील 'निसर्गचित्र'

महेंद्र सुके
Sunday, 26 April 2020

निसर्ग हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग. त्यामुळे निसर्गाची जोपासणा माणसाचे कर्तव्य, मात्र अलीकडच्या काळात माणसाने स्वार्थासाठी निसर्गावरच प्रहार करून, पर्यावरणाचा ऱ्हास केला. महानगरानजीकचे जल, जंगल आणि जमिनीवर अतिक्रमण करून मानवाने सिमेंटचे जंगल उभारले.

निसर्ग हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग. त्यामुळे निसर्गाची जोपासणा माणसाचे कर्तव्य, मात्र अलीकडच्या काळात माणसाने स्वार्थासाठी निसर्गावरच प्रहार करून, पर्यावरणाचा ऱ्हास केला. महानगरानजीकचे जल, जंगल आणि जमिनीवर अतिक्रमण करून मानवाने सिमेंटचे जंगल उभारले.

त्यामुळे झुळझुळ वाहणाऱ्या नदी-नाल्यांच्या प्रवाहाचे स्वातंत्र्य धोक्‍यातच नव्हे; तर नष्ट होत गेले. झाडे, झुडपे, जंगल, डोंगर-दऱ्यांत मुक्तपणे संचार करणारे पशुपक्ष्यांचे जगणे मर्यादित झाले. हे अतिक्रमण वाढत असतानाच शहरानजीक वाढणाऱ्या प्रदूषणात निसर्गवैभव हरवत चालले होते.

गेल्या काही दिवसांपासून जगभरातील सर्व देशांमध्ये हैदोस घालणाऱ्या कोरोनामुळे भारतातही ‘लॉकडाउन''ची घोषणा झाली. त्यामुळे माणसांनी स्वत:ला घरातच कोंडून घेतले. शहरांत धावणाऱ्या वाहनांचा आवाज कमी झाला. वायूप्रदूषणात घट झाली. त्यामुळे या नीरव शांततेत पक्ष्यांचा किलबिलाट माणसांचे मन मोहित करणारे ठरले. त्याच्या बातम्याही आता माध्यमांत झळकू लागल्या आहेत. निसर्गात झालेला बदल चित्रकारांना दिसला नसता, तरच नवल. या बदलत्या निसर्गाची जाणीव झालेले जलरंगात निसर्ग रेखाटणारे चित्रकार म्हणजे ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्‍यातील टेमघर पाड्यात राहणारे रंगलेखक संतोष भोईर.

लॉकडाउनच्या काळात सकाळची नीरव शांतता, पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट, मोरांचा केकारव, त्यांचे विलोभनीय दर्शन संतोष यांनी टिपले. या सर्वांच्या सानिध्यात ते रमले.

माणसाने निसर्गाचे शोषणच केले, वैयक्तिक स्वार्थासाठी ओरबाडले, निसर्गाच्या विरोधात जाऊन आपला स्वार्थ साधला त्यांनाच घरात कोंडून निसर्ग स्वत:चे शुद्धिकरण करत असल्याचे रंगलेखक संतोष भोईर यांना वाटते. लॉकडाउनचा सकारात्मक विचार करून त्यांनी या रिकाम्या वेळेचा उपयोग करून निसर्गाचे नवे रूप आपल्या चित्रांमध्ये रेखाटले आहे. हा निसर्ग साकारताना मनाला समाधान मिळाल्याचे ते सांगतात. सृष्टीतील सर्व सजीव माणूस, प्राणी, वनस्पती, किटक, सर्व एका कुटुंबासारखे राहल्यास निसर्गाचा होणारा कोप सजीवसृष्टीला आणि मानवाला कधीही सहन करावा लागणार नाही. त्यासाठी आपण निसर्गाच्या विरोधात जाणे थांबविले पाहिजे, अशी भावना संतोष लॉकडाउन काळात रेखाटलेल्या निसर्गचित्राच्या माध्यमातून व्यक्त करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article mahendra suke on Nature picture in lockdown