डेली सोप : अग्गंबाई सासूबाई : सासू असावी तर अशी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 March 2020

सासू म्हणजे ‘सारख्या सूचना,’ असं म्हटल जातं. दूरचित्रवाहिनीवरील सासू-सुनांची भांडणं आणि त्यांच्यामध्ये पिसणारे सासरे आणि मुलगा ही कथा प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही. पण, ‘झी मराठी’ वाहिनीवर एक मालिका अशी सुरू झाली; ज्यातून एक वेगळी सासू प्रेक्षकांच्या भेटीस आली. सासू ही सुनेची मैत्रीण पण बनू शकते, हे या मालिकेतून पाहायला मिळतंय. ही मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई’. ही मालिका दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. 

सासू म्हणजे ‘सारख्या सूचना,’ असं म्हटल जातं. दूरचित्रवाहिनीवरील सासू-सुनांची भांडणं आणि त्यांच्यामध्ये पिसणारे सासरे आणि मुलगा ही कथा प्रेक्षकांसाठी काही नवीन नाही. पण, ‘झी मराठी’ वाहिनीवर एक मालिका अशी सुरू झाली; ज्यातून एक वेगळी सासू प्रेक्षकांच्या भेटीस आली. सासू ही सुनेची मैत्रीण पण बनू शकते, हे या मालिकेतून पाहायला मिळतंय. ही मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई’. ही मालिका दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या मालिकेतील प्रेमळ आसावरी (निवेदिता सराफ), उतारवयात सासूचा विचार करून तिचं लग्न लावून देणारी आणि तिच्या पाठी खंबीरपणे उभी राहणारी तिची सून शुभ्रा (तेजस्वी प्रधान), प्रत्येक पावलावर आसावरीची साथ देणारा तिचा नवरा अभिजित राजे (गिरीश ओक), सुनेला मुलीप्रमाणं वागवणारे सासरे आणि अतिलाडानं बिघडलेला बबड्या म्हणजेच सोहम (आशुतोष पत्की) या सर्व व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. आयुष्याच्या वाटेवर जेव्हा साथीदार अर्ध्यावर सोडून जातो, आपल्यापुढं उभं आयुष्य पडलेलं असतं तेव्हा बाई स्वतःला विसरून तिच्या कुटुंबाप्रति असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात स्वतःला झोकून देते. तिचा एकटेपणा हा समाजाला दिसत नाही. या मालिकेतून शुभ्रा आपल्या सासूबाईंचा एकटेपणा समजून, त्यांचं अभिजित राजेंवर असलेलं प्रेम समजून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्या दोघांचं लग्न लावून देते. या मालिकेमुळं समाजाचा दृष्टिकोन बदलला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 
शुभ्रानं अभिजित आणि आसावरी यांचं लग्न लावून दिलं खरं; पण सोहमला ते काही पटलं नाही. आसावरी आणि अभिजिताला वेगळं करण्याचा सोहम अटोकाट प्रयत्न करतोय.

त्याच्या अशा वागण्यामुळं शुभ्रा आणि त्याच्यामध्ये अनेक खटके उडत आहेत. मुलाची प्रत्येक गोष्ट ऐकणारी आसावरी सोहमनं शुभ्रावर हात उगारल्यावर त्याला कानाखाली मारायलाही मागंपुढं पाहत नाही. आसावरीचं हे कठोर रूप सोहमला वठणीवर आणणार का, आसावरी आणि अभिजितच नातं सोहम मान्य करणार की त्यांना वेगळं करण्यासाठी प्रज्ञासोबत मिळून अजून काही वेगळी योजना करणार, याची रंजक कहाणी दिग्दर्शक अजय मयेकर यांनी मालिकेच्या माध्यमातून रंगविली आहे. 

मालिकांमधून समाजप्रबोधन होतं, मालिकांचा प्रभाव काही प्रमाणात सर्वसामान्यांच्या आयुष्यात पडतो, असं म्हणायला हरकत नाही. या मालिकेनं मुलाच्या भूमिकेतून एक आदर्श मुलगा बनण्यासाठी कसं वागू नये, याचं उदाहरण दिलं आहे. तसेच आजची सून जी नोकरी करून घर सांभाळते, नाती जोडते आणि वेळप्रसंगी चूक करणाऱ्यांना धडाही शिकवते, अशी उत्तम व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. ‘सासू’ या व्यक्तिरेखेची प्रतिमाच या मालिकेनं बदलली आहे. तसेच उतारवयातील एक प्रेमकथा, नात्यांची बांधणी ही गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी लिहिलेले उत्तम आणि प्रभावी संवाद हे सगळंच सादर करण्यात ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेची टीम यशस्वी ठरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on mother in law