वुमनहूड : चला घर घर खेळूया...

Radhika-Deshpande
Radhika-Deshpande

माझ्याबरोबर थोडा वेळ आठवणींच्या गुहेत शिरताय? थोडं मागं जाऊया. मला आठवतंय, तुम्हाला आठवतंय का? घरातल्या चार भिंतींच्या आत, एखादा कोपरा शोधायचा किंवा लोखंडी पलंगाच्या खाली घर घर खेळायचं, आपला संसार थाटायचा. त्यासाठी लागणारी सोनसळी, पितळी खेळभांडी, केनच्या टोपलीतून काढायची. चार मैत्रिणींना गोळा करायचं, स्वयंपाकासाठी लागणारा खाऊ आईला मागून घ्यायचा.

फोटोत दिसतो आहे तो माझा बाहुला सोबत असायचाच. कोणी आई-बाबा, तर कोणी बहीण-भाऊ व्हायचो. शृंगार रस सोडून सगळे रस त्या दोन तासांत यायचे. किती गोष्टी मैत्रिणीला सांगायच्या असत. आपण खूप गरीब आहोत आणि आपल्याकडं काहीच खायला नाही, असं काही ठरलं की आजी अचानक जागी व्हायची आणि म्हणायची, ‘‘भिकेचे डोहाळे लागतील असं काही खेळायचं नाही. तुम्हाला काय खाऊ हवा आहे ते सांगा, आत्ता आणून देते.’’ असे खेळ आम्ही खेळलो नाही, कारण अशी कल्पना करून खेळायला गेल्यावर आजी जादूसारखी जागी व्हायची. आपण एखाद्या मोठ्या संकटात अडकलो आहोत आणि मग आमच्यातलाच एक शूरवीर (मीच) त्या श्र्वापदांचा नाश करायचा. आम्ही त्यातून सुखरूप बाहेर पडायचो. कितीही आपत्तीतून जावं लागलं, तरी सुख, समाधान आणि आनंद यानेच खेळ संपायचा. 

आमचं जग ५ बाय ५च्या जागेत सामावून जायचं. मुरमुरे, गूळ, शेंगदाणे, साखर आणि सुरईतलं थंडगार पाणी एवढ्यानेच आमचं पोट भरायचं. एक चादर, एक उशी, एक चटई, छत्री आणि आईची ओढणी एवढ्या वस्तूंनी आम्ही आमचं घर बांधलेलं असायचं. घराचा पत्ता मात्र बदलत राहायचा. कधी आमच्या घराच्या लगोलग आमराईची बाग असायची, कधी आमचं घर नदीकाठी असायचं. आमच्या कल्पनाशक्तीला थारा नसायचा आणि स्वप्नांना कुठलेही बांध नसायचे. कितीही संकट आलं तरी चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघण्याजोगा असायचा. आम्ही एकमेकांच्या ताटातले मुरमुरे, शेंगदाणे मोजत खाल्ले असतील, पण कधीही कशाची कमतरता भासली नाही. त्या इवल्याशा खेळभांड्यांनी आणि घरातल्या त्या कोपऱ्यातल्या वास्तुपुरुषानं मनाची श्रीमंती मिळवून दिली. आज संध्याकाळी मला माझी जुनी पेटी सापडली. त्यात दरवळणारा गंध, ते हळवे क्षण, मोहरून टाकणाऱ्या आठवणी आहेत. डोळे बंद करून घेतले आणि मला मी फुग्याच्या बाह्यांचा फ्रॉक घालून आंबे तोडताना दिसले. सोनसळी वाटीतून खोटा खोटा रस पिताना दिसले, पण चव खरीखुरी जाणवते आहे आजही!

आता थोडं आठवणींच्या गुहेतून बाहेर येऊ या. आज मी घरीच आहे, माझ्या घरी घर-घर खेळत. तुम्हीही तुमच्या घरीच आहात म्हटल्यावर ‘घर एके घर’ हेच असणार तुमच्याही आयुष्यात. काहीसं बांधील, कंटाळलेलं, बेचैन, उदास, गंभीर, घाबरलेले आहात का? मी नुसतं विचारते आहे. पण कितीतरी गोष्टी तुम्हाला आज सांगायच्या असतील नाही? तुम्हाला माहिती आहे, आमचा खेळ संपल्यावर एखाद्या दिवशी जमिनीवर गुळाचा खडा राहायचा आणि त्याला मुंग्या लागायच्या. मग आजी मला रागावून झाडू मारायला सांगायची. मी मुकाट्यानं झाडू मारला नाही, तर उद्या परत खेळता येणार नाही हे माहिती होतं. पण आजूबाजूला आपल्यातले काही नको तिथं बंड करू पाहत आहेत. आपल्याला आपलं घर, घरातली माणसं, घराची जागा टिकवायची आहे. घरातली इडापिडा बाहेरच ठेवून घरातली लक्ष्मी घरातच ठेवायची आहे. आपण काही दिवस आपल्या कल्पनाशक्तीला ताण देऊ या. फक्त मनःचक्षूनं बाहेरचं जग पाहिलं तर? घरातच राहून मनावर ताबा मिळवूया. संध्याकाळ झाली की आजी येईलच सांगायला, ‘जा, आता बाहेर खेळा.’’ 

संपूर्ण जग कात टाकतंय. आपण ‘छान छोटे’ राहूया. ‘वाईट मोठे’ बनायची घाई कशाला? काय म्हणता?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com