अश्‍विनीची ‘दंगल’!

Ashwini-Borhade
Ashwini-Borhade

वेगळ्या वाटा - संपत मोरे
अश्‍विनी वंदना कुंडलिक बोऱ्हाडे. गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कडूस. माध्यमिक शाळेत असताना खाशाबा जाधव यांच्यावरील एक धडा तिच्या पुस्तकात होता. तो धडा तिला खूपच भावला. ऑलिंपिकमध्ये कुस्तीत यशस्वी कामगिरी केलेल्या खाशाबांचा धडा वाचून तिलाही पहिलवान व्हावं असं वाटायला लागलं. आजवर पुरुषही पहिलवान न झालेल्या गावातील मुलगी पहिलवान व्हायचं स्वप्न पाहत होती! घरची आर्थिक परिस्थिती बेताची. वडील शेतकरी. शेतकरी कुटुंबात असलेली जगण्याची लढाई इथेही होती, पण तिचे आई-वडील खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. मामा नितीन पानसरे मदतीला आले. अश्विनीने आळंदीच्या कुस्ती केंद्रात सरावासाठी प्रवेश घेतला.

आडवळणी खेड्यातली मुलगी कुस्तीचे डाव शिकू लागली. मुलगी तालमीत गेली, हा परिसरात टिंगलीचा विषय बनला. कधी पैपाहुणे, गावकरी तिच्या आई-वडिलांना डिवचायचे, पण तिची आई सडेतोड उत्तरे द्यायची. अश्विनी सांगते, ‘‘माझी आई फारशी शिकलेली नव्हती. स्त्रीवादासारख्या गोष्टी तिच्यापर्यंत पोचल्या नव्हत्या. तरीही तिनं मला कुस्तीसाठी प्रोत्साहन दिलं. शहरातील शिकलेली आई आपल्या मुलीच्या पाठीमागं उभी राहते, तशी ती माझ्यासोबत उभी राहिली.’’

आईच्या प्रोत्साहनाच्या जोरावर अश्विनीने अनेक मैदाने गाजवली. राज्यपातळीवरच्या अनेक कुस्त्या ती खेळली. देशपातळीवर कुस्ती प्रशिक्षकांसाठी असलेल्या भारतीय खेल प्राधिकरण या संस्थेत ती प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्रातील पहिली महिला कुस्ती प्रशिक्षक होण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि स्वतःच्या हिमतीवर कुस्तीत चमकलेल्या अश्विनीचे नाव आज महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वात चर्चेत आहे. तिच्यामुळे पंचक्रोशीतील मुलींनीही कुस्तीत यावे वाटू लागले. त्यामुळे तिने काही महिन्यांपूर्वी राजगुरुनगरला महिला कुस्तीगिरांसाठी शिबिर घेतले. पालकांनी मुलींना शिबिरासाठी पाठवावे, यासाठी अश्विनी तालुकाभर फिरली. अनेक मुलींच्या आई-वडिलांना भेटली. हे करताना तिला अनेक बरे-वाईट अनुभव आले. ती सांगते, ‘‘महिला कुस्तीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन हळूहळू बदलत आहे, मात्र अजूनही मुली कुस्तीला प्राधान्य देत नाहीत. राज्यात अशी अनेक गावे आहेत, जिथे एकही मुलगी कुस्ती खेळलेली नाही. महिलांची कुस्ती म्हटल्यावर अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात, हे चित्र बदलायला हवे.’’

महिला कुस्ती रुजावी हा अश्विनीचा प्रयत्न आहे. शिकायला आलेल्या मुलींना ती प्रोत्साहन देतेच, पण मुलींनी कुस्तीत करिअर करावे यासाठी ती नेहमी प्रयत्नशील असते. ‘आजच्या समानतेच्या जमान्यात कुस्तीतही समानता हवी. मुलींनीही मेंदू, मन आणि मनगट बळकट केले पाहिजे,’ असे अश्‍विनीचे मत आहे. महिला कुस्तीत ‘दंगल’ करणाऱ्या अश्‍विनीला शुभेच्छा! 

माझे घर
आपल्या घरात असतो आपण खास सजवलेला कोपरा. आपल्या भावभावनांशी जोडलेला. अशा कोपऱयांनी सजतं घर. शेअर करा हा कोपरा. सजवलेलं आपलं घर. फोटोंसह.

माझी रेसिपी
खायला आणि खाऊ घालायला तुम्हाला आवडतं का? मग शेअर करा तुमची आवडती रेसिपी...फोटोंसह...
व्हॉटस्ॲप- ९१३००८८४५९
email :  maitrin@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com