ऑन डिफरंट ट्रॅक : ध्यास दिव्यांगांना स्वावलंबी करण्याचा!

Seema-Dabake
Seema-Dabake

नाव - सीमा दाबके
गाव - पुणे

‘’Not all of us can do great things. But we can do small things with great love’’ 
- मदर तेरेसा.
आपण प्रत्येकाने सर्वश्रेष्ठच काहीतरी केले पाहिजे, असे नाही तर काही नेहमीच्या साधारण गोष्टीदेखील खूप प्रेमाने करता येऊ शकतात, हे मदर तेरेसांचे उद्गार किती उद्बोधक आहेत, हे सीमा ताईंचे कार्य पाहिल्यावर जाणवते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या प्रत्येकाला कधी न कधी प्रोत्साहनाची, शाबासकीची तसेच आपल्या कलागुणांना वाव देणाऱ्या व्यासपीठांची गरज असते, पण समाजातील त्या ‘दिव्यांग’ घटकांचे काय, ज्यांच्याकडे कलागुण आहेत, पण कधीकधी एक योग्य व्यासपीठ मिळत नाही किंवा समाजाची शाबासकीही मिळत नाही? केवळ त्यांच्या जाणिवा आपल्यापेक्षा भिन्न आहेत म्हणून? अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास सीमा ताईंशी बोलणे होईपर्यंत मी देखील या गोष्टीचा कधी गांभीर्याने विचार केला नव्हता. 

सेवासदनाच्या ‘दिलासा केंद्र’ या मतिमंद विद्यार्थांच्या शाळेत कलाशिक्षिकेच्या नोकरीसोबातच दिव्यांगांच्या विविध संस्थांमध्ये त्या चौतीस वर्षे मदतनीस म्हणून कार्यरत होत्या. आता निवृत्तीनंतर त्यांनी दिव्यांगांच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले आहे. दिव्यांग, विशेषतः मतिमंद विद्यार्थी अभ्यासात विशेष प्रगती करू शकत नाहीत, अशावेळी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखून त्यांना प्रोत्साहन दिल्यास पाल्य व पालकांचाही आत्मविश्वास व आनंद द्विगुणित होतो. आपलीही मुले काहीतरी करतात, याचे समाधान पालकांना मिळते, हे सांगताना सीमा ताईंचाही उत्साह ओसंडून वाहत होता.

शाळेतील इतर शिक्षक, लायन्स क्लब व इतर सामाजिक संस्थांच्या मदतीने त्या दिव्यांगांसाठी चित्रकला, समूहगीत, समूहनृत्य अशा विविध स्पर्धा, तर महाभोंडला, दांडिया, पुस्तहंडी, दहीहंडी, बालमेळावा असे विविध उपक्रम गेली अकरा वर्षे सातत्याने राबवीत आहेत. दिव्यांगांसाठी मिनी मॅरेथॉनचे गेली पंचवीस वर्षे आयोजन केले आहे. या मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासोबतच त्यांना रोजगार मिळवून देऊन स्वावलंबी केल्यास ही मुले खऱ्या अर्थाने समाजप्रवाहात येतील, यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. सीमा ताईंचे हे समाजकार्य नक्कीच वाखाणण्यासारखेच आहे. आजवर त्यांना समाजातील विविध संस्थांनी गौरविले आहे. या सर्वाचे श्रेय त्या आपले दिव्यांग विद्यार्थी, सर्व सहकारी, पोलिस आणि त्यांचे पती यांना देतात. 

या मुलांना प्रोत्साहन देण्याचे व त्यांना स्वावलंबी करण्याचे कार्य निरंतर करीत राहण्याचा त्यांचा दृढनिश्चय आहे. त्यांच्या या कार्यास आपल्या शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com