esakal | मेमॉयर्स : दुवा : प्राध्यापक ते अभिनेत्री प्रवासाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Sonali-patil

अभिनयाच्या क्षेत्रात मी आज माझ्या आईमुळेच आहे. खरतर मी पेशाने शिक्षिका. एमए, बीएड आणि त्यानंतर एमबीए असं शिक्षण घेतल्यानंतर मी कोल्हापुरातील राजाराम ज्युनियर आणि सीनिअर कॉलेजला प्रोफेसर म्हणून काम केलं. अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती. छोट्यामोठ्या नाट्यस्पर्धांमध्ये आवडीने सहभाग घ्यायचे. आई मला खूप प्रोत्साहन द्यायची. बाबांनी कधी विरोध केला तरी माझी बाजू सावरुन घ्यायची.

मेमॉयर्स : दुवा : प्राध्यापक ते अभिनेत्री प्रवासाचा

sakal_logo
By
सोनाली पाटील, अभिनेत्री

अभिनयाच्या क्षेत्रात मी आज माझ्या आईमुळेच आहे. खरतर मी पेशाने शिक्षिका. एमए, बीएड आणि त्यानंतर एमबीए असं शिक्षण घेतल्यानंतर मी कोल्हापुरातील राजाराम ज्युनियर आणि सीनिअर कॉलेजला प्रोफेसर म्हणून काम केलं. अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती. छोट्यामोठ्या नाट्यस्पर्धांमध्ये आवडीने सहभाग घ्यायचे. आई मला खूप प्रोत्साहन द्यायची. बाबांनी कधी विरोध केला तरी माझी बाजू सावरुन घ्यायची.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अभिनयाची आवड तिच्या पाठिंब्यामुळेच खुलत गेली. याच आवडीतून मी सोशल मीडियावर माझे व्हिडिओज पोस्ट करायचे. याच दरम्यान स्टार प्रवाहवरील ''वैजू नंबर वन'' मालिकेसाठी ऑडिशन्स सुरु होते. माझे व्हिडिओ पाहून मलाही ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं. ''वैजू नंबर वन''च्या टीमला माझ्यातली चुणुक दिसली आणि माझी निवड झाली. माझ्यासाठी हा प्रवास स्वप्नवत होता. मी मुळची कोल्हापूरची. शूटिंगसाठी मुंबईला जायचं ठरवलं आणि माझ्या या निर्णयात मला माझ्या आईने मोलाची साथ दिली.

प्राध्यापिकेची नोकरी सोडून मी अभिनय क्षेत्रात जाणार होते. आईच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मला हे शक्य झालं. प्राध्यापक ते अभिनेत्री या महत्त्वाकांक्षी प्रवासात माझी आई महत्त्वाचा दुवा आहे. माझ्या आईला वाचनाची खूप आवड आहे. तुकाराम गाथा, भगवद्‌गीता, ज्ञानेश्वरी याचं ती आवर्जून पारायण करते. या ग्रंथांचं महत्त्व ती आम्हा भावंडांना पटवून देते. तिच्यामुळेच मलाही अध्यात्माची गोडी लागली. शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांना शिकवताना मी आईने दिलेले असंख्य दाखले द्यायचे. पुस्तकी ज्ञानासोबतच आईने दिलेल्या बौद्धिक खाद्याची शिदोरी माझ्या आयुष्यभर सोबत राहील. 

शूटिंगमुळे आम्ही लांब आहोत, मी तिला खूप मिस करते. मला ''वैजू नंबर वन''मध्ये वैजूच्या भूमिकेत पाहिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं त्याची किंमत पैशात मोजता येणार नाही. आईच्या हातच्या भरल्या वांग्यांची भाजी माझी खूप आवडीची. अनेक वेळा प्रयत्न करुनही मला ती तिच्यासारखी कधी जमली नाही. एक आठवणीतला किस्सा मला आठवतो. मी सहावी-सातवीत असताना एकदा आईला सरप्राईज द्यायचं असं ठरवलं आणि चपाती करण्याचा बेत आखला. मी चपाती बनवली खरी पण काही केल्या ती चपाती मऊ होईना. मग चपातीला पाणी लावून ती मऊ करण्याचा एक असफल प्रयत्न मी करून पाहिला. आईला जेव्हा ती चपाती वाढली तेव्हा तिच्या लक्षात ही गोष्ट आली आणि तिला काही हसू आवरेना. आजही माझ्या फसलेल्या चपातीचा किस्सा ती सर्वांना आवर्जून सांगते. 

माझी आई माझी अगदी जवळची मैत्रीण आहे. जगातली कोणतीही गोष्ट मी तिच्याशी शेअर करते.
(शब्दांकन - अरुण सुर्वे)