माझिया माहेरा : संस्कारांची पायाभरणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepali hajare

कुठल्याही विवाहित स्त्रीसाठी तिचे माहेर हे जीव की प्राण असते. लग्न झाल्यावर आई-वडिलांना बिलगून रडणारी ती सासरी येते.

माझिया माहेरा : संस्कारांची पायाभरणी

- दीपाली हजारे, पुणे

कुठल्याही विवाहित स्त्रीसाठी तिचे माहेर हे जीव की प्राण असते. लग्न झाल्यावर आई-वडिलांना बिलगून रडणारी ती सासरी येते. सासरी कितीही श्रीमंती, सुख आणि प्रेम मिळाले, तरी माहेरी आल्यानंतर आई-वडिलांच्या सानिध्यात तिला तिचे हरवलेले बालपण मिळते. माझे माहेर राजगुरुनगर आणि सध्या नवी सांगवी.

शिक्षण आणि नोकरीनिमित्ताने आई-वडिलांनी केलेलं स्थलांतर. माझ्या माहेरी आम्ही तिघी बहिणी, एक भाऊ आणि आई-वडील. वडील (शशिकांत धाडगे) स्वभावाने कडक, शिस्तप्रिय आणि टापटिपीची आवड असणारे. आम्हा भावंडांना तीच सवय जडली आहे. आईचा (पद्मा धाडगे) जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन मला आजच्या जीवनात खूप उपयोगी पडत आहे. आईने खूप कला शिकण्याला प्रोत्साहित केले. या घडीला त्याचा खूप उपयोग होतो आहे. माझे दोन्ही आजी-आजोबा, दोन काका-काकू आणि दोन्ही मामा-मामी यांनी आम्हा भावंडांचे खूप लाड केले. मी राजगुरुनगरमधील महात्मा गांधी विद्यालयात शिकले. शाळेमधील शिक्षकांनी अनेक गोष्टी कळत नकळत शिकवल्या. खूप छान संस्कार केले. जीवनात जगायचा आत्मविश्वास दिला. शाळेतल्या दिवसात मैत्रिणीबरोबर घालवलेले ते दिवस परत जगावेसे वाटतात. त्या वयात झालेली ती निरागस मैत्री परत कधीच होत नाही.

शाळेत असताना मैत्रिणींबरोबर सिद्धेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिर आणि ढुम्या डोंगर येथे फिरायला जाणे हा नित्यक्रम असायचा. लग्न झाल्यावर खूप वर्षांनी आता नवीन तंत्रज्ञानामुळे आम्ही मैत्रिणी पुन्हा जोडल्या गेलो आहोत. एकदा-दोनदा भेटलोही आहोत. तेव्हा ती मधली वर्षे आपोआप पुसली जाऊन परत लहानपणीचा निखळ आनंद आम्ही अनुभवला. आम्हा भावंडांचे आता भाऊ-बहिणी हे नाते पुसट होऊन मित्र-मैत्रिणीचे नाते तयार झाले आहे.

शिक्षिका असलेली माझी ताई (वैशाली भोंग) मला जीवनात अनेक वेळा मार्गदर्शन करते. छोट्या बहिणीबरोबर (श्रद्धा कुदळे) सुख-दुःखाची देवाणघेवाण होते. माझा लहान भावाचे (अभिजीत धाडगे) आता लग्न झाले आहे. माझी वहिनी (स्नेहा टिळेकर) आमच्यात समरूप झाली आहे. भाऊ आणि वहिनी आम्हा बहिणींचे स्वागत मोठ्या आनंदाने करतात. वहिनी नवनवीन पदार्थ आवडीने आपल्या भाच्यांना खाऊ घालते. एक मैत्रीण म्हणूनच आमच्याबरोबर वावरते. माझी छोटी गोड भाची (इरा) आत्या आत्या करत मागेमागे फिरत असते. आम्ही सगळे वर्षातून एक ट्रिप कोकणात करतो. मनसोक्त वाळूत समुद्रकिनारी खेळतो, मासे खातो, भरपूर भटकतो. एकमेकांबरोबर घालवलेले ते दिवस पुढल्या वर्षीपर्यंतची ऊर्जा देऊन जातात आणि फोटोंबरोबर आठवणीत राहतात. माहेरी चार दिवस गेल्यावर एकदम अल्लड होऊन जगावेसे वाटते; पण परत काही दिवसांनी अल्लडपणा सोडून जबाबदारी सांभाळायला सासरी निघावे लागते.

Web Title: Deepali Hajare Writes Majhia Mahera

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Womens Corner