आरोग्यमंत्र : कोलेस्टेरॉलविषयक गैरसमज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cholesterol
आरोग्यमंत्र : कोलेस्टेरॉलविषयक गैरसमज

आरोग्यमंत्र : कोलेस्टेरॉलविषयक गैरसमज

कोलेस्टेरॉल म्हणजे काय, ते काय करते, त्याचे प्रकार काय इत्यादी गोष्टींविषयी आपण गेल्या आठवड्यात माहिती घेतली. आता कोलेस्टेरॉलविषयीचे असलेले गैरसमज आणि त्यांच्याबाबत वस्तुस्थिती काय आहे, ते बघू या.

1) कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा संबंध नाही. कोलेस्टेरॉल हे आवश्यक द्रव्य आहे, त्याला कमी करून शरीराची हानी होते. : हा विवाद हा काही शास्त्रनिबंधाच्या विपर्यस्त निष्कर्षांमुळे निर्माण झाला आहे. सन २०१५ मध्ये अमेरिकन हार्ट अससोसिएशन यांच्या गाईडलाईनमध्ये कोलेस्टेरॉल हे एका विशिष्ट नंबरपर्यंत कमी न करता ते कमी करण्याची तीव्रता सांगितली होती. परंतु, कुठेही कोलेस्टेरॉलविषयक उपचार करू नयेत, असे म्हटलेले नाही. किंबहुना गेल्या १०० वर्षांमधील शास्त्रीय संशोधन असे सिद्ध करते, कि कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो आणि ती कमी केल्यास बहुमूल्य जीव वाचू शकतात. स्टॅटिन ही औषधे माणसाच्या इतिहासातील सर्वांत उपयुक्त अशी औषधे आहेत- ज्यांच्यामुळे हृदयविकारांपासून संरक्षण होते व काही प्रमाणात अँजिओप्लास्टीचीदेखील गरज भासत नाही. एलडीएल कोलेस्टेरॉलची मात्रा कमी असणे हे रुग्णांच्या फायद्याचे आहे. त्याचबरोबर एचडीएल कोलेस्टेरॉलची मात्रा ही जास्त असणे आवश्यक आहे.

2) कोलेस्टेरॉल मुलांसाठी गंभीर नाही : उच्च कोलेस्टेरॉल हे अनुवांशिक असू शकते. याला ‘फॅमिलीयल हायपरकोलेस्ट्रोलेमिया’ असे म्हणतात. जे आनुवंशिक विकार असलेल्या मुलांना हृदयरोगाचा धोका असतो. या समस्येचे निदान फार कमी प्रमाणात होते. एकदा ओळखले, की या स्थितीत असलेल्या मुलांना औषधांसह तीव्र उपचार करणे आवश्यक आहे. कोलेस्टेरॉलचा धोका कितीही असो, सर्व मुलांना निरोगी आहार आणि जीवनशैलीचा फायदा होतो. स्वस्थ आहार आणि शारीरिक व्यायामाच्या सवयी लवकर लावल्याने कालांतराने हृदयरोगाच्या समस्या कमी होऊ शकतात. शास्त्रीय आधार असे दर्शवितात, की एथेरोस्क्लेरोटिक प्रक्रिया (धमन्यांमध्ये प्लाक तयार करणे) लहानपणापासून सुरू होते आणि प्रौढतेमध्ये हळूहळू वाढते. नंतरच्या आयुष्यात, याचे कोरोनरी हृदयरोगमध्ये परिवर्तन होऊ शकते. मुलांना फळे, भाज्या, मासे, संपूर्ण धान्य आणि कमी सोडियम, काही साखरयुक्त अन्न आणि पेययुक्त समतोल आहार दिला जावा.

3) कमी वजनाच्या लोकांना उच्च कोलेस्टेरॉल नसते : जास्त वजन असलेल्या लोकांना उच्च कोलेस्टेरॉल असण्याची अधिक शक्यता असली, तरी कमी वजन असलेल्या लोकांनादेखील उच्च कोलेस्टेरॉल असू शकते. कोणत्याही शरीरयष्टीच्या व्यक्तीस उच्च कोलेस्टेरॉल असू शकते. ज्या लोकांचे वजन सहजरीत्या वाढत नाही, असे लोक आपल्या आहारातील सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅटविषयी अज्ञानी असतात. कोणीही ‘त्यांना पाहिजे ते खाऊ शकत नाही,’ आणि ‘हृदय-निरोगी’ राहू शकत नाही. आपले वजन, शारीरिक व्यायाम आणि आहार विचारात न घेता आपल्या कोलेस्टेरॉलची नियमित तपासणी करावी.

4) डॉक्टर उगीच कोलेस्टेरॉल कमी करण्याची औषधे देतात, जीवनशैलीतील बदल सर्वोत्तम आहेत. : आपण जेव्हा कोलेस्टेरॉल म्हणतो, तेव्हा आपण आहारातील कोलेस्टेरॉल नाही, तर रक्तातील कोलेस्ट्रॉलबद्दल बोलत असतो. आहार आणि व्यायामासारख्या जीवनशैलीचे घटक हृदयविकाराची जोखीम कमी करण्यामध्ये निश्चितपणे महत्त्वाची भूमिका बजावतात; परंतु आता आपल्याकडे अशी औषधे आहेत- जी आपणास जीवनशैलीतील बदलांमधून आपण जे काही कोलेस्टेरॉल कमी करू शकता त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात कोलेस्टेरॉल कमी करू शकतात. आपण जसे गोड पदार्थ खूप खाणे अयोग्य आहे यावर कोणताही वादविवाद करीत नाही, तसेच कोलेस्टेरॉल कमी करण्याच्या उपचारांबाबत आहे. कोलेस्टेरॉल कमी करण्याबाबत विवाद नाही, विवाद आहे त्याच्या पद्धतींबद्दल. जीवनशैली-बदल आणि कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधे हे पर्याय नसून पूरक आहेत.

कोलेस्टेरॉलची पातळी कशी कमी करायची, जीवनशैलीत कोणते बदल करायचे, स्टॅटिन्स या औषधांच्या बाबत नक्की वस्तुस्थिती काय आहे याबाबत माहिती पुढील लेखात घेऊ.

Web Title: Dr Rutuparn Shinde Writes Cholesterol Misconceptions

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Womens Cornercholesterol
go to top