‘पॉवर’पॉइंट : ‘गिल्ट फील’ नकोच 

‘पॉवर’पॉइंट : ‘गिल्ट फील’ नकोच 

आज हा लेख वाचत असतानाच्या आठवड्यातच राष्ट्रीय युवक दिन साजरा झाला असेल. कुठल्याही मुलीच्या किंवा मुलाच्याही आयुष्यात सर्वाधिक बदल होणारा काळ हा सोळाव्या वर्षापासून ते तिसाव्या वर्षापर्यंतचा असतो असं मला वाटतं. म्हणजे त्यानंतर बदल होत नाहीत असं नाही; पण त्यानंतर होणारे बदल अपेक्षित, नियोजित किंवा कायमस्वरूपाचे असतात. मात्र, वीस ते तीस हा असा भारावलेला काळ असतो, जेव्हा टीनएज संपतं, आणि दरवर्षी आपण नवेच वाटू लागतो. ‘यूथ’ म्हणतात ते याच काळाला का? हा काळ अनेक गोष्टी शिकवतो. प्रेम, लग्न,कदाचित मूलही, या ठरलेल्या क्रमानं आयुष्यात येणाऱ्या गोष्टी, बहुतांश वेळा याच वयात मुली अनुभवतात. पण अजून एक गोष्ट फार नकळतपणे खासकरून मुलींमध्ये याच वयात निर्माण केली जाते, ती म्हणजे एक छुपा गिल्ट फील बाळगणं. म्हणजे बघा, माझा प्रियकर माझ्यासाठी सगळं करत असूनही मी त्याला माझ्या शिक्षणामुळे योग्य वेळ देऊ शकत नाहीये..आला गिल्ट फील. शिक्षणाच्या संधीसाठी परदेशी जायला मिळतंय, मग नातं कसं निभवणार?.. आला गिल्ट फील. माझा होणारा नवरा लग्नासाठी तयार असूनही मी मात्र तयार नाहीये..आला गिल्ट फील. लग्नानंतर थोडे दिवस दोघेच राहू..आला गिल्ट फील. लग्नानंतर नोकरीची नामी संधी आलीये. पण कुटुंबापासून दूर राहावं लागेल..आला गिल्ट फील. एवढंच काय, ऑफिसवरून घरी यायला उशीर होणं, सणाच्या दिवशी पिरिअड्स असणं, कौटुंबिक कार्यक्रमांना पोचायला उशीर होणं अशा अगणित तद्दन फालतू गोष्टींसाठीही अनेक स्त्रियांच्या मनात ही अशी ‘बापरे असं कसं झालं?’ भावना रूजत असते. वाढणाऱ्या वयाबरोबर नवनव्या अनुभवांमधून हा गिल्ट फिल अनेकदा डोकावत असतो. हा असा फील तरूणींना दिला जातो याला प्रत्येकवेळी फक्त पुरुषच जबाबदार नसतात. अनेकदा तर बायकाच बायकांवर असं दडपण टाकत असतात. मग ती तरुण मुलगी कुठल्याशा साच्यात बसण्याची केविलवाणी धडपड करत असते.

युवक दिनाच्या निमित्तानं हे सांगावसं वाटलं याचं कारण, हा गिल्ट फील असावा अशी परिस्थिती सतत आजूबाजूला तयार होत राहणं हा या व्यवस्थेचाच भाग आहे. पण आपण तरुण मुलींनी जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येईल तेव्हा ही भावना तिथल्या तिथं रोखून धरण्याची गरज आहे. ती या वयात रोखली गेली नाही, तर पन्नाशीपर्यंत आपण किती वाकू? याची कल्पनाही करवत नाही. आत्ता या क्षणी माझ्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची असेल, आणि ती मी केली तर ‘इट्स ओके’. ठीके.. हा धीर कुणी बाहेरचा द्यायला येणार नाहीये. तो आपला आपण स्वतः आणावा लागतो. स्वतःच्या करिअरला वेळ देण्यासाठी नात्यांचा मानसिक गुंता नकोय, लग्नाबाबत १० वेळा विचार करताय, पंचविशीनंतर करिअरची खरी दिशा सापडलीये, तिशीनंतर लग्न करावंसं वाटतंय, नोकरीसाठी मुलांना पाळणाघरात ठेवताय.. ‘इट्स ओके’. ठीके. 2+2=4 असं गणितात असतं, तरुण वयात जगताना वय आणि जबाबदाऱ्या यांच्या अशा बेरजा करून जगता येत नाही. समोरचा तुम्हाला ‘इट्स ओके’ म्हणायची वाट पाहू नका. याचा अर्थ स्वार्थी राहायचा असा मुळीच नाही. पण किमान मला जे वाटतंय त्यात गैर नाहीये ही भावनाच नकळतपणे डोक्यावर ठेवलेलं मणाचं ओझं हलकं करते. नाही का..? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com