‘पॉवर’ पॉइंट : प्रथांच्या चौकटी भेदू; विज्ञानवादी बनू! 

Girl-Periods
Girl-Periods

सोळाव्या वर्षी पाळी आल्याचं कळताच त्याच दिवशी ‘ती’ धावत मैत्रिणीला भेटायली गेली. अगदी घनिष्ट मैत्रिणीला हे कधी एकदा सांगतीये असं तिला झालं होतं. फक्त मैत्रीणच नाही, तर मैत्रिणीची आईसुद्धा तिची मैत्रीणच झाल्यासारखी होती. प्रेमानं जवळ घेणारी, लाडाधोडानं खायला घालणारी दुसरी आईच वाटायची तिला. मैत्रिणीच्या घरी पोचली आणि चटकन बातमी सांगत तिच्या आईला बिलगली. त्याक्षणी अगदी नकळत आई पटकन् म्हटली, ‘‘अगं, थांब स्वयंपाक व्हायचाय, हात लावू नको.’’ ती चमकली. आपल्या स्पर्शात काय नेमकं चुकलं? तिला कळेना. खरंतर पिरीएड्स, चर्म्स असे जरा ऐकायला बरे वाटतील असे शब्द उच्चारण्याकडे तिचा कल असायचा. पाळी वगैरे ऐकणं तिला अनकम्फर्टेबल व्हायचं; पण त्याहीपेक्षा अस्वस्थ ती ‘त्या’ मागे गेलेल्या २ पावलांमुळे झाली. त्या दिवसापासून मैत्रिणीच्या आईबद्दल प्रेम निश्चित राहिलं; पण मागे गेलेली दोन पावलंही ती विसरू शकली नाही. 
अशा घटना अनेक मुलींच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रसंगी घडलेल्या असतील.

कधी प्रत्यक्ष पाहिलंही नाही अशा अस्तित्वाला मानत जवळच्या व्यक्तीला स्पर्श न केलेल्या स्त्रिया आपल्या आजूबाजूला असतात. २८ फेब्रुवारीला असलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं तरी आपण याविषयी बोललं पाहिजे. ‘‘त्या’ दिवसांत आमच्याकडे सगळं चालतं फक्त स्वयंपाकघरात जात नाही,’ ‘आमच्याकडे सगळं चालतं, फक्त अमुक अमुक रंगाचे कपडे घालत नाहीत,’ ‘आमच्याकडे सगळं चालतं, फक्त एका खोलीत बसावं लागतं,’ असे कितीतरी नकार, बंधनं मुली सहन करत असतात आणि हे नकार अवैज्ञानिक आहेत याची त्यांना जाणीव होण्याआधीच प्रथेच्या नावाखाली ते थोपवलेले असतात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इकडे हात लावू नको, तिकडे बसू नको, तिथे जाऊ नको अशी बंधनं घरात घातलेल्या मुलींचे पालक भविष्यात मात्र मुलीला मुक्त विचारांचा नवरा आणि तिला काही बंधनं न घालणारं सासर शोधतात. यात फक्त पालकांचंच काही चुकतं असं नाही. मुलीही ‘त्या’ दिवसात स्वत:चे मेंदू बंद ठेवून ते मुकाट ऐकत असतात. सोळाव्या, १७ सतराव्या वर्षी घरात प्रथेच्या नावाखाली सुरू असलेल्या सोंगांना उधळून लावणं शक्यही नसतं म्हणा; पण किमान जाणीव झाल्यानंतर, शिक्षणाची एक ठराविक पातळी गाठल्यानंतर तरी आपले स्पर्श नाकारणाऱ्या व्यवस्थेला विरोध फार कमी मुली करतात, याची उदाहरणं मी स्वत: माझ्या आजूबाजूला बघितली आहेत. 

शाळेत शिकलेलं विज्ञान आणि रोजच्या जगण्यात प्रथांच्या नावाखाली नाकारल्या जाणाऱ्या गोष्टी, यांचा काहीही संबंध नाही, अशा थाटात बऱ्याच घरात गुण्यागोविंदानं मुलगी वाढते, आणि ती ‘संस्कारी’ ठरते. शिवाशिवीच्या मर्यादा नसल्या, तरी किमान घरातल्या कार्यादरम्यान ‘अशी’ राहू नकोस म्हणत अनेकदा तारखा बदलण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांसमोर मुली जाऊन बसतात.

माझ्या शरीरात आत्ता काय बदल घडतायत, याच्याशी बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीचा, कार्याचा, घटनांचा काय संबंध आहे? त्या घटनांसाठी, कार्यासाठी मी का माझ्या शरीरातले बदल रोखू? हे प्रश्न विचारण्याची मुभाच नसते. काही ज्येष्ठांचा आदर राखताना विज्ञानाची माती झाली तरी चालते. 

या विज्ञान दिनापासून आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या या घटना बदण्याचा किंवा आपण या घटनांचा भाग तर नाहीये ना, हे तपासण्याचा प्रयत्न करूया. मुलीला सोयीनं वस्तू समजत, नाकारलेल्या स्पर्शांचा, कोपऱ्यात बसवणाऱ्या व्यवस्थेचा विरोध मुलीनं तिथल्या तिथंच करायला हवा. नाहीतर भविष्यात घरातल्या या कोपऱ्यांत अडकलेल्या हुंदक्यांमागची चीड अचानक अनपेक्षितपणे बाहेर येईल. आणि सो कॉल्ड ‘संस्कारां’च्याही चौकटीवर प्रश्नचिन्हं निर्माण करेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com