‘पॉवर’ पॉइंट : टेक अ ब्रेक

हर्षदा स्वकुळ
Friday, 22 January 2021

लहानपणी पकडापकडीचा खेळ कुणी कुणी खेळलाय.. लपाछपीच्या खेळाची मला भीती वाटायची, अजूनही वाटते. यामागे काय मानसिक कारण असेल माहीत नाही; पण आपण कुठंतरी लपायचं. आपल्याला माहीतही नसलेल्या दिशांनी कुणीतरी आपल्याला मग शोधून ओरडणार, आणि दरम्यानच्या शांततेचा भंग होणार, ही भावनाच माझ्यासाठी अस्वस्थ आणि भीतिदायक आहे.

लहानपणी पकडापकडीचा खेळ कुणी कुणी खेळलाय.. लपाछपीच्या खेळाची मला भीती वाटायची, अजूनही वाटते. यामागे काय मानसिक कारण असेल माहीत नाही; पण आपण कुठंतरी लपायचं. आपल्याला माहीतही नसलेल्या दिशांनी कुणीतरी आपल्याला मग शोधून ओरडणार, आणि दरम्यानच्या शांततेचा भंग होणार, ही भावनाच माझ्यासाठी अस्वस्थ आणि भीतिदायक आहे. मात्र, कुणीतरी आपल्यामागे किंवा आपण कुणाच्यातरी मागे भरधाव पळतोय आणि पुढे धावणारी किंवा मागे धावणारी व्यक्ती आपल्या दृष्टिक्षेपात आहे, ही भावना मला आधार देते. लहानपणीच्या मला पकडापकडीच का आवडायची आणि लपाछपी खेळताना मी रडकुंडीला का यायचे, याची शब्दांत मांडता येतील अशी कारणं आत्ता या वयात येऊन कळतायत.

मात्र, यामागे स्वभावही असेल का, हा खरंचच मला पडलेला प्रश्न आहे. मी काही डॉक्टर नाही किंवा सायकोलॉजिस्टही नाही. या प्रश्नाचं उत्तर यांना भेटल्याशिवाय कळणारही नाहीत; पण माझ्यापुरता तरी तो स्वभावाचा भाग असावा असं वाटतं. ज्या दोन व्यक्ती तुफान धावत असतात, त्यांना एक क्षणभर ब्रेक घ्यायला जागा असते, म्हणून धावण्यात मजा असते. लपाछपीत मला थांबायचंय, हे सांगणार कुणाला? नात्याचंही तसंच आहे का? म्हणजे अगदी सरसकट नाही; पण हे दोन खेळ आणि ‘मी कुणाबरोबर किती नातं निभावू शकते’, या दोन गोष्टी मला नेहमी कनेक्टेड वाटतात. म्हणजे नात्यात ब्रेक घेता येत असेल, तर एकत्र पळण्यात मजा आहे, असा माझा समज आहे. अनेकांना हे चुकीचंही वाटेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साताजन्माच्या गाठी वगैरे ही शिकवण असताना, हे काय तऱ्हेवाईक विचार असंही वाटेल; पण असे विचार नात्यांमध्ये येतातच. कधी ते एकमेकांशी बोलून एकत्र सोडवले जातात. कधी ते आयुष्यभर मनात ठेवून ‘सगळंच उत्तम चाललंय’ या देखाव्यात विरून जातात, तर कधी तुटेपर्यंत ताणले जातात. हे काही फक्त प्रियकर-प्रेयसी या नात्यांबद्दलच म्हणत नाहीये. अनेकदा मैत्रीतही थोडा ब्रेक गरजेचा असतो. वर्षानुवर्षं एकत्र राहिल्यानंतरच्या नात्यातसुद्धा असा ब्रेक गरजेचा असतो. गोष्टी जरा होल्डवर असणं ही पळवाट नसते. उलट काही वेळा असा ब्रेक घेण्याची मुभा असणं, म्हणजेच या नात्यापासून कधीच लपावं लागणार नाही, असा विश्वास वाटतो मला. ब्रेक घेणं म्हणजे तुटणंही नाही. उलट छान शांततेत असताना लपाछपीत धाडकन कुणीतरी येऊन पकडतो, तसं हादरणं नात्यात येऊ नये, म्हणून घेतलेली ती स्पेस वाटते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा ब्रेक घेण्याची वेळ आली तर समोरच्याशी बोलून बिनधास्त घ्यावा. आपला माणूस पकडापकडीत थांबतो आपल्यासाठी, श्वास घेऊ देतो आपल्याला. खेळातला आणि नात्यातलाही माझा असा अनुभव आहे. तुमचंही असं काही खेळ आणि नातं कनेक्शन आहे का?

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshada Swakul Writes about power point

Tags
टॉपिकस
Topic Tags: