दिलखुलास : अचूक लक्ष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjuna Target Bird Eye

गुरुकुलात शिकत असताना अश्वत्थामा (जो गुरू दोणाचार्यांचा पुत्र होता) याला वाटले, की मी गुरू द्रोणाचार्याचा मुलगा असून गुरूंना मात्र अर्जुनच प्यारा आहे. तसे त्याने गुरूंना बोलून दाखवले.

दिलखुलास : अचूक लक्ष्य

- कांचन अधिकारी

गुरुकुलात शिकत असताना अश्वत्थामा (जो गुरू दोणाचार्यांचा पुत्र होता) याला वाटले, की मी गुरू द्रोणाचार्याचा मुलगा असून गुरूंना मात्र अर्जुनच प्यारा आहे. तसे त्याने गुरूंना बोलून दाखवले. त्यावर अश्वत्थामाला घेऊन गुरू द्रोणाचार्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये गेले. एक झाडावर गुरूंनी एक नकली पोपट बांधला होता. गुरू द्रोणाचार्यांनी प्रथम युधिष्ठिराला त्या पक्ष्यावर बाणाने नेम धरायला सांगितले व विचारले, ‘आता तुला काय दिसतंय?’ त्यावर युधिष्ठिर म्हणाला, ‘आकाश, पृथ्वी.’ द्रोणाचार्य म्हणाले, ‘ठीक आहे.’ नंतर दुर्योधनाला सांगितले पक्ष्यावर नेम धरायला. नेम धरल्यावर दुर्योधनाला विचारले, ‘तुला काय दिसतंय?’ त्यावर दुर्योधन म्हणाला, ‘मला झाडाच्या पानांमध्ये दडलेला एक पक्षी दिसत आहे.’ गुरुदेव हसले व म्हणाले, ‘ठीक आहे.’ आता अश्वत्थामाला सांगितले, ‘त्या पक्ष्यावर नेम घर.’ अश्वत्थामाने पक्ष्यावर नेम धरला.

द्रोणाचार्यांनी अश्वत्थामाला विचारले, ‘तुला आता काय दिसत आहे?’ तेव्हा अश्वत्थामा म्हणाला, ‘गुरुदेव, मला आपले चरण, झाड आणि त्यात लवलेला पक्षी दिसत आहे.’ द्रोणाचार्यांनी ‘‘ठीक आहे’ म्हणत अर्जुनाला बोलावले व पक्ष्यावर लक्ष्य साधायला सांगितले. सर्वांना विचारलेलाच प्रश्न गुरू द्रोणाचार्यांनी अर्जुनाला विचारला. ते म्हणाले, ‘अर्जुना, तुला आता काय दिसत आहे?’ त्यावर अर्जुन म्हणाला, ‘मला फक्त पक्ष्याचं डोकंच दिसत आहे.’ नंतर परत गुरुदेवांनी विचारलं, ‘आता काय दिसतंय?’ त्यावर अर्जुन म्हणाला, ‘आता तर मला फक्त पक्ष्याचा एक डोळाच दिसतोय.’ त्यावर प्रसन्न होऊन गुरू द्रोणाचार्यांनी सर्व शिष्यांना सांगितले, ‘धनुर्विद्या शिकताना धनुर्धराला त्याच्या लक्ष्याच्या शिवाय दुसरे काहीच दिसता कामा ये.’

हे ऐकून अश्वत्थामाला आपली चूक कळून आली व तो द्रोणाचार्यांच्या पायावर डोके ठेवून म्हणाला, ‘मला माफ करा. मला माझी चूक कळून आली.’ त्यावर द्रोणाचार्य म्हणाले, ‘तू माझा पुत्र जरूर आहेस. माझा उत्तराधिकारी आहेस; पण तुझ्या मनात ईषा उत्पन्न झाली आहे. ती कधीही होऊ देऊ नकोस- कारण ईर्षा मनुष्याच्या मनाला वाळवीप्रमाणे खाऊन शकते. तू माझा जीवनप्रकाश असलास, तरी माझ्या गुरुकुलात सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनच आहे- कारण अर्जुनाची धनुर्विद्येतली एकाग्रता व लक्ष्याचा अचूक वेध घेणं या दोन्ही गोष्टी इतक्या प्रखर आहेत, की इतरांना त्या त्याच्या जवळपासही येऊ देत नाहीत.’

आजही आपण पाहतो, की ३५ मुलांना एका वर्गात एक शिक्षक शिकवत असतात; परंतु त्यातली काहीच मुलं ही शिक्षक जे शिकवत आहेत त्याचं अचूक आकलन करतात. इतरांना ते सर्व डोक्यावरून जात असतं.

जेव्हा मी चित्रपटाचे शूटिंग करत असते, तेव्हा फक्त आणि फक्त चित्रपटच माझ्या डोक्यात घोळत असतो. इतर कोणताही विचार मनाला स्पर्शूनही जात नाही. तन, मन, धन त्यातच लागलेले असते. जेव्हा एखादी सुंदर कलाकृती घडत असते, तेव्हा तितक्याच तादात्म्याने त्यात तुम्ही रंगून जात असता. तेव्हाच एखादं सुंदर शिल्प, कलाकृती, आविष्कार जन्माला येत असतो.

टॅग्स :Womens CornerTarget