दिलखुलास : कॉर्नर सीट्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Theater
दिलखुलास : कॉर्नर सीट्स

दिलखुलास : कॉर्नर सीट्स

- कांचन अधिकारी

मंडळी आपण जेव्हा नाटक बघायला जातो, तेव्हा रंगमंचाजवळच्या प्रथम, द्वितीय व तृतीय रांगेतली तिकीट बुक करतो. का? तर ही नाट्यकलाकृती सादर करणारी मंडळी, आपल्यासमोर जिवंत कलाकृती सादर करत असतात, तेव्हा त्यांच्या संवेदना आपल्यापर्यंत जिवंतपणी पोहोचत असतात. पृथ्वी थिएटरसारख्या ठिकाणी तर तुम्ही त्यांचे श्वासही ऐकू शकता, जाणवू शकता. त्यांच्या भावनांमध्ये आपल्या भावना नकळतपणे मिसळून जात असतात. अशा तऱ्हेने एखाद्या कलाकृतीचा आस्वाद हा मनापासून घेता येतो. परंतु, चित्रपट पाहताना मात्र आपण स्क्रीनपासून दूरच्या सीट्सचं बुकिंग करतो. का? तर पडद्यावरील चलत्‌चित्र जर तुम्ही फार जवळून पाहिलेत, तर तुमच्या डोळ्यांवर ताण येतो व दुरून पाहिले तर हा ताण कमी जाणवतो. तिथे एकदा का अभिनय केला, की तो रिळांमध्ये बंद होतो व परत जेव्हा त्याचं प्रोजेक्शन केलं जातं, तेव्हा तो पुन्हा जिवंत होतो व आपल्यापर्यंत पोहोचतो.

आता नाटक किंवा चित्रपट पाहायला जाण्यात लोकांचा अंतःस्थ हेतू काय असतो, यावरही त्यांचं बुकिंग अवलंबून असतं. नवरा बायकोला खूश करण्यासाठी नाटकाला नेतो, तेव्हा समोरच्या रांगेतल्या सीट्स बुक होतात. बायकोच्या केसांत मोगऱ्याचा गजरा माळलेला असतो. अशा वेळचं हे जोडपं २५ ते ३५ या वयोगटातलं असतं. चाळिशीच्या पुढे व साठच्या आत किंवा सहावी रांगही चालू शकते. सिनेमाला जाताना तरुण-तरुणींची कपल्स बुकिंग काऊंटरवर मुद्दाम कॉर्नर सीट्स मागतात व अगदी शेवटच्या रांगेतली शेवटची कॉर्नर सीट ही खास करून त्यांच्यासाठीच असते. कारण त्यांना चित्रपटात रस कमी असतो व ‘स्वतःचा चित्रपट’ रंगवण्यात ते जास्त दंग असतात.

अशा वेळेला अंधारात इतरांनी चित्रपट पाहावा व आपण आपला रोमँटिक चित्रपट साकारावा अशी त्यांची अपेक्षा असते. चित्रपट पाहून बाहेर आल्यावर दोघांचंही ब्लड सर्क्युलेशन वाढलेलं असतं; पण ते चित्रपट पाहून नाही, तर न पाहून. एकदा दोन जण म्हणजे कपल, असाच चित्रपट पाहायला गेले. कॉर्नर सीट्स मागितल्या. चित्रपटगृहात पोहोचले, तर चित्रपट आधीच सुरू झाला होता. डोअर-कीपरनं सीट्स दाखवल्या. दोघही अचंबित झाली- कारण एकाला एक कॉर्नर सीट आली होती व दुसऱ्याला दुसऱ्या कॉर्नरची सीट आली होती. शेवटी काही नाही. दोघंही समोर दिसणारा चित्रपट पाहून बाहेर आले. आहे की नाही गंमत!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Theaterwomens
loading image
go to top