दिलखुलास : वाढदिवस आणि ‘बर्थडे’

मुलांची लग्नं झाली, की त्यांच्या बायकांनाही नवऱ्याचा वाढदिवस साजरा करावासा वाटतो.
birthday
birthdayesakal
Summary

मुलांची लग्नं झाली, की त्यांच्या बायकांनाही नवऱ्याचा वाढदिवस साजरा करावासा वाटतो.

- कांचन अधिकारी

नुकताच माझ्या मुलाचा वाढदिवस झाला. मला एकच मुलगा, त्यामुळे त्याच्या वाढदिवसाला मी चक्क पंचपक्वान्नांचं ताट त्याला जेवायला द्यायची. दोन दिवस अगोदरपासूनच त्याला काय-काय आवडतं, मग ते कसं आपण बनवूया, असे विचार चालत. सकाळी लवकर उठून त्या सगळ्याची मी तयारी करून ठेवत असे आणि स्वतःच्या हातानं बनवून, काही दोन गोष्टी मागवून घेत असे. पण सुंदर चांदीच्या ताटात त्या सर्व पदार्थांना आपापल्या जागी सजवून प्रथम देवाला नैवेद्य दाखवून (त्याच्या हस्ते) मगच त्याला ते ताट जेवायला देत असे. तसंच औक्षणही करत असे. अजूनही करते. पण...

मुलांची लग्नं झाली, की त्यांच्या बायकांनाही नवऱ्याचा वाढदिवस साजरा करावासा वाटतो. जरूर करावा. सहजसुलभ भावना आहेत या; पण अशा वेळेला मुलांनीही आईनं पण आपला वाढदिवस कसा साजरा केला होता हे सांगावं. आमच्या मुलाच्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री त्यांच्या मित्रांची पार्टी झाली. उत्तम आहे. मी त्यात मध्ये लुडबुडा‌यला गेलेही नाही. कारण ठीक आहे, मलाही भरपूर मित्र-मैत्रिणी आहेत. त्याला त्याच्या मित्रांबरोबर एंजॉय करायचं असेल, तर त्यात काहीच गैर नाही. आदल्या दिवशी चार केक कापले गेले. ड्रिंक्स, डिनर होतंच. दुसऱ्या दिवशी मी म्हटलं, आता तो मोठा झालाय. त्याला त्याच्या पद्धतीनं करू देत साजरा. सकाळी त्याला फोन केला आणि सांगितलं, ‘‘वाढदिवसाच्या शुभेच्छा. देवळात जाऊन ये.’’

संध्याकाळी (म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी) आम्हा सर्व फॅमिलीसाठी डिनर ठेवलं होतं. जेवणाचा आस्वाद घेण्याआधी गप्पा सुरू होत्या. माझ्या नवऱ्यानं त्याला विचारलं, ‘‘काय रे आज देवाला नैवेद्य दाखवलास का? काय केलं होतं कांचननं? पुरणपोळी केली आहे का?’’ आणि त्यानं माझ्याकडे पाहिलं. मी म्हटलं, ‘‘या वेळचा वाढदिवस त्याच्या बायकोनं केलाय. मग मी मध्ये-मध्ये कशाला?’’ तरी मी त्याचं औक्षण केलं होतं.

थोडक्यात काय, तर आता वाढदिवस ‘बर्थडे’ झाल्यापासून घराचं डेकोरेशन, केक, ड्रिंक्स, डिनर वगैरे होतात; पण देवाला सकाळी नैवेद्य दाखवणं आणि औक्षण हे मात्र होत नाही. आपली संस्कृती आपणच नाही ठेवली, केक आणि मेणबत्ती हीच आपली संस्कृती होऊन बसेल!

प्रत्येकानं आपापल्या घरात मुलाचा, नातवाचा वाढदिवस साजरा करताना आपल्या संस्कृतीप्रमाणे करा. जोडीला केक कापा; पण आपली संस्कृती विसरून नुसताच केक कापाल, तर पुढच्या पिढ्यांना आपली संस्कृती कळणारच नाही. आजकाल घरातल्या वाढदिवसाच्या दिवशी, बाहेर हॉटेलात जेवायला जाण्याची जणू काही प्रथाच पडत चालली आहे. हॉटेलात केक मागवून हॅप्पी बर्थडे गाण्यावर तालात ठेका पकडून टाळ्या जरूर वाजवा; पण सकाळी तरी आपल्या पद्धतीनंच साजरा करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com