ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : इंधनाची कथा

प्राचीन काळापासून चूल आणि नंतर काही काळ कोळशावर अन्न शिजवले जाई. पुढे केरोसिनवर चालणारे स्टोव्ह बाजारात आले आणि हा एक क्रांतिकारी बदल होता.
gas cylinder
gas cylinderesakal

प्राचीन काळापासून चूल आणि नंतर काही काळ कोळशावर अन्न शिजवले जाई. पुढे केरोसिनवर चालणारे स्टोव्ह बाजारात आले आणि हा एक क्रांतिकारी बदल होता. कोणतीही नवीन गोष्ट बाजारात आली, की ती स्वीकारायला वेळ लागतो आणि स्टोव्हदेखील याला अपवाद नव्हता. खासकरून शहरात याचा वापर झपाट्याने सुरू झाला. जागेची कमतरता, सोय आणि स्वस्त इंधन म्हणून केरोसिन हे सर्वार्थाने सोयीचे होते. त्याआधी वापरात असलेली कोळशाची शेगडी उपयुक्त असली, तरी हवामानातील बदलांमुळे कोळसा पेटायला वेळ लागे, कोळसा साठवून ठेवणे, वापर करताना हात कपडे काळे होणे यामुळे थोडी गैरसोय होत असे. केरोसिनचे स्टोव्ह वापरणेदेखील काही फार सोयीचे होते असे नाही परंतु नावीन्याची ओढ, ट्रेंड आणि वापराच्या दृष्टीने कोळशाच्या शेगडीपेक्षा थोडा सोपा म्हणून स्वीकारला गेला आणि पुढे सर्रास वापर सुरू झाला.

केरोसिनचे स्टोव्ह सुरू करणे म्हणजे एक मोठे काम असे. केरोसिन भरणे, नीट लक्षपूर्वक स्टोव्हची तपासणी करणे, गळती होत नाही ना याकडे बारकाईने लक्ष ठेवणे, बर्नरची पिन किंवा वात योग्य मापाची ठेवणे, बर्नर खास स्टोव्हच्या पिनने साफ करणे, आणि हे सारे सायास झाले, की मग स्टोव्ह पेटवणे. यावर स्वयंपाक करणे म्हणजे वेळेची नि कामांची आखणी करावी लागे. कारण एकदा सुरू केलेला स्टोव्ह मध्ये न विझवता सलग जेवण शिजवून मोकळे व्हावे लागे. कारण पुनःपुन्हा स्टोव्ह चालू करणे म्हणजे एक वेळखाऊ काम असे. हवी ती खबरदारी घेऊनही कित्येकदा स्टोव्ह विझे आणि पुन्हा चालू करावा लागे. हे केरोसिनचे स्टोव्ह म्हणजे महिलावर्गाचा जिव्हाळ्याचा विषय. माहेरहून लग्नात स्टोव्ह रुखवतात दिला जात असे.

त्यामुळे दागिने, साड्या यांसारखाच हा स्टोव्हसुद्धा त्यांचा लाडका असे. त्याकाळच्या ट्रेंडप्रमाणे स्टोव्ह घरात असणे म्हणजे आधुनिकतेचे लक्षण त्यामुळे ही प्रत्येकाकडे किमान एक स्टोव्ह तरी असेच.

पुढे एलपीजी गॅस बाजारांत आला; परंतु केरोसिन स्टोव्हची सवय असणाऱ्या महिला नवीन इंधन स्वीकारायला उत्सुक नव्हत्या. एलपीजी सिलेंडरबाबत अनेक चुकीच्या समजुतीही होत्या. ‘गॅस सिलिंडर म्हणजे एक बॉम्ब आहे, युद्धात विमानातून जे बॉम्ब टाकले जातात तेच उरलेले सिलिंडर आता आपल्याला वापरायला सांगत आहेत. तेव्हा घरात कोण असा जिवंत बॉम्ब ठेवणार’ इत्यादी. त्याचसोबत हा गॅस ड्रेनेजमधून तयार झालेला गॅस असल्याचा मोठा गैरसमज पसरला होता. यामुळे त्याकाळात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्याला कडाडून विरोध केला. घरात वयस्कर मंडळीचा शब्द प्रमाण मानला जात असल्याने अनेकांनी गॅस सिलिंडर दीर्घकाळ घेतला नाही. याला अजून एक कारण होते, ते म्हणजे सांडपाण्यातून बाहेर पडणाऱ्या मिथेन वायूच्या वासाशी या दुर्गंधीचे साधर्म्य असल्याने एलपीजी असाच सांडपाण्यावर तयार झालेला आहे असा समज पसरला होता. एलपीजीला नाकारण्याचे अजून एक कारण होते ते म्हणजे किंमत. १५ किलोच्या एक सिलिंडरला त्याकाळी १८ रुपये ५० पैसे लागत, तर केरोसिन दीड रुपया आणि कोळसा २ रुपये किलोमध्ये मिळे.

लोकांनी गॅस सिलिंडर घ्यावेत याकरता अनेक प्रकारे जाहिरात करावी लागली, वेगवेगळे गैरसमज, भीती दूर करायला बराच काळ लागला.

अनेक ठिकाणी गॅसवर स्वयंपाक करणे किती सोपे आणि सोयीचे आहे हे लोकांना समजावे याकरता चौकात त्याचे प्रात्यक्षिक दिले जाई. माध्यमांमधूनदेखील जागरूकता अभियान चालवले गेले. दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश येऊन गैरसमज, भीती दूर झाली आणि शहरांत गॅस सिलिंडरचा वापर बऱ्यापैकी सुरू झाला. माऊथ पब्लिसिटीमुळे पुढे मागणी इतकी वाढली, की अनेक जणांना वेटिंग लिस्टवर वाट पाहावी लागली.

सन २०१५ मध्ये केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री उज्ज्‍वला’ योजनेअंर्गत देशातील दारिद्रयरेषेखालील लाखो महिलांना मोफत घरगुती एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून दिले. ग्रामीण भागात पांरपारिक पद्धतीने स्वयंपाक करताना धुरामुळे डोळ्यांवर व शरीरावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी ही योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे महिलांचे सक्षमीकरण झालेच, त्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेताना पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास थांबविण्यात ही योजना यशस्वी ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com