ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : स्वादयात्रेत ‘टिकून राहिलेली’ रुची

भावार्थ : दुर्गम पर्वत दुरूनच सुंदर वाटतात, त्याचप्रमाणे युद्धाचे वर्णनही निव्वळ ऐकायला ठीक वाटते; परंतु प्रत्यक्षात भयभीत करणारे असते.
Food
FoodSakal

युद्धस्य तु कथा रम्या त्रीणि रम्याणि दूरतः||

भावार्थ : दुर्गम पर्वत दुरूनच सुंदर वाटतात, त्याचप्रमाणे युद्धाचे वर्णनही निव्वळ ऐकायला ठीक वाटते; परंतु प्रत्यक्षात भयभीत करणारे असते. त्यामुळे हे जितके दुरून पाहू तितके श्रेयस्कर. मागील शतकातील युद्धांची वर्णने अंगावर काटा आणतात. युद्धकाळात प्रत्येक गोष्टीवर बंधन लादले जाते आणि त्याही आधी मोठा परिणाम अन्नावर होतो. युद्धाच्या काळात कधी कधी त्यातून काही चांगल्या गोष्टीदेखील घडू शकतात. युद्धाच्या धुमश्चक्रीत अनेक नवीन प्रयोग केले जातात आणि त्यातून काही लोकोपयोगी गोष्टींचा शोध लागतो. उदाहरणार्थ, Canned food किंवा canning हा असाच युद्धात सैनिकांच्या रसदीकरता लागलेला शोध. झाले असे, की अठराव्या शतकाच्या सुरुवातीला नेपोलियन बोनापार्ट याने सैनिकांकरता अन्न दीर्घकाळ टिकेल असे संशोधन व्हावे म्हणून बक्षीस जाहीर केले. तेही थोडके नव्हे, तर बारा हजार फ्रँक्स इतके. निकोलस अपर्ट या फ्रेंचमनने शॅम्पेन बॉटलमध्ये ग्रेव्हीमध्ये शिजवलेले मीट प्रिझर्व्ह करण्याचा यशस्वी प्रयोग केला आणि अर्थातच बक्षीसपात्र झाला. खरे तर तो शेफ आणि ब्रूअर म्हणून काम करत होता; परंतु चौकस बुद्धी आणि असीम इच्छाशक्तीच्या जोरावर प्रयोगांती त्याने हे सिद्ध करून दाखवले आणि आज निकोलस याला ‘कॅनिंगचा जनक’ म्हणून संबोधले जाते. खरेच त्याचा हा शोध मानवाकरता अतिशय मौल्यवान ठरला. टोकाच्या वातावरणात अन्नपदार्थ टिकवणे हे सर्वांत मोठे आव्हान होते. युद्धकाळात आणि खलाश्यांकरता कॅनिंग केलेले अन्न हे वरदान ठरले.

कॅनिंग जागतिक बाजारपेठेत फार महत्त्वाची भूमिका बजावते. कॅनिंग म्हणजे अन्न दीर्घकाळ जतन करायची पद्धत- ज्यात काच, स्टील किंवा टिनमध्ये अन्न हवाबंद करून अनेक तास पाण्यात ते उकळणे आणि या प्रक्रियेतून त्यात असलेल्या सूक्ष्मजंतूंचा नाश करणे- जेणेकरून आतील पदार्थ डबा उघडेपर्यंत ताजा राहील. असे कॅन केलेले पदार्थ एक वर्ष ते पाच वर्षापर्यंत ताजे राहू शकतात. इतकेच नव्हे, तर अमेरिकेत शंभर वर्षांपूर्वी समुद्रात बुडलेल्या जहाजातील टिन उघडले असता त्यातील अन्न खाण्यायोग्य असल्याचे दिसून आले.

Tuna Sandwich
Tuna SandwichSakal

पहिल्या महायुद्धात कॅन फूडचा वापर प्रचंड वाढला, सैनिकांच्या जेवणाकरता हा सर्वोत्तम पर्याय होता. युद्धात सैनिकांपर्यंत ताजे गरम अन्न पोचवणे हे मोठे आव्हान होते. बहुतांशी वेळेस त्यांच्या हातात अन्न पोचणे एक तर कठीण होत असे किंवा खराब झालेले तरी असे. अशा वेळी कॅन फूड मात्र पौष्टिक अन्न मिळवण्याचा सर्वांत सोपा उपाय होता. असे असले, तरी पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सैनिकांना मिळणारे कॅन फूड कमी प्रतीचे असल्याने अर्धपोटी नाखूष सैनिक सातत्याने आंदोलन करत.

अमेरिकन सिव्हिल वॉर काळात कॅन फूडला चालना मिळाली आणि नंतर कॅन फूड अमेरिकन संस्कृतीचा जणू भाग झाला. कॅन फूडचा प्रवास युद्धभूमीवरून स्वयंपाकघरात इतका अलगद झाला, की ते लोकांच्या कधी अंगवळणी पडले हे कळलेच नाही. सन १८६० पर्यंत तांत्रिक प्रगतीमुळे कॅन फूड मेकॅनिकली होऊ लागले. यामुळे लोकांना दूर देशाचे निरनिराळे पदार्थ चाखायला मिळाले. सीझनल पदार्थ कॅन करून वर्षभर वापरात येऊ लागले. दोन्ही महायुद्धामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली होती. अख्खी तरुण पिढी देशकरता लढत असताना पाठी राहिलेल्या स्त्रियांना पुरुषांची काम करावी लागत होती. देशबांधणीकरता स्त्रियांनी घराबाहेर पडणे, पडेल ते काम करणे आवश्यक बनले आणि अशा वेळेस कॅन फूडने त्यांना भक्कम साथ दिली. दिवसभर घराबाहेर राहून कामाने थकलेली स्त्री घरी परतल्यावर चटकन स्वयंपाक तयार करून पोराबाळांचे पोट भरू शकली तेही कॅन फूडमुळेच.

या मधल्या काळात कॅन फूड निव्वळ स्टेटस सिम्बॉल न राहता ती गरज आणि सवय झाली. नानाविध पदार्थ कॅन मध्ये उपलब्ध झाले. पुढे बेबी बूम काळातही कॅन फूडचे आकर्षण ओसरले नाही. भारतातही फळ, मिठाई, मोसमी फळांचे रस, याकरता याचा अनेक वर्षे वापर होत आहे. एकूणच कॅन फूड स्वस्त, सुरक्षित, मुबलक आणि विश्वासार्ह असल्याने पाश्चिमात्य देशात त्यांच्या आयुष्यात याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज ही इंडस्ट्री जवळपास ११८ अब्ज डॉलर्सची आहे आणि एकट्या अमेरिकेत १३० अब्ज कॅन्स वर्षभरात वापरले जातात. एशिया पॅसिफिक प्रदेश येत्या काळात कॅन फूड इंडस्ट्रीकरता मोठे मार्केट म्हणून समोर येत आहे आणि ही भारतीय फूड इंडस्ट्रीकरता मोठी संधी आहे. तर आज याच विषयासंदर्भात एक छानशी रेसिपी पाहूयात.

ट्युना सँडविच

साहित्य : १ कॅन ट्युना विथ ऑइल (फ्लेक्स), २ टेबलस्पून स्वीट रेलीश (कँड पिकल), १ कप मेयॉनीज, पाव कप सॅलरी बारीक चिरून, पाव कप कांदा बारीक चिरून, २ लसूण बारीक चिरून, १ चमचा लिंबाचा रस, थोडेसे मीठ आणि काळी मिरी पावडर.

कृती :

  • हा कोल्ड सँडविच प्रकार आहे. तयार करायच्या आधी सर्व पदार्थ फ्रीजमध्ये १० मिनिटे थंड करून घ्या.

  • ट्युना फ्लेक्स, रेलीश, मेयॉनीज, सॅलरी, कांदा, लसूण नीट मिक्स करून घ्या. वरून थोडे मीठ, काळी मिरी पावडर आणि लिंबाचा रस एकत्र करून फ्रीजमध्ये १० मिनिटे ठेवा आणि मग साध्या किंवा टोस्टेड सँडविच ब्रेड वर भरपूर बटर लावा, त्यावर ट्युनाचे मिश्रण लावन सॅलेड लिफ ठेवा आणि सँडविच तयार करा.

  • गरम कॉफीसोबत सर्व्ह करा.

कॅन केलेला ट्युना ब्राईन, ऑइल आणि निरनिराळ्या सॉस सोबत येते. त्याच्या विशिष्ट चवीमुळे जगभर आवडीने हा मासा खाल्ला जातो. ह्या चविष्ट माश्याचे सँडविच अतिशय छान लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com