Video : मासिक पाळी आणि महिलांचे आरोग्य याबद्दल माहितीच हवं, वाचा सविस्तर

Video : मासिक पाळी आणि महिलांचे आरोग्य याबद्दल माहितीच हवं, वाचा सविस्तर

डॉ. ममता दिघे, स्त्रीरोगतज्ज्ञ
‘स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी...’ अशा निराशाजनक वाक्याने आपल्या स्त्रीत्वाकडे अजूनही काही स्त्रिया पाहताना दिसतात. पाळी, त्यामुळे येणारी बंधने यामुळे अनेक तरुणी त्याविषयी चिडचिड करताना दिसतात. वास्तविक पाहता, पाळी येणे हे स्त्रीत्वाचे द्योतक आहे आणि निसर्गाने आपल्या कुशीत केवढी मोठी खुशी दिली आहे, हे समजून घेणे त्यामुळेच खूप गरजेचे आहे.

प्रत्येक मुलगी जन्म घेतानाच आपल्या कुशीत बीजांचा एक विशिष्ट साठा घेऊन जन्माला येते आणि वयात आल्यापासून पाळी जाईपर्यंत हा साठा बीज पक्व होऊन बाहेर टाकले जाऊन कमी कमी होत जातो. सृजनाची एवढी मोठी देणगी आपल्याकडे असते आणि आपल्याला मात्र त्या शक्तीचा, त्यामुळे आपल्याला होणाऱ्या लाभाचा काहीच पत्ता नसतो. पाळीचा संबंध केवळ मूल जन्माला घालण्याशी नाही. एकूणच स्त्रीचे आरोग्य चांगले राहावे, तिचे तारुण्य, सौंदर्य, हाडांचे, स्नायूंचे आरोग्य टिकावे यासाठी पाळी नीट येणे, वेळेवर येणे या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. स्त्रीस्वास्थ्याचा याच्याशी अगदी जवळचा संबंध असतो. अलीकडच्या काळात असे दिसून येते आहे, की वंध्यत्वाच्या समस्या वाढीला लागल्या आहेत, रजोनिवृत्ती लहान वयातच येऊ लागली आहे. या सगळ्यामुळे शारीरिक, मानसिक बदल होऊन स्त्रियांचे आरोग्य बिघडत चालले आहे. या लेखाचा उद्देश आहे आपल्याला जाणीव करून देणे, की आपल्या अंडाशयात जन्मतः जो बीजांचा साठा असतो तो कमी कमी होत गेला आणि आपण गर्भधारणेचा विचार वेळेवर न केल्यास समस्या उद्भवू शकते. वय कमी-जास्त असू शकते; पण त्यानुसारच बीजसाठा असेलच असे काही नाही. प्रत्येक स्त्रीचा बीजसाठा, तो कमी होण्याचा दर, हे सगळे वेगळे वेगळे असते. करिअरमुळे किंवा उशिरा विवाह केल्यामुळे मूल लवकर होऊ दिले नसल्यास गर्भधारणेला, खालावत गेलेल्या बीजसंख्येमुळे अडचण निर्माण होऊ शकते. यासाठी आपला बीजसाठा किती आहे, याचे वेळीच परीक्षण करून, ज्या तरुणींना गर्भधारणा लांबवायची आहे त्यांना डॉक्टरच्या सल्ल्याने पावले उचलता येतील. 

वाढत्या वयामुळे बीजसाठा कमी होतो, या सत्याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. अन्य काही कारणांमुळे कमी वयातही असे होऊ शकते. आयफोन, आयपॅडच्या या जमान्यात, जीवशास्त्रीय साक्षरता वाढण्याचीही खूप गरज आहे. आपल्या शरीरातल्या या महत्त्वाच्या बाबींविषयी माहिती करून घेणे अतिशय आवश्यक आहे. जाणीव आणि जागृती असल्यास समजून उमजून निर्णय घेणे आणि आपल्या कुशीतले हे सौख्य अनुभवणे सहज शक्य होईल.

प्रत्येक तरुण स्त्रीने हे आवर्जून केले पाहिजे
खाणे, झोपणे, एकूणच जीवनशैली आरोग्यपूर्ण ठेवणे.
मासिक पाळी नियमित नसल्यास योग्य वेळी 
उपचार घेणे.
आपला बीजसाठा किती शिल्लक आहे, याचे परीक्षण करून घेऊन त्यानुसार गर्भधारणेचा विचार करणे.
उपलब्ध वैज्ञानिक 
सुविधांचा वापर करणे.
आपल्या शरीराविषयी, आरोग्याविषयी जागरूक असणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com