घरकुल अपुले : ‘मूल्य’वान घर

तुम्ही म्हणाल हा कुठला घराचा प्रकार? घरासाठीची विशेषणं म्हणाल तर टुमदार, कौलारू, चौसोपी वाडा, फ्लॅट, प्रशस्त बंगला, रोहाऊस असं काहीसं!
Family
FamilySakal
Summary

तुम्ही म्हणाल हा कुठला घराचा प्रकार? घरासाठीची विशेषणं म्हणाल तर टुमदार, कौलारू, चौसोपी वाडा, फ्लॅट, प्रशस्त बंगला, रोहाऊस असं काहीसं!

- मीनल ठिपसे

तुम्ही म्हणाल हा कुठला घराचा प्रकार? घरासाठीची विशेषणं म्हणाल तर टुमदार, कौलारू, चौसोपी वाडा, फ्लॅट, प्रशस्त बंगला, रोहाऊस असं काहीसं! पण नुसत्या विटा माती सिमेंटनी घर नाही ना बनत; त्या घरात राहणाऱ्यांच्या जाणीवा, त्यांचे विचार, कुटुंब म्हणून त्यांचे भावबंध, त्यांचं राहणीमान यांनी बनतं घर!

दुधाच्या पिशव्या अगदी शिस्तीत कापून गरम पाण्यानं धुवून, कोरड्या करून विकणं, रद्दी वेळेवर नीट बांधून देऊन टाकणं, घरात सविस्तर कॅलेंडर असणंच असणं आणि त्यावर महत्त्वाच्या नोंदी असणं, मिक्सरचा वापर झाल्यावर मिक्सरचं भांडं, ताक केल्यावर रवी आणि कांदा लसूण चिरल्यावर सुरी कोमट पाण्यानं धुवून पुसून जागेवर जाणं, संध्याकाळी घरी आल्यावर हात-पाय धुवून देवासमोर दिवा लावणं या काही टिपिकल गोष्टी म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबाचा पाया असतो. अर्थात नियमाला अपवाद असतातच; पण बहुतांश घरी हेच!

यांच्याकडची लग्नंसुद्धा टिपिकल. उगाच उसनं अवसान न आणता थोडक्यात हौसमौज. सगळ्या गोष्टींकडे नीट लक्ष. घरातील मावशा, आत्या वगैरे सतत कुठल्या ना कुठल्या पिशव्या, आहेर देणंघेणं यांत! एखाद्या हुशार आजीबाईंना दागिन्यांची पिशवी घेऊन नीट बसवलेलं असतं.

ढोबळमानानं संज्ञा मांडणं सोपं आहे म्हणाल; पण मी स्वतः एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेय आणि आजूबाजूला अशी अनेक कुटुंबं पाहते. अर्थात आधुनिक विचारसरणीचा अवलंब हल्ली सगळीकडेच सर्रास बघायला मिळतो, तरीही जुन्या-नव्या गोष्टींची उत्तम सांगड घालण्याचा प्रयत्न असतो यांचा.

महिन्याचे हप्ते, पोरांच्या शाळेच्या क्लासच्या फिया, आपल्याभोवती चटकन मिळणाऱ्या गोष्टींची ओढ वाटणाऱ्या मुलांची काळजी हे सगळं करूनही अनेकजण अतिशय हौशी असतात, आहे ते छोटंसं घर नीटनेटकं ठेवणं, सकाळ संध्याकाळ घरी थोडकाच; पण ताजा स्वयंपाक असणं, कुटुंबानं हास्यविनोद करत एकत्र जेवणं, ‘उरलेली आमटी.. कोशिंबीर घे रे तू... घे गं तू’ करत गप्पा मारत संपवून टाकणं, मुलांनी पानं घ्यायला मदत करणं, गाद्या घालणं हे नेहमीचंच. आयुष्य जास्त सुंदर आणि सोपं. अर्थात आभाळाएवढी स्वप्नं त्यांचीही असतात. बऱ्याच घरात नवरा-बायको दोघंही नोकरी करणारे असतात, तरी वायफळ खर्च कमी. भाजीवाल्यांशी चार-पाच रुपयांवरून घासाघीस खरं तर करू नये; पण ‘घासाघीस न करता उगाच काय सांगेल त्या किमतीला विकत घ्यायच्या वस्तू’ असा काहीसा सूर असतो; पण हेच आपल्या मदतनीस बाईची काही नड असली, तर न मागताही पाच पन्नास रुपये जास्तीचे प्रेमाने दिले जातात, तिच्या मुलांसाठी खाऊ आणि ‘मुलांना शिकू देत गं.. काही लागलं तर हक्कानं सांग’ असं आर्जवी स्वरात बजावलं जातं.

छोट्या छोट्या गोष्टींत सुख मानणारी माणसं, नवऱ्यानं गजरा आणला तरी आभाळ ठेंगणं झाल्याचा आनंद होणारी बायको! वाण सामानाच्या यादीत जरा इकडचं तिकडं न चालणं, गिझर लावण्यापेक्षा गॅस गिझर किंवा सोलरची व्यवस्था, रोज घरी विरजणाचं दही लावणं, पंधरवड्यातून किंवा महिन्यातून एकदा ताजं घरचं पांढरं लोणी, बेरीसुद्धा साखर घालूनचाटून पुसून संपवून टाकणं, ‘कोथिंबिरीच्या काड्या बांधून आमटीत घाल गं; अगदी सुरेख वास येतो,’ असा प्रेमळ सल्ला देणारी सासू.

काटकसर असली, तरी हौसमौजच नाही असं आजिबात नाही. छान ठरवून वर्षातून एकदा कौटुंबिक सहल, घरात आल्या-गेल्याचं कोडकौतुक, नीट पाहुणचार, लहान मुलांचे लाड, कधीतरी एखादा छानसा चित्रपट, नात्यांच्या गोतावळ्यात आयुष्याची शिदोरी बांधणं! पानात वाढलेलं नीट संपवायचंच बरं का, असा मुलांना दंडकच असणं. फाजील लाड मात्र पुरवले जात नाहीत. हॉटेलमध्ये डिशच्या नावाच्या आधी किमतीचा आकडा बघितला जातो. वार्धक्यसुद्धा आनंदात; नातवंडं, पतवंडं यांना संस्कार देण्यात समाधानात जगणं! स्वतःची तत्त्वं आणि मूल्यं हाच सर्वांत मोठा ठेवा जवळ बाळगणं. अगदी साधं आणि समाधानी आयुष्य कसं जगावं याची गुरुकिल्लीच पुढच्या पिढीच्या हाती देतात ही घरं.

अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती आणि पैसा हा मुद्दा बाजूलाच ठेऊया... प्रत्येकाचं नशीब वेगळं; पण समाजातील हा स्तर अनेक गोष्टींना सामावून घेतो, समाजाची घडी नेटकी ठेवण्यात यांचाही बराच मोठा वाटा असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com