ट्रॅक्टर चालवणारी ‘कृषिभूषण’

संपत मोरे
Friday, 28 February 2020

नूतनवैनी संगणकावर काम करायलाही शिकल्या आहेत. शेतात भांगलण करण्यापासूनची सगळी कामं त्यांना महत्त्वाची वाटतात. कष्टाला पर्याय नाही, हे त्यांचं तत्त्वज्ञान आहे.

आपण कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावातील मुख्य चौकात सायंकाळी सहा साडेसहा वाजता असाल, तर आपल्याला एक दृश्य दिसतं आणि आपण त्या दृश्यातील व्यक्तीची चौकशी करायला लागतो. दृश्य असं असतं की, साठीकडं झुकलेली स्त्री जीपगाडी चालवत आपल्यासमोरून जाते. आता आपण शहरात चारचाकी गाड्या चालवणाऱ्या स्त्रिया पाहतो. मात्र, तुम्ही रेठरे गावात गाडी चालवणाऱ्या स्त्रीला पाहता तेव्हा ते आश्चर्य वाटतं आणि मग त्याच आश्चर्यातून तुम्ही कोणाला विचारल्यास तो सहज माहिती देतो, ‘अहो, त्या नूतनवैनी हायेत. जीपच काय घेऊन बसलात, त्या बैलगाडीबी चालवत्यात आणि ट्रॅक्टरबी...’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नूतन मोहिते लग्न होऊन सासरी आल्यावर त्यांना वाटलं नव्हतं, आपल्याला शेतीत प्रत्यक्ष काम करावं लागंल. पण त्यांचे सासरे आबासाहेब मोहिते यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर शेतीचा सगळा भार त्यांच्या पतीवर पडला. पतीची एकट्यानं शेती करताना धावपळ व्हायला लागली. मग एक दिवस पतीला साथ द्यायचा निर्धार करत त्यांची पावलं रानाच्या दिशेनं पडली. माहेरी असल्या कामाची सवय नव्हती, पण समृद्ध भूतकाळाचा विचार न करता समृद्ध भविष्यकाळ निर्माण करायला त्यांनी परिश्रम घ्यायला सुरुवात केली. अनेकदा प्रतिकूल परिस्थिती आली, पण त्यावर त्यांनी मात केली. शेतीत काम करताना ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा करायची नसते. दिवस-रात्रही बघायची नसते. त्या सांगतात, ‘मी अनेकदा लहान बाळाला कडेवर घेऊन शेतात पाणी पाजायला गेले आहे.’

शेतीतील कामाची कसलीही ओळख नसताना त्यांनी सगळी कामं शिकून घेतली. शेतीत नवीन प्रयोग केले. चांगलं उत्पन्न मिळवलं. अगोदर बैलानं शेती केली, नंतर ट्रॅकटर घेतला. शेतीसाठीची सर्व कौशल्यं त्यांनी शिकून घेतली. नूतनवैनी संगणकावर काम करायलाही शिकल्या आहेत. शेतात भांगलण करण्यापासूनची सगळी कामं त्यांना महत्त्वाची वाटतात. कष्टाला पर्याय नाही, हे त्यांचं तत्त्वज्ञान आहे. त्यांच्या शेतीतील कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनानं त्यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं आहे.

- मराठी राजभाषा दिन : मराठी माध्यमातून 'यूपीएससी'ला सामोरे जाताना...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nutun mohite article