
मुलगी लग्नानंतर सासरी कितीही तन-मन-धनाने रुळली, आनंदात राहिली, तरीही तिला वाटणारी माहेरची ओढ, माया, आपुलकी कधीच कमी होत नाही.
माझिया माहेरा : माझे ‘आनंद’वन
- प्राची अरकडी-पाथरकर, पुणे
मुलगी लग्नानंतर सासरी कितीही तन-मन-धनाने रुळली, आनंदात राहिली, तरीही तिला वाटणारी माहेरची ओढ, माया, आपुलकी कधीच कमी होत नाही. हृदयी कायम माहेरी घालवलेल्या क्षणांचा एक हळवा, आनंददायी कप्पा दडलेला असतोच मैत्रिणींनो. आज पतीसोबत पुण्यात छान रमले आहे मी; पण जेव्हा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणा वा सणवारांच्या- जेव्हा मी माझ्या आई-वडिलांना भेटायला माहेरी जात असते, तेव्हा वेगळाच एक आनंद, उत्साह असतो. माझे माहेर जळगाव खान्देशातील. सुंदर, छान टुमदार घर, घराच्या पुढे मोकळे अंगण, विविध प्रकारची फुलझाडे लावलेली. आईला माझ्या विविध प्रकारची फुलझाडे लावण्याची खूपच आवड आहे. गाडीतून उतरल्यावर जेव्हा माहेरच्या अंगणी पाऊल टाकते, तेव्हा येणारा फुलांचा मंद गोड सुवास मनाला खूपच शीतलता देऊन जातो. आईने अंगणात, औदुंबर, प्राजक्त, आंबा, जाई-जुई, जास्वंद अशी अजून बरीच झाडे लावून अंगण सजवले आहे.
माझ्या माहेरच्या परिवार मी, आई-बाबा, माझा मोठा भाऊ- वहिनी, तिची मुले. तसा आमचा माहेरचा परिवार मोठा आहे; पण सगळे कामानिमित्त वेगळे राहतात. पण सणवार वा कार्यक्रमानिमित्त सगळे आम्ही नेहमी एकत्र येत असतो. घरच्यांसोबत बाकीच्या आपल्या परिवारातील सदस्यांवरही प्रेम असले पाहिजे, ही मला आई-वडिलांकडून मिळालेली शिकवण. त्यामुळे आमच्याही घरी सतत येणारे जाणारे असत. कोणी केव्हाही येवो- त्यांचे स्वागत अगदी हसतमुखाने होणार आई-बाबांकडून. माझी आई तर खूप सुगरण. तिला वेगवेगळे पदार्थ करायला व ते इतरांना खाऊ घालायची खूपच आवड. कधीही केव्हाही कोणी येवो- तिला काहीतरी करून खाऊ घातल्याशिवाय जाऊ देत नसायची. तिच्या कपाळावर आठ्या पडलेल्या वा त्रासलेला चेहरा मी कधीच पाहिला नाही. आजही तिचा तो गुण वाखण्यासारखा आहे. त्यामुळेच तिचा तो गुण माझ्यात आला आहे, असे बाकीचे सदस्य म्हणतात, तेव्हा मी स्वतःला खूप नशीबवान समजते. आई - बाबांकडून थोडेफार का होईना चांगले कलागुण माझ्यात आहेत तेही त्यांच्या संस्कारक्षम वागणुकीमुळे.
माहेरी गेल्यावर माझी सगळ्यांत आवडती गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर एकत्र बसून तिच्या हातचा गरमागरम चहा घेणे आणि रात्री जेवण झाल्यावर अंगणात प्राजक्ताच्या झाडाखाली खुर्ची टाकून त्यावर बसून मनसोक्त आई- बाबांबरोबर गप्पा मारणे. आई- वडिलांकडूनच आमच्यावर सगळे- मग ते रितीरिवाज असो, धार्मिक गोष्टींचे असोत- संस्कार आमच्यावर झाले. माझ्या माहेरी आई-वडील सगळ्यात मोठे. नंतर काका- काकू; पण आजही त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे, आपलेपणाने सगळी नाती जपत आल्यामुळेच त्यांना घरातील इतर सदस्य खूप मान देतात आजही. माझ्या सासरकडील मंडळीही खूप छान आहेत स्वभावाला, तीही खूप प्रेमळ- माया लावणारी आहेत. आजही मी माहेरी जळगावला गेले, की आईला माझ्या आवडीचे पदार्थ करून खायला घालायला तिची नेहमीच लगबग सुरू असते. त्यामुळे माहेरी कधीही जाताना माझ्या मनात एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो. असे हे माझे आनंदनवन फुलवणारे माहेर. शेवटी एकच सांगते मैत्रिणींनो- माहेर ते माहेर असते. त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
Web Title: Prachi Arkadi Patharkar Writes Majhia Mahera
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..