esakal | वूमनहुड : ‘राणी’ची बाग... 
sakal

बोलून बातमी शोधा

वूमनहुड : ‘राणी’ची बाग... 

जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून एक व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार करून नाट्य कार्यशाळा सुरू केली.आमचे लॉकडाउनचे २१ दिवस मंतरलेले होते. त्याचीच यशस्वी कहाणी तुमच्यासाठी.

वूमनहुड : ‘राणी’ची बाग... 

sakal_logo
By
रानी (राधिका देशपांडे), अभिनेत्री

माझी एक बाग आहे छोटीशी. ही बाग आहे नाट्यवेड्यांची. माझ्या चिमुकल्या बालमित्रांची. ते फुलझाडांसारखेच निष्पाप, निरागस, कोमल. त्यांना खतपाणी घालणे, देखभाल करणे आणि पोषक वातावरण देण्याचे काम बागबानाचं, म्हणजे माझं. एखाद्या नाण्याप्रमाणं अभिनेत्री आणि बालनाट्य शिकवणारी दिग्दर्शिका, लेखिका-शिक्षिका ही माझी दुसरी बाजू. माझी ही बाग गेली पाच वर्षं मी पुण्यात वाढवलीय. मला याचं बाळकडू माझ्या वडिलांकडून मिळालं. उन्हाळ्याच्या सुट्टीत ही बाग अधिकच खुलते, पण सध्या कोरोना व्हायरसमुळं मी ही बाग व्हर्च्युअली वाढवायचं ठरवलं. जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून एक व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार करून नाट्य कार्यशाळा सुरू केली. आमचे लॉकडाउनचे २१ दिवस मंतरलेले होते. त्याचीच यशस्वी कहाणी तुमच्यासाठी. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मला या जगात ‘रॅडी’ (Raddy) नावाने ओळखतात. मी दिलेलं नाट्य टास्क २४ तासांत पूर्ण करून त्याचा व्हिडिओ करून पाठवायचा, असं ठरलं. टास्क पटकन आणि चांगले करणाऱ्याला व्हर्च्युअल मार्बल मिळणार. मी मुलांमध्ये मानसिक, भावनिक आणि शारीरिक विकास करण्याचा प्रयत्न केला. 

१. टंग ट्विस्टर 
शब्दांची गंमत, त्यांचा खेळ, त्यांच्याकडं बघायला आणि प्रेम करायला शिकवलं. 

२. झाडू मारणं 
कलाकाराला पडेल ते काम करता आलं पाहिजे. 

३. मास्टर शेफ 
स्वयंपाक करायचा एक दिग्दर्शक बनून. भाज्यांचे गुणधर्म ओळखायचे आणि त्यांना पदार्थ रूपात तयार करायचं. 

४. गुपित सांगणं 
आई-बाबांनी त्यांच्या लहानपणी केलेल्या खोड्या, गमती सांगायच्या. त्याने जवळीक वाढते आणि विश्वास निर्माण होतो. 

५. एलियन होणं 
अद्‌भुत आणि बिभित्स रस मुलांना आवडतो. कारण आपण कधीच करू किंवा बनू शकत नाही, ते आपल्याला करून पाहावं वाटतं. मुलांनी कल्पनाशक्तीला ताण दिला. त्यांचा चेहरा रंगवला. 

६. मंत्र 
एक मंत्र पाठ करून जादूगारासारखा म्हणून दाखवायचा होता. देहबोलीचा वापर केला. आत्मबळावर जागृती वाढवून प्रतिकाराची भावना निर्माण केली. 

७. माझ्या ५ आवडत्या गोष्टी 
आपण स्वतःला किती ओळखतो, आपल्याला कोणत्या गोष्टी खरंच आवडतात, ह्याची जाणीव करून दिली. 

८. गोष्ट लिहिणे. 
पाच शब्दांवरून गोष्ट तयार करण्यास सांगितलं. विचार करणं, व्यक्त होणं , मुक्त होणं आणि भावनाविष्कार प्रबळ करणं. 

९. मुखपृष्ठ 
आपण लवकरच भेटणार आहोत, असं सांगत आणि भेटल्यावर दाखविण्यासाठी आपलं टास्क एका वहीत चित्र आणि लेखी स्वरूपात लिहून ठेवायला सांगितलं. त्या वहीसाठी मुखपृष्ठही मुलांना स्वत:च्या हाताने तयार करण्यास सांगितले. 

१०. जाहिरात करणं 
एखाद्या जाहिरातीला विनोदी ढंगाने सादर करणं. यात मुलांनी अभिनय, कल्पनाशक्ती आणि विक्रेत्याची भूमिका बजावली. 

११. मुक्ताविष्कार 
सगळ्यांना एकच वाक्य वेगवेगळ्या पद्धतीनं घेऊन दाखवायला सांगितलं. ते वाक्य होतं, ‘‘मी घरातली सगळी कामे मनापासून आणि न सांगता करीन.’’ 

१२. तुम्ही कुठला प्राणी आणि फूल 
मुलांना लहापणापासूनच फुलं आणि प्राणी खूप आवडतात. त्यांना तसं बनायलाही आवडतं. मुलांना आपल्या आवडत्या प्राणी, फुलांच्या कळसूत्री बाहुल्या बनवायच्या होत्या. 

Task १३. फोटोशूट 
आपण कोणीतरी आहोत हे मुलांना कळायला हवं. छान तयार होऊन, आवडते कपडे घालून त्यांना फोटो काढायला सांगितलं. त्यांचा आत्मविश्वास वाढला. 

१४. कविता-अभिवाचन 
मुलांना एकेठिकाणी बसून हातवाऱ्यांचा कमी वापर करून फक्त आवाज आणि कवितांद्वारे विचार आणि भावना व्यक्त करायच्या होत्या. काही मुलांनी स्वतः केलेल्या कवितांचं सादरीकरण केलं. 

१५. श्लोक पठण 
नाटकाच्या सुरुवातीला आमच्याकडं एक संस्कृत श्लोक म्हटला जातो, तो पाठांतरासाठी दिला. एकाग्रता आणि स्मरणशक्तीचा कस वाढला. 

१६. गंमत गाणं 
लॉकडाउनच्या दिवसांमध्ये मुलांना आई-बाबांना एकत्र आणून गाणं गायला सांगितलं. सकारात्मक आणि आनंदी वातावरण निर्माण झालं. 

१७. गंमत नृत्य 
नृत्यानं उत्साहवर्धक आणि आनंददायी वातावरण निर्माण होते, हे सुद्धा समजलं. 

१८. अनुकरण आणि नक्कल 
आवडत्या कलाकाराचा आणि आई-बाबांचा एक डायलॉग म्हणून दाखवायचा. त्यांचे आधी निरीक्षण करायचे. नक्कल ही अभिनयाची पहिली पायरी असेही म्हणतात. 

१९. प्रश्नांची मालिका 
ठरलेल्या १९ प्रश्नांची उत्तरे घरभर फिरत/घर दाखवत द्यायची. याने कॅमेराशी मैत्री झाली. आत्मविश्वास वाढला. घराकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला. 

२०. स्वतःला लिहिलेले पत्र 
आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या टास्कमधून तुम्ही काय अनुभव घेतला हे लिहून काढणे. लिहून काढल्यावर आपल्या गोष्टी चांगल्या लक्षात राहतात. एक अभिनेता त्याला आलेल्या अनुभवांची नोंद करून ठेवत असतो. 

२१. व्हिडिओची साखळी 
आम्ही व्हिडिओ बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत. ‘हत्ती हरवला आहे’ असे या व्हिडिओचे नाव असून, तो ३ मेच्या दरम्यान तुम्हाला तो माझ्या सोशल मीडियावर बघायला मिळेल. 

अनुभवातून जन्मलेले हे ज्ञान बाहेरून येत नाही. कळी उमलावी तसे ते आतून फुलते. उदात्त हेतूने हळुवार फुंकर घालीत उद्याच्या अभिनेते-दिग्दर्शकांना मोठे होताना डोळे भरून पाहतेय. 

loading image