सौंदर्यखणी : लाजबाव लिनन

उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात ऊब देणारी- कोणत्याही ऋतूत, कधीही नेसता येणारी एक ‘एव्हरग्रीन’ साडी म्हणजे लिनन साडी.
Sanskruti Balgude
Sanskruti BalgudeSakal

उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात ऊब देणारी- कोणत्याही ऋतूत, कधीही नेसता येणारी एक ‘एव्हरग्रीन’ साडी म्हणजे लिनन साडी. नेसायला अतिशय हलकीफुलकी साडी. नेसल्यावर मात्र एक मस्त ‘कॉर्पोरेट लूक’ आणि उच्च अभिरुचीची पावती देणारी अशी ही खास साडी.

या साड्यांचा धागा विशिष्ट झाडापासून बनतो- त्यामुळे या साड्या ‘नेचर-फ्रेंडली’ आणि ‘स्किन-फ्रेंडली’ असतात. लिननचा धागा हा, जवस म्हणजे अळशीची जी झुडपे असतात, त्या झुडपांच्या फांद्यांपासून तंतू काढून लिननचे धागे बनवले जातात. या धाग्यांना उत्तम नैसर्गिक चमक आणि ज्यूटसारखे ‘टेक्श्चर’ असते. हे ‘टेक्श्चर’च या साड्यांची ओळख आहे. या साडीत वापरलेल्या उभ्या-आडव्या धाग्यांच्या सुतावरून या लिनन साड्यांचे प्रकार पडतात. उभे धागे लिननचेच असतात आणि आडव्या धाग्यांवरून लिनन साडीचा प्रकार ठरतो. आडवा धागा लिनन असेल, तर लिनन बाय लिननची प्युअर लिनन साडी, आडवा धागा कॉटन असेल तर कॉटन-लिनन साडी आणि आडवा धागा सिल्क असेल तर लिनन-सिल्क साडी.

शक्यतो या साड्या प्लेन असतात; पण आता बुट्ट्यांच्या लिननही बघायला मिळतात. ‘जामदानी बुट्ट्यांच्या लिनन’ हा प्रकारही फार सुंदर दिसतो. या साड्यांच्या बॉर्डर आणि पदराला सिल्व्हर जर असते आणि पदराला कॉन्ट्रास्ट किंवा त्याच रंगाचे टॅसल्स (गोंडे) असतात. या साडीच्या अजूनही बऱ्याच खासियत आहेत. या साड्या चांगल्या ऐसपैस लांब-रुंद असतात. त्यामुळे आपली उंची आणि घेर जरी जास्त असला तरी ही साडी आपल्याला पुरून उरते! कॉटनशी तुलना केल्यास लिननच्या साड्या जास्त टिकतात.

तसचं साडीत रनिंग ब्लाऊजपीस असलं, तरी ते न शिवता एखाद्या मस्त कॉन्ट्रास्ट प्रिंटेड कॉटन, कलमकारी किंवा खणाच्या ब्लाऊजमुळे ही प्लेन साडी अजूनच अप्रतिम दिसते. या साड्यांवर सिल्व्हर किंवा ऑक्सिडाइझचे दागिने अतिशय सुंदर दिसतात. या साड्यांना स्टार्च करावा लागत नाही- शिवाय या साड्या ड्रेपही छान होतात, त्यामुळे या साड्या सर्रास ऑफिसला जातांना वापरल्या जातात. त्यामुळे लिननच्या कॉर्पोरेट लूकमुळे लिनन एक स्टेटमेंट साडी झाली आहे हे नक्की.

माहितीच हवे असे काही

  • लिननचा धागा बनवण्याची प्रक्रिया जरा क्लिष्ट असल्यामुळे या ‘लिनन बाय लिनन’च्या साड्या कॉटन साड्यांपेक्षा महाग असतात.

  • या कॉर्पोरेट लूकच्या साड्यांना चक्क हजारो वर्षांचा इतिहास आहे. दक्षिण-पूर्व युरोपातील गुहांमध्ये सापडलेले ख्रिस्तपूर्व १०००० या काळातील कापडांचे तुकडे जवसाच्या तंतूंपासून बनवलेले आढळले. शिवाय इजिप्तमध्ये ख्रिस्तपूर्व ३००० ते २५०० या काळापासून ‘ममीफिकेशन’साठीही लिननचा वापर होत असे.

  • हे उंची वस्त्र त्या काळात फक्त राजे व त्यांचे सरदार वापरत असत.

  • पॉवरफूल भिंगातून लिननच्या साडीचे सूत पाहिल्यास लिननच्या धाग्यातून बारीक तंतू बाहेर आलेले दिसतात. असे तंतू दिसल्यास ती ओरिजिनल लिनन साडी आहे असे समजावे.

संस्कृतीचा खास ‘सेल्फी’

संस्कृती बालगुडे लहानपणापासूनच भरतनाट्यम नृत्य शिकता शिकताच ‘वेस्टर्न डान्स’चंही प्रशिक्षण घेत होती. सुरुवातीपासूनच दोन्ही नृत्य प्रकारांवर तिचं जबरदस्त प्रभुत्त्व होतं. त्या काळात हौस म्हणून संस्कृती, ‘पायल वृंद’ या संस्थेच्या ‘डान्स शो’जमध्ये ‘सपोर्टिंग डान्सर’ म्हणून नृत्य करत होती. ‘शो’ संपल्यानंतर, डान्समधील मुख्य सेलिब्रेटीच्या भोवती सेल्फी आणि सह्यांसाठी चाहत्यांचा गराडा पडत असे. ते ‘स्टारडम’ बघून मोहित झालेल्या संस्कृतीला एक दिवस आपल्याही भोवती चाहत्यांचा गराडा पडेल अशी स्वप्नं पडू लागली.

‘पायल वृंद’च्याच एका कार्यक्रमात प्रवीण तरडे यांनी संस्कृतीचा नृत्याविष्कार आणि नृत्याभिनय पाहिला आणि राकेश सारंग यांच्या ‘पिंजरा’ या आगामी मालिकेच्या ‘ऑडिशन’साठी सुचविलं आणि मग संस्कृती आणि तिची आई -संजीवनीताई पुण्याहून मुंबईला ‘ऑडिशन’साठी गेल्या. सलवार-कुर्ता आणि साडी अशा दोन ‘लूक’मध्ये ऑडिशन’ द्यायची होती. सलवार-कुर्त्यातील ‘लूक टेस्ट’ झाल्यानंतर तिची पुढची ‘ऑडिशन’ साडीतली होती, मध्ये ब्रेक होता; पण तेव्हा तिथं त्या मालिकेतले इतर दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, क्रू मेंबर आणि मुख्य म्हणजे कॅमेरासमोर मूळची लाजाळू स्वभावाची संस्कृती भांबावून गेली आणि आईला म्हणाली, ‘‘आई चल इथून, मी पुढची ‘ऑडिशन’ नाही देत. मला नाही जमणार हे सगळं!’’ त्यावर तिची आई म्हणाली, ‘‘एवढ्या लांब आलो आहोत तर देऊन टाक ऑडिशन, मग आपण जाऊ. नाही झालं सिलेक्शन तरी चालेल!’’ आईचं ऐकून मग संस्कृतीनं पुढची ‘ऑडिशन’ साडीत दिली आणि दोघी घरी निघून गेल्या. काही दिवसांतच योगायोगानं तिच्या अठराव्या वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी तिला फोन आला, ‘पिंजरा’ मालिकेसाठी सिलेक्शन झाल्याचा तो फोन होता. तो फोन पचवायला संस्कृतीला बराच वेळ लागला. वयाच्या केवळ अठराव्या मिळालेली ‘पिंजरा’ मालिका दोन वर्षं चालली आणि त्यानंतर लगेच ‘कलर्स मराठी’वरची ‘विवाह बंधन’ तिला मिळाली. दोन्ही मालिकांतील तिचे सगळे सीन्स साडीमध्ये होते. त्यामुळे इतक्या लहान वयात सतत तीन वर्षं साडी नेसल्यामुळे मालिका संपल्यावर तिला साडी नेसायचा जाम कंटाळा येऊ लागला.

संस्कृती लवकरच या क्षेत्रात स्थिरावली आणि पुढे रिॲलिटी शोज, वेब सिरीज आणि ‘सांगतो ऐका’, ‘लग्नमुबारक’, ‘निवडुंग’, ‘भय’ असे चित्रपट मिळत गेले. नुकतंच तिनं ‘८-२-७५’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. शिवाय देश-विदेशातले नृत्याचे कार्यक्रम लोकप्रिय झाले. संस्कृतीच्या या प्रवासात एक व्यक्ती कायम तिच्या पाठीशी होती आणि ती म्हणजे तिच्याहून एकच वर्षानं मोठी असलेली तिची प्रियांका दीदी म्हणजे आत्ताची प्रियांका निगडे.

प्रियांका आणि संस्कृती सख्या चुलतबहिणी असल्या तरी एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी आहेत. प्रियांकाचं वर्षापूर्वीच लग्न झालं आणि अचानक या प्रियांकाला साक्षात्कार झाला... ‘आपल्यानंतर लग्नासाठी संस्कृतीचाच नंबर आहे, त्यामुळे लग्नाळू संस्कृतीनंही वेळप्रसंगी साड्या नेसल्या पाहिजेत’ असा आग्रह ती सतत धरू लागली. पण संस्कृती मनावर घेत नाही हे पाहून प्रियांकानं संस्कृतीच्या वाढदिवशी म्हणजे मागच्या १९ डिसेंबरला एक छानशी लिनन साडी घेऊन संस्कृतीला मस्त ‘सरप्राईझ’ दिलं. अर्थातच संस्कृतीला ते ‘सरप्राईझ’ जाम आवडलं. विशेष म्हणजे संस्कृतीला साड्या खूप छान नेसता येतात. लगेच तिनं ती लिनन साडी मस्तपैकी ‘ड्रेप’ केली आणि त्या दोघींनी भरपूर फोटो शूट केलं. खरंतर संस्कृतीनं पूर्वी स्वप्नात पाहिलेला सेल्फी आणि सह्यांसाठीचा गराडा प्रत्यक्षात कधीच उतरला होता; पण संस्कृतीला मात्र ती साडी आणि प्रियांकासोबत काढलेले ते सेल्फी जास्त महत्त्वाचे वाटतात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com