सौंदर्यखणी : देखणी, सुंदर ‘पूना साडी’

Madhura-Bachal
Madhura-Bachal

पद्मशाली समाजातील काही विणकर सन १९३० मध्ये आंध्र प्रदेशातून पुण्यात येऊन स्थायिक झाले आणि त्यांनी हातमागावर खादीचं कापड विणायला सुरुवात केली. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खादीच्या कापडाची मागणी आणि हातमागावर काम करणारे कुशल कामगार कमी होत गेले. मग या समाजानं १९७० साली त्या हातमागांवर, सुंदर सुती पारंपरिक साड्या विणायला सुरुवात केली आणि त्या पारंपरिक साड्यांना नाव पडलं ‘पूना साडी.’ ही पुणेरी साडी बनवणारे पद्मशाली समाजाचे लोक हिंदी भाषक असल्यामुळे आणि महाराष्ट्राबाहेरही या साडीचं वितरण होत असल्यामुळे या पुणेरी साडीला, ‘पूना-साडी’ हेच नाव रूढ झालं. 

पुण्यात भवानी पेठेत हातमागांवर सुंदर पुणेरी साड्या बनू लागल्या. अल्पावधीतच या साड्या खूप लोकप्रिय झाल्या आणि मग भवानी पेठेतील जागा आणि कुशल मनुष्यबळ दोन्ही कमी पडू लागलं. मग भवानी पेठेतील पद्मशाली समाजातील कुन्देन कुटुंबानं १९९० मध्ये पुणे जिल्ह्यातील थेऊर गावी या पुणेरी साड्यांची मोठी ‘कुन्देन मिल’ उभी केली आणि मग या इथूनच संपूर्ण भारतभर या पुणेरी साड्या वितरीत होऊ लागल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या मऊसूत सुती साड्या, मध्ये प्लेन असतात किंवा संपूर्ण साडीभर वेगवेगळ्या आकाराच्या चौकड्या किंवा बारीक रेषा असून अतिशय सुंदर असे ‘कॉन्ट्रास्ट’ काठ असतात. या साड्यांमध्ये पारंपरिक काठामध्ये खूप वैविध्य असतं. या मोहक काठांना, त्यावरील डिझाईनवरून रुद्राक्ष बॉर्डर, रुईफुल बॉर्डर, डायमंड बॉर्डर, पैठणी बॉर्डर, गोमी बॉर्डर, पुणेरी गोमी बॉर्डर, पुणेरी जरी बॉर्डर, सॅटीन पट्टी बॉर्डर अशी छानशी नावंही आहेत. या बॉर्डर्स बघून पद्मशाली समाजाच्या कारागीरांच्या कारागिरीला मनापासून दाद द्यावीशी वाटते. या लोकांनी या बॉर्डर्स स्वतः डिझाईन केल्या आहेत आणि त्यात अनेक नवनवीन प्रयोगदेखील केले आहेत. साडी आणि साड्यांचे ‘कॉंन्ट्रास्ट’ काठ-पदर यांच्या रंगसंगतीत अमर्याद पर्याय या साडीत उपलब्ध असतात आणि शिवाय ते रंगही टिकाऊ असतात. 

कोईमतूरहून मागवलेल्या मोहक रंगांच्या मोठ्या कोनांपासून छोटे कोन तयार केले जातात. मोठे कोन म्हणजे, रंगीत दोऱ्यांचे मोठे बॉबीन आणि छोटे कोन म्हणजे मध्यम आकाराचे बॉबीन. मग ‘वॉर्पिंग’ केले जाते. वॉर्पिंग म्हणजे, एका मोठ्या ड्रमवर सगळे उभे धागे (वॉर्प) ओळीने लावून घेतले जातात आणि तिथून ते एक मोठ्या रुळावर घेतले जातात. ही प्रक्रिया खूप क्लिष्ट असते. पुढच्या अनेक टप्प्यांमधून जात शेवटी पॉवरलूमवर साडी बनण्याची प्रक्रिया सुरू होते. आडव्या आणि उभ्या धाग्यांच्या त्या विणीतून तयार होत जाणारी सुंदर काठांची पूना-साडी तयार होताना बघताना असं वाटतं, की आपण नेहमी नेसतो ती साडी बनण्याच्या मागे कितीतरी कष्ट आहेत! नंतर त्या साडीचं होणारं फिनिशिंग, रोल प्रेस आणि अतिशय सुंदर घातली जाणारी घडी - हा संपूर्ण प्रवास खूपच बघण्यासारखा आहे. 

सुंदर रंगसंगतीच्या, वेगवेगळ्या काठाच्या, प्लेन किंवा चौकडीच्या या पुणेरी साड्या पॉवरलूमवर बनत असल्यामुळे खूपच माफत दरात उपलब्ध असतात. कधीही, कुठेही नेसता येणाऱ्या हलक्या-फुलक्या, माफक दराच्या या साड्या दिसायला मात्र खूपच उंची आहेत त्यामुळे अतिशय सुबक काठांच्या या साड्या संग्रहात असायलाच हव्यात अशा आहेत.

मधुराला मिळालेली मऊसूत भेट!
लग्न ठरलेल्या आणि नुकतंच लग्न झालेल्या मुलींची आणि त्यांच्या आयांची काळजी मिटवली आहे मधुरानं! मधुरा म्हणजे ‘मधुरा रेसिपीज’ची मधुरा बाचल. अनेक पदार्थ ‘युट्यूब’वर सर्च केले, की पहिला व्हिडिओ येतो तो मधुराचा! अर्थात लग्नाळू मुलीच नाही, तर अनेक वर्षं स्वयंपाक केलेल्या स्त्रिया आणि अगदी पाककलेत कसब आजमावणारे पुरुषसुद्धा मधुराच्या रेसिपीजचे फॅन्स आहेत. २००९ मध्ये मधुरा अमेरिकेत असताना बँकेत नोकरी करत होती, तेव्हा मॅटर्निटी लीव्हवर असताना मधुरा ‘युट्यूब’वर, काही महाराष्ट्रीयन पदार्थ एक्सप्लोर करत असताना तिच्या असं लक्षात आलं, की हे पारंपरिक पदार्थ ‘युट्यूब’वर उपलब्ध नाहीयेत. मधुराला मुळातच स्वयंपाकाची आवड होती आणि ‘युट्यूब’सारख्या प्लॅटफॉर्मवरून आपण हे पदार्थ जगभर पोचवू शकतो असा आत्मविश्वास तिला आला, मग नोकरी सोडण्याचा मोठा निर्णय घेऊन तिनं स्वतःचं इंग्लिश आणि हिंदीमधून ‘युट्यूब’ चॅनेल सुरू केलं आणि मग पुढे भारतात आल्यावर २०१६ मध्ये ‘मधुराज रेसिपी मराठी’ हे मराठी ‘युट्यूब’ चॅनेल सुरू केलं आणि ते इतकं लोकप्रिय झालं, की आता त्या चॅनेलचे जवळजवळ ५० लाख सबस्क्रायबर्स आहेत. तिचे जगभर पसरलेले फॅन्स तिला भेटतात, तेव्हा तिच्या रेसिपीजबद्दल खूप भरभरून बोलतात. 

अशाच तिच्या एका चाहतीनं आणि तिचे पदार्थ आवर्जून करणाऱ्या भावनाताई यांनी तिचा पत्ता मिळवून एक सुंदर पुणेरी साडी आणि त्यासोबत एक छानसं पत्र तिला पाठवून दिलं. तिच्यासाठी हे सरप्राईझ होतं. मऊसूत पिवळ्या रंगाची, बारीक चौकड्यांची, सुंदर रुईफुलांची नक्षी असलेली लाल-हिरव्या बॉर्डरची ती साडी आणि ते पत्र म्हणजे, तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या चाहतीनं मधुराच्या कर्तृत्वाला दिलेली ती पावती होती.         

‘यूट्यूब’चा कंटेंट तयार करणं, स्वतःला अपडेट ठेवणं, पदार्थांची तयारी करणं, शिवाय मागणीप्रमाणे मसाले तयार करणं हे सगळं खूप कष्टाचं काम आहे. शिवाय, ‘मधुराज रेसिपीज’ हे पुस्तक मी लिहिलं असून, अजून एक पुस्तक लिहीत आहे. या सगळ्यात मला स्वतःसाठी साड्या आणायला कधी वेळच मिळत नाही, त्यामुळे मला ही प्रेमानं पाठवलेली साडी मी आवर्जून नेसत असते.
- मधुरा बाचल, मधुराज रेसिपीज

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com