माझिया माहेरा : आठवणींची ‘हिरवाई’

‘तुमचं माहेर कुठलं?’… दोन अनोळखी स्त्रिया बोलणं सुरू करण्यासाठी हमखास हा प्रश्न वापरतात. हा जिव्हाळ्याचा प्रश्न जर मला कोणी विचारला, तर माझं उत्तर ‘कोल्हापूर’ आहे.
Swaroop Shinde
Swaroop ShindeSakal
Summary

‘तुमचं माहेर कुठलं?’… दोन अनोळखी स्त्रिया बोलणं सुरू करण्यासाठी हमखास हा प्रश्न वापरतात. हा जिव्हाळ्याचा प्रश्न जर मला कोणी विचारला, तर माझं उत्तर ‘कोल्हापूर’ आहे.

- स्वरूप शिंदे, पुणे

‘तुमचं माहेर कुठलं?’… दोन अनोळखी स्त्रिया बोलणं सुरू करण्यासाठी हमखास हा प्रश्न वापरतात. हा जिव्हाळ्याचा प्रश्न जर मला कोणी विचारला, तर माझं उत्तर ‘कोल्हापूर’ आहे. परंतु माझं ना बालपण कोल्हापूरमध्ये गेलं; ना शिक्षण कोल्हापुरात झालं!... पण सगळ्या सुट्ट्या मात्र गेल्या कोल्हापूरमध्येच! कारण आमचे सगळे नातेवाईक आहेत कोल्हापुरात. मी आणि माझ्या मोठ्या भगिनी शिक्षणासाठी पुण्यात होस्टेलवर होतो व आई-वडील परदेशी होते. त्यावेळी सुट्ट्या लागल्या, की आम्ही आजोळी कोल्हापूरला जायचो. तेव्हाही होस्टेलवरून आलेल्या भाच्यांचे सर्व लाड, कोडकौतुक आमच्या माम्यांनी केले. त्या शाळकरी वयात आम्हा मुलींना लाभलेलं आजोळ हे आमच्यासाठी दुसरं माहेरच होतं.

कोल्हापूरमध्ये मी फारशी राहिली नाहीये, तरीही कोल्हापुरी भाषा, माणसं, मिसळ, साज, रस्सा, चप्पल, रांगडेपणा या सगळ्याचाच मला अती अभिमान आहे. ‘जगात भारी; कोल्हापुरीच’ यावर मी तावातावानं वाद घालते. (अर्थात सातारकर पतीशी) आता माझ्या तोंडी बऱ्यापैकी शुद्ध भाषा आहे; पण अजूनही कोल्हापूरी बोली कुटं बी कानाव पडती तवा...लय म्हणजे लयच भारी वाटतंय की!

आम्ही माहेरचे जाधव- इनामदार! पन्हाळ्याच्या पायथ्याची भैरेवाडी व त्याच्या आसपासची शेतजमीन आमच्या पूर्वजांना इनाम मिळाली होती. माझे वडील शुगर टेक्नॉलॉजिस्ट आहेत; त्यामुळे वेगवेगळ्या गावांमध्ये शुगर फॅक्टरीज असायच्या तिथे त्यांची बदली व्हायची व आमचं कुटुंब म्हणजे मां-पिताजी व आम्ही पाच बहिणी, दर दोन-तीन वर्षांनी गावं बदलायचो!

वारणानगर, इस्लामपूर, फलटण, निफाडजवळील भाऊसाहेबनगर, सांगलीजवळील माधवनगर, एवढंच नव्हे तर आफ्रिकेतील केनियामधील मोहोरोनी अशा अनेक गावांमध्ये आमचं कुटुंब राहिलं आहे. आज वयाच्या पन्नाशीनंतरही या गावांपैकी कुठल्याही गावाचा संदर्भ जरी बोलण्यात, वाचण्यात आला, तरी एक आपलेपणा मनाला स्पर्शून जातो.

आजही यापैकी एखाद्या गावातून नुसतं पास जरी झालं, तरीही नजर ओळखीच्या खुणा शोधते, मनात एक अनामिक खुशी काठोकाठ भरून येते. माहेरच्या गावाचा उल्लेख कोणत्याही स्त्रीच्या मनाला जो ताजेपणा देतो, तसाच या गावांच्या उल्लेखानं माझ्या मनालाही मिळतो मग... ही गावे माझे माहेर नाही आहेत का?

भैरेवाडीला व वारणेकाठी घुणकीला आमच्या वडिलांची शेती आहे. या गावांना अनेक वर्षं जाणंही होत नाही; पण तरीही ती गावं आपली वाटतात! गेल्या वीस-बावीस वर्षांत कोल्हापूरमधल्या टोप या गावी आमच्या मां-पिताजींनी ‘हिरवाई’ वसवली आहे. ‘हिरवाई’ हे आमच्या वडिलांचे फार्म आहे. तिथे असतो तेव्हा आईच्या मांडीवर डोकं ठेवल्याचं समाधान मिळतं. मां आता नसल्या, तरी या हिरवाईच्या कुशीत आम्ही बहिणी विसावतो आणि माहेरपण अनुभवतो! आम्ही बहिणी वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थिरावलो आहोत. पुणे, सांगली, रत्नागिरी, अगदी अमेरिकासुद्धा! त्यामुळे जेव्हा आम्ही एकमेकींकडे जातो तेव्हा जिच्याकडे जाऊ ती बनते आई आणि बाकी बहिणी मस्त माहेरपण उपभोगतो.

माझ्या मते माहेर म्हणजे आपलेपणा. माहेर म्हणजे विसावा. माहेर म्हणजे ऊर्जा. माहेर म्हणजे समाधान. प्रत्येक स्त्रीचं मन ज्याच्यामुळे हरखून जातं, ते सगळं म्हणजे माहेर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com