कलानगरीची ‘ई-कल्पकता’! 

शिल्पा परांडेकर 
Saturday, 25 April 2020

‘वुमन ट्रेंड्स’ हे कोल्हापुरातील पहिले ‘ऑनलाईन स्टोअर’ सुरू केले की,ज्याद्वारे आम्ही कोल्हापुरी चप्पल व साज-ठुशी अशा पारंपारिक दागिन्यांची विक्री करत असू.

‘कला माणसाला जगायला शिकवते, माणुसकी शिकवते. माणसाला अस्तित्वाची जाणीव करून देते,’ असे म्हणतात. कोल्हापुरातील अपर्णा बागल-चव्हाणकडून कलेतून स्वयंरोजगारही साधता येतो, हे शिकता येते. कल्पकता आणि मेहनतीच्या जोरावर तिने आपल्या छोट्या शहरातील कला व कारागिरांना जगभरात पोचवले आहे. बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअर असलेल्या अपर्णाची अन् कलेची गाठभेट झाली ती जयपूर प्रवासादरम्यान. जयपूरने आपल्या कलात्मक वारश्याला एक चांगले व्यावसायिक रूप दिले आहे, याची जाणीव तिला झाली आणि याच जाणीवेतून ‘महिलांनी महिलांसाठी साकारलेले व्यासपीठ’ म्हणजेच ‘वुमन्स कॉटेज’ या बुटिकची सुरुवात झाली. वर्ष २००९, ई-कॉमर्स ही संकल्पना सर्वत्र जोर धरत होती. ‘जयपूरप्रमाणेच आपल्या ‘कोल्हापूर’लाही कलेचा मोठा वारसा लाभलाय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोल्हापुरातील कलापुरी... 
व्यवसाय म्हटले की, अडचणी या येणारच. पण बऱ्याचदा अशा अडचणीतून नवीन काहीतरी शिकता येते. अडचणींवर मात करत असताना आयता माल घेण्यापेक्षा करागीरांची थेट मदत घेण्याचा एक नवा मार्ग तिच्यासमोर आला. मग त्यादिशेने वाटचालही सुरू झाली. यातून उदयास आले, आजच्या कारागिरांचे ऑनलाईन स्टोअर ‘कलापुरी.कॉम’. आजमितीला कोल्हापूरच्या आसपासच्या ग्रामीण भागातील एकूण १२५० कारागिरांचा समुदाय कलापुरीसोबत जोडला आहे व यांमध्ये सुमारे १००० महिला-कारागीरांचा सहभाग आहे. कलापूरीची वार्षिक उलाढाल आहे सुमारे तीन कोटी रुपये. यातील काही महिला या पूर्वीपासून कारागीर आहेत, तर काही नव्याने कला आत्मसात करीत आहेत. अगदी चप्पल बनविण्याच्या पुरुषसत्ताक व पारंपारिक व्यावसायिक विचारसरणीला या महिलांनी कधीच छेद दिला आहे. सध्या कोल्हापूरजवळच नव्याने सुरू होत असलेल्या पारंपरिक दागिने निर्मितीच्या व्यवसायातून ३२१ महिला कारागिरांना रोजगार उपलब्ध होईल. येत्या पाच वर्षांत सुमारे दोन हजार कारागिरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे स्वप्न असल्याचे, अपर्णा सांगते. 

रुळलेला मार्ग सोडून आपल्यासहित इतर महिलांना एका वेगळ्या वाटेवरून घेऊन चालणारी ही यशस्विनी. महिलांना व इतर सर्वांनाच कलेतून स्वयंरोजगार व आत्मनिर्भरता मिळवता येते याचा उत्तम पाठ घालून दिला आहे. 

कोल्हापूर या ‘कलानगरी’तील कलेला व कलाकारांना सर्वदूर पोचवण्यासाठी ‘ई-कॉमर्स’सारखे दुसरे माध्यम नाही. याच विचारातून ‘वुमन ट्रेंड्स’ हे कोल्हापुरातील पहिले ‘ऑनलाईन स्टोअर’ सुरू केले की, ज्याद्वारे आम्ही कोल्हापुरी चप्पल व साज-ठुशी अशा पारंपारिक दागिन्यांची विक्री करत असू. 
- अपर्णा बागल - चव्हाण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Trends is the first online store in Kolhapur