
खाद्यभ्रमंती : कासरगोडचं ‘अवियल मिल्क’
एका मित्राच्या लग्नाच्या निमित्ताने मध्यंतरी केरळमधील कासरगोड जिल्ह्यात जाणं झालं. कासरगोडला उतरल्यानंतर आणि परिसरात फिरत असताना अनेक ठिकाणी ‘अवियल मिल्क’ असे बोर्ड लागलेले दिसायचे. काय असावं बरं हे पेय, ही उत्सुकता खूपच ताणली गेली होती. अखेरीस एक दिवस नेमकं काय आहे ‘अवियल मिल्क’ हे जाणून घेतलंच...
एकेदिवशी सकाळी नाश्ता केल्यानंतर एका बेकरीमध्ये गेलो . तिथं एक जण ‘स्मॅश’ केलेल्या केळ्यापासून काही तरी पेय बनवित होता. हे पेय म्हणजेच ‘अवियल मिल्क’ हे आमच्या ध्यानात आलं. केळ्याचा लगदा आणि बर्फ एका ग्लासात घ्यायचे. ते चमच्यानं मस्त एकजीव करून द्यायचे. मग त्यामध्ये काळ्या रंगाचे पोहे, भाजलेले शेंगदाणे, आइस्क्रीम (शक्यतो व्हॅनिला), पुन्हा केळ्याचा लगदा घालायचा आणि हे सर्व पदार्थ हलवून, एकजीव करून घ्यायचे. मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यावर पुन्हा थोडे भाजलेले शेंगदाणे घालून ग्राहकासमोर ग्लास ठेवायचा. ‘अवियल मिल्क’ तयार...
परममित्र गोपळ गुरवबरोबर झालेल्या या केरळ ट्रिपच्या आधी एकदा केरळला गेलो होतो. तिथं केळ्याचा लगदा, सिरप आणि बर्फ यांच्यापासून बनविलेला केळ्याचा शेक घेतलेला. तो छान लागला होता. मला वाटतं ‘अवियल मिल्क’ हे ‘मलबार स्पेशल ड्रिंक’ म्हणजे त्या केळ्याच्या शेफचं ‘अपग्रेडेड व्हर्जन’च आहे.
पोहे आणि शेंगदाणे कशासाठी...
व्हर्जन ‘अपडेट’ आणि ‘अपग्रेड’ करताना त्यात वजनदार पदार्थांची भर घालण्यात आलेली आहे, इतकंच...‘अवियल मिल्क’मध्ये घातलेले काळ्या रंगाचे पोहे हे नेमके काय प्रकरण आहे, ते समजले नाही. दगडी पोहे होते की भाजक्या पोह्याचा काही प्रकार होता हे समजले नाही. अर्थातच, पोहे या सर्व मिश्रणात सहज एकजीव, एकरूप झाले. ‘अवियल मिल्क’मधील ‘गटात न बसणारा’ शब्द म्हणजे भाजलेले शेंगदाणे. हा पदार्थ त्यामध्ये फार काही योग्य वाटत नाही. म्हणजे तो पदार्थाशी एकरूप तर होत नाहीच, पण खाताना किंवा पिताना उगाच मध्ये मध्ये येत सगळी मजा घालवितो. त्यामुळं तुम्ही जर कधी कासरगोडला गेलात आणि ‘अवियल मिल्क’ ऑर्डर केलंत, तर त्यात शेंगदाणे घालायला सांगू नका. वाटलं तर शेंगदाणे वेगळे घ्या, पण त्यात मिक्स करू नका. अवियल मिल्क हा पदार्थ इतका भारदस्त आणि वजनदार आहे, की माणूस एका ग्लासात ‘टाईट’ होतो. फार तर दीड ग्लास. सकाळी नाश्ता केल्यानंतर आम्ही ‘अवियल मिल्क’ प्यायल्यामुळं आम्ही दुपारचं जेवण घेतलं नाही, हे मुद्दाम सांगायची आवश्यकता नाही. त्यामुळे ‘अवियल मिल्क’ हा जेवणालाही उत्तम पर्याय ठरू शकतो हे ध्यानात ठेऊनच नियोजन करा...
Web Title: Aashish Chandorkar Writes About Avil
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..