जिल्हाधिकारी नव्हे देवदूतच; राजस्थानमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणारे शिवप्रसाद नकाते

अभय दिवाणजी
Wednesday, 22 January 2020

"सरकारी नोकरी म्हणजे केवळ पाट्या टाकू काम' या उक्तीला छेद देत महाराष्ट्रातून अन्य राज्यात उच्चस्तरावर काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी आपली मान उंचावली आहे. आपल्या संवेदनशील, सेवाभावी वृत्तीने व कष्टाने कामाचे चीज करून दाखविणाऱ्या अशा अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर एक प्रकाश...

पाकिस्तानात मरण पावलेल्या महिलेच्या कुटुंबियांना तिचा मृतदेह मिळावा यासाठी राजस्थानातील बाढमेरचे जिल्हाधिकारी शिवप्रसाद नकाते यांनी 26 वर्षानंतर भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील मुनाबाव-खोकरापार प्रवेशद्वार उघडून एक वेगळा इतिहासच रचला. या कामाबरोबरच कारेली येथील तलावाचे लोकसहभागातून सुशोभिकरण करण्यात यश मिळविले. मध्यान्ह भोजन योजनेसाठी शाळा व अंगणवाडी परिसरात श्रमदानातून भाजीपाला योजना, तसेच गर्भवती महिलांमधील रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठी दरमहा तपासणीची योजना राबविली. त्यांच्या या संवेदनशील कामाबद्दल जिल्हा प्रशासनाची लोकमानसातील प्रतिमा उंचावली आहे. महाराष्ट्रातील या सुपुत्राने राजस्थानात जावून आपल्या कामातून "अटकेपार झेंडा' लावत आपल्या राज्याची मान उंचावली आहे. तलाव सुशोभिकरण, मध्यान्ह भोजन योजनेसाठी भाजीपाला लागवड, गर्भवती महिलांची तपासणी या त्यांच्या कामांचे पॅटर्न शासनातर्फे संपूर्ण राजस्थानात राबविले जात आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शासन-प्रशासन संवेदनशील असेल तर काय होते, याची प्रचिती श्री. नकाते यांच्या माध्यमातून राजस्थानमधील नागरिकांना आली. भारत-पाकचा दरवाजा उघडण्याच्या कामामुळे तर तेथील जनतेने त्यांना देवदूतच मानले. त्याचे झाले असे, अगासडी (बाढमेर) येथील रेश्‍मा खान (वय 66) व मुलगा शायब खान हे दोघे ता. 30 जून 2018 रोजी पाकिस्तानमध्ये छिपरा येथे नातेवाईकांना भेटायला गेले होते. रेश्‍मा यांचे 25 जुलै रोजी तापाच्या आजाराने निधन झाले. आईचा दफनविधी मातृभुमीत व्हावा अशी मुलगा शायबची व जादमची इच्छा होती. परंतु 28 जुलै रोजी व्हिसा संपत असल्याने अनेक अडचणी समोर दिसत असल्याने भारतातील नातेवाईकांना काय करावे सुचत नव्हते. जिल्हाधिकारी श्री. नकाते यांनी तातडीने गृहमंत्रालय, परराष्ट्र खाते व भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. तत्कालिन परराष्ट्र मंत्री (कै.) सुषमा स्वराज्य यांनी पाकिस्तानमधील भारतीय दूतावासातील अजय बिस्सार यांना मदत करण्यास सांगितले.

रेश्‍मा खान यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी श्री. नकाते यांनी वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून भारतातून पाकिस्तानला आठवड्यातून एकदाच जाणारी थार एक्‍सप्रेस ही रेल्वे एक तास खोखरापार स्टेशनला थांबवून घेतली. परंतु व्हिसाच्या कागपत्रांची पूर्तता न झाल्याने मृतदेह त्यादिवशी आणता आला नाही. भारत-पाक सीमेवरील मुनाबाव-खोखरापार प्रवेशद्वारवरून पायी चालत जाण्यास परवानगी नसल्याने या मार्गाव्यतिरिक्त वाघा बॉर्डर व विमानाने मृतदेह आणण्याची तयारी जिल्हाधिकारी श्री. नकाते व स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यासाठी सरकारकडून व सीमेवरील सीमा सुरक्षा दलाची परवानगी घेतली. परंतु पाकिस्तान सरकारने 30 जुलैला मृतदेह देण्यास परवानगी दिली. याठिकाणी रेश्‍मा खान यांचा मृतदेह सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या जवानांकडून ताब्यात घेतला. रेश्‍मा खान यांचा मृतदेह सात दिवसात भारतात आणला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे हे काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करताना प्रत्यक्ष श्री. नकाते त्या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या पत्नीची प्रसुती होत असतानाही त्यांनी कर्तव्यास प्राधान्य दिले.

Image may contain: one or more people, people walking, people standing and outdoor

रेश्‍मा खान यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी उघडण्यात आलेले भारत-पाकचे सीमेवरील गेट.

कारेली तलावात आणली जान
भाक्रा-नानगल योजनेतून बाढमेरला पाणीपुरवठा सुरु झाल्यानंतर संपूर्ण बाढमेरला पाणीपुरवठा करणाऱ्या कारेली तलावाकडे दुर्लक्ष झाले. त्यात तब्बल 20 वर्षांपासून मृत जनावरे, कचरा, अजोरा टाकून तलावाचे अस्तित्वच नष्ट झाले होते. यामुळे रोगराई पसरण्याची भीती होती. या संदर्भात जिल्हाधिकारी श्री. नकाते यांना समजताच त्यांनी लोकसहभागासाठी आवाहन केले. तब्बल 27 तास सलगपणे काम करून तलावाचे रुपच पालटून टाकले. यासाठी 70 हून अधिक डंपर, 14 पोकलेन, एक हजार लोकांचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन एक हजारावर टन कचरा (मलबा) तलावातून बाहेर काढण्यात यश आले. येथील संपूर्ण कचरा त्यांनी जवळपासच्या बंद पडलेल्या खाणींमध्ये टाकून त्याचे "लेव्हलिंग' केले. श्रमदानातून श्री. नकाते यांनी त्या तलावाचे पुनरुज्जीवन केले. तब्बल दोनशेहून अधिक झाडे लावत सुशोभिकरण केले. या तलावाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा मानस व्यक्त केला. तेथे चौपाटी सुरू केली आहे. नगरपालिकेकडे हा तलाव सुपूर्द केला. त्यांच्या या कामाची राजस्थान सरकारने दखल घेतली. संपूर्ण राज्यात नकाते पॅटर्न राबविण्याचे आदेश दिले.

अंगणवाडीतील मुलांना आहार, श्रमदान
जिल्ह्यातील अंगणवाडी व शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना राबविण्यासाठी शाळा परिसरातील मोकळ्या जागेवर भाजीपाला उगविण्याची योजना राबविली. पालक, मेथी, कोथींबीरचे उत्पादन घेतले. फळांचीही झाडे लावली. जिल्ह्यातील 450 शाळांमध्ये हा प्रयोग यशस्वी करून दाखविला. मुलांना लागणाऱ्या भोजनासाठी तेथेच उत्पादन घेण्याची त्यांची अभिनव योजना झाली. यामुळे मुलांचा शाळेकडील ओढा वाढला. तसेच माध्यान्ह भोजन योजनाही यशस्वी झाली. ही योजनाही राज्य सरकारने संपूर्ण राज्यभर राबविली.

गर्भवती महिलांची तपासणी
जिल्ह्यातील प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला गर्भवती महिलांच्या हिमोग्लोबीनची तपासणी करण्याची योजना आखली. रक्तवाढीसाठी प्रबोधनाबरोबरच संबंधित महिलांना गुळ, शेंगा, चणे, बिस्कीट देण्याचा प्रयोग सुरु केला. यासाठी दरमहा 500 ते हजार रुपये खर्चाची संबंधित शासकीय रुग्णालयांना परवानगी दिली. हिमोग्लोबीनच्या तपासणीसाठी गर्भवती महिलांचा प्रतिसाद कमी होता. परंतु या अभिनव योजनेमुळे प्रतिसाद वाढला. मातृत्व व शिशू मृत्यू दर कमी करण्यात मोठे यश आले.

कोण आहेत शिवप्रसाद नकाते ?
श्री. नकाते हे मूळचे उपळाई बु. (ता. माढा, जि. सोलापूर) येथील रहिवासी आहेत. सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या शिवप्रसाद यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा, उत्तरेश्‍वर प्रशालेत झाले. आयआयटीतून एमटेक (ऍग्री. इंजिनिअरिंग) केले. आयएएस होण्याचे स्वप्न बाळगलेल्या डॉ. नकाते यांनी स्वयंअध्ययनातून स्पर्धा परीक्षा देण्यास सुरवात केली. 2010 मध्ये त्यांची महाराष्ट्र प्रशासकीय सेवा व केंद्रीय पोलिस दलात सहायक समादेशकपदावर निवड झाली. परंतु केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवेतच जाण्याचे त्यांचे स्वप्न त्यांना चैन पडू देत नव्हते. 2011 मध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. प्रशिक्षणानंतर सहायक जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोटा, जोधपूर येथे महापालिका आयुक्त, बाढमेर येथे जिल्हाधिकारी व श्रीगंगानगर येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. वडील सामाजिक कार्यकर्ते असल्याने त्यांच्या पावलावर पाऊल टाकत सामाजिक कार्यासाठी सतत अग्रेसर असलेल्या डॉ. नकाते यांच्यानंतर उपळाई येथे त्यांचा आदर्श घेऊन अधिकाऱ्यांची फळीच निर्माण झाली.

प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, यासाठी सतत प्रयत्न असतात. याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानमध्ये मरण पावलेल्या रेश्‍मा खान यांचा मृतदेह भारतात आणण्यात यश आले. तसेच कारेली येथील तलावाचे लोकसहभागातून सुशोभिकरण करण्याचे काम सुरु आहे. लोकसेवेचे माध्यम म्हणून जिल्हाधिकारी पद उपयोगात आणू शकत असल्याचे समाधान वाटते.
- शिवप्रसाद नकाते, जिल्हाधिकारी, बाढमेर (राजस्थान)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhay diwanji writes about barmer collector shivprasad nakate