जोडी ‘प्रीत’ कळालेली! 

जोडी ‘प्रीत’ कळालेली! 

अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय सेलिब्रिटी जोडी आहे. हे दोघंही आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या मालिका, चित्रपट आणि कार्यक्रमांमधून आपल्याला भेटले आहेत. दोघंही नाशिकचेच. त्यांची दहा वर्षांपूर्वी मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात. लग्नासाठी एकमेकांचा होकार मिळवतानाचा त्यांचा एक गमतीशीर किस्सा सुखदानं सांगितला. ती म्हणाली, ‘‘अभिजितची ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ ही मालिका सुरू असताना आमची ओळख झाली. आम्ही खूप चांगले मित्र होतो. विशेष म्हणजे, माझ्या आईला अभिजित तेव्हापासूनच आवडायचा आणि त्यांची मैत्रीही आमच्या इतकीच चांगली होती. काही महिन्यांनी मी लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. अभिजितलाही माहीत होतं, मला कसा मुलगा हवा आहे. माझं वर संशोधन सुरू असताना अचानक एक दिवस अभिजितनंच मला लग्नाची मागणी घातली. मला आनंदही झाला आणि आश्चर्याचा धक्काही बसला. गंमत म्हणजे, मी आईला हे सांगितल्यावर मी अभिजितला होकार देण्याआधीच माझ्या आईनं आमच्या लग्नाला आनंदानं संमती दर्शवली. असं आमचं लग्न जमलं आणि आता लवकरच आमच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण होतील.’’ 

सुखदाच्या स्वभावाबद्दल सांगताना अभिजित म्हणाला, ‘‘सुखदाचा स्वभाव हा खूप चांगला आहे. ती सगळ्यांशी मिळून मिसळून आणि आपलेपणानं वागते. आमच्या दोघांच्या आवडीनिवडी फार वेगळ्या नाहीत. आम्हा दोघांनाही नेहमीच एकमेकांना काही ना काही सांगायचं असतं. एकमेकांच्या सोबत असणं आम्हाला खूप आवडतं, आम्ही क्वांटिटी टाइमपेक्षा आम्ही क्वालिटी टाइमला प्राधान्य देतो. दोघांच्या बिझी शेड्यूलमधून मिळणारा वेळ मिळाल्यावर आम्ही फिल्म्स बघतो, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विविध पदार्थ खातो किंवा घरीच एकत्र मिळून छान स्वयंपाक बनवतो आणि हे सगळं आम्ही खूप एन्जॉय करतो. सुखदा कोणत्याही गोष्टीचा खूप विचार करते. ही तिच्यातली चांगली गोष्टही म्हणावी लागेल आणि वाईटही. कारण अनेक वेळा या अतिविचार करण्याचा तिलाच त्रास होतो. मला सुखदाचा आवडणारा गुण तिचा नीटनेटकेपणा. कुठलीही गोष्ट तिला परफेक्टच लागते. मग ते घरकाम असो नाहीतर शूटिंग; ती तिचं १०० टक्के देऊन ते काम करते आणि तिचा हा गुण आत्मसात करायला मला नक्कीच आवडेल.’’ 

सुखदा अभिजितबद्दल सांगते, ‘‘मी काहीही केलं तरी ते मी बिनधास्त अभिजितला सांगते. तो अत्यंत मॅच्युअर, प्रेमळ आणि समंजस आहे. अभिजित कधी माझा मित्र असतो, कधी बाबा, कधी नवरा असतो आणि त्याला कधी कोणत्या भूमिकेत शिरायचं हे खूप चांगलं कळतं! त्याचा हजरजबाबीपणाही मला प्रचंड आवडतो. कोणत्याही सिच्युएशनवर पॅनिक न होता शांतपणे विचार करून रिअॅक्ट करणं हा अभिजितचा गुण मला फार भावतो. समोरच्याकडून झालेली चूक प्रत्येक वेळी चिडूनच त्याच्या लक्षात न आणून देता, शांतपणे प्रेमानंही त्याला समजवता येतं हे मी अभिजितकडून शिकले. आम्ही घडलेली प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करतो. आम्ही कामानिमित्त वेगवेगळ्या शहरांत राहत असलो, तरी आम्हाला माहीत असतं एकमेकांचा दिवस कसा गेला आहे, काय काय केलं दिवसभर आणि हे संभाषण होणंच कोणत्याही नात्यात महत्त्वाचं असतं. माझ्या आईच्या मते अभिजित आदर्श जावई आहे. मी स्वत-ला खूप भाग्यवान समजते कारण अभिजित माझा नवरा आहे." 

सुखदानं पृथ्वी थिएटर्सच्या नाटकात साकारलेल्या भूमिका, ‘देवदास’ या महानाट्यातील तिची भूमिका आणि आत्ता ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ या मालिकेत ती साकारत असलेली भूमिका अभिजितला अतिशय आवडते. सुखदाला अभिनेता म्हणून अभिजितचं ‘भय’ आणि ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या चित्रपटातील काम फार आवडलंच; पण ती अभिजितच्या अँकरिंगची खूप मोठी चाहती आहे. हे दोघे सध्या वेगवेगळ्या मालिकांच्या चित्रीकरणात बिझी असूनही एकमेकांना शक्य होईल तितका वेळ देतात व त्यामुळंच ते आयडिअल कपल बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com