झूम... : बाबो!! सायकली की जादू?

Cycle
Cycle

सायकली हे ‘एक साधं, स्वस्त, इंधन न लागणारं वाहन’ ही कल्पना आता केव्हाच मागे पडलीय. सायकली हे आता स्टेटस सिंबॉल तर होऊ लागलं आहेच; परंतु त्याच्यात तंत्रज्ञान आणि नावीन्यानं असा काही शिरकाव केलाय, की त्या चालवणारा आणि बघणारा पार वेडाच व्हावा. जगभरात नावीन्य आणि तंत्रज्ञान या दोन गोष्टींसाठी गाजत असलेल्या अशाच काही आगळ्यावेगळ्या सायकलींवर आपण एक नजर टाकू. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जीआय फ्लायबाइक
जीआय फ्लायबाइक हिला सायकल म्हणायचं की बाइक तुम्हीच ठरवा. कारण या सायकलीत एक बॅटरी पॅक समाविष्ट केलाय. ही बॅटरी एकदा चार्ज केली, की सायकल चक्क बाइकसारखी वापरता येते आणि ती तब्बल ६४ किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. तुम्ही ती चालवत असताना तुमचा स्मार्टफोनसुद्धा चार्ज करू शकता. त्यासाठी त्यात यूएसबी पोर्ट दिलाय. सायकल चक्क फोल्ड करून ठेवता येते. है ना सही आयडिया? ही सायकल अर्जेटिंनातच उपलब्ध आहे. तिची किंमत दोन हजार डॉलर म्हणजे जवळजवळ दीड लाख रुपयांच्या घरात आहे, हे मात्र लक्षात राहू द्या. 

बायोमेगा ओको
बायोमेगा कंपनीनं आणलेली ही ओको इलेक्ट्रिक बाइक जीआयसारखीच आहे. तिच्यातसुद्धा चार्जिंगची सोय आहे आणि एकदा चार्ज केलं, की ती ४५ ते ६५ किलोमीटर धावते. फक्त बाइक म्हणून वापर केला, तर ती प्रतितास साधारण २५ किलोमीटरपर्यंत वेग घेऊ शकते. हिची रचना विशिष्ट पद्धतीची आहे. इलेक्ट्रिक बॅटरी सायकलच्या मध्यभागी अशा प्रकारे समाविष्ट केली आहे, की त्यामुळे वजनाचं संतुलन बरोबर राखलं जातं. ही सायकलही युरोपीय देशांतच उपलब्ध आहे. किंमत सुमारे सत्तावीसशे डॉलर म्हणजे सुमारे दोन लाख रुपयांच्या आसपास.

फोर्ड मोडे : फ्लेक्स
फोर्डच्या कार्स आपल्याला माहीत आहेतच; परंतु त्यांच्या नावीन्यपूर्ण इलेक्ट्रिक सायकली पण आहेत बरंका. मोडे : फ्लेक्स ही इलेक्ट्रिक बाइक कम सायकल आहे. तीही अर्थातच चार्ज करता येते आणि जीआय फ्लायबाइकसारखी फोल्डसुद्धा करता येते. ही बाइक तुमच्या स्मार्टफोनला कनेक्ट करता येते. त्यामुळे तुम्ही डिजिटल प्रवास आखू शकता, फिटनेसविषय माहिती बघू शकता, तुम्हाला ट्रॅफिकबाबत सूचना येतीलच, शिवाय अगदी खड्ड्यांबाबतच्या सूचनासुद्धा येतील. तुमच्या फिटनेसची माहिती या सायकलीला असल्यानं अगदी पेडलचा वेगसुद्धा तुमच्या हृदयाच्या ठोक्यानुसार ॲडजस्ट केला जातो. सही ना?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com