कट्टा : ॲपवर भरली मित्रांची मैफल

Friends
Friends

कॉलेज सुरू झाल्यानंतर सर्वांत जास्त उत्सुकता असते, ती विविध ‘डेज’बद्दल. वेगवेगळ्या ‘डे’मुळे कॉलेजचे कट्टे ओसंडून वाहत असतात. यामुळे कट्ट्यांवर मोठे चैतन्याचे वातावरण असते, मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे हे कट्टे ओस पडले आहेत. नुकताच ‘फ्रेंडशिप डे’ झाला. हा ‘डे’  कॉलेजमध्ये नुकत्याच प्रवेश केलेल्यांसाठी पर्वणीच असतो. या निमित्ताने नव्याने मैत्री करून घेण्याची आणि असलेली मैत्री आणखीन दृढ करण्याची मोठी संधी असते. कॉलेजच बंद असल्याने नवीन मैत्रीही होऊ शकली नाही आणि आहे ती मैत्री कायम ठेवण्यासाठी कोणत्या आणाभाकाही कट्ट्यावर घेता आल्या नाहीत. कट्टा सुनासुना झाला असला, तरी मैत्रीचा धागा मोबाईल अॅपवर घट्टपणे बांधला गेला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘ॲक्च्युअल’ भेटता आले नसले तरी ‘व्हर्च्युअल’ भेटून मित्रांनी आपली मैत्रीची वीण घट्ट बांधली. अनेकांनी मोबाईल अॅपवर सुरुवातीला चॅटिंग आणि त्यानंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मनभरून संवाद साधला. अर्थात, त्यासाठी दोन दिवसांपासूनच जय्यत तयारी करण्यात आली होती. अनेकांनी झूम मिटिंगच्या माध्यमातून लिंक तयार करत संवाद साधला. मात्र, त्यालाही वेळेची मर्यादा असल्याने अन्य पर्यायांतून लिंक तयार करत पुन्हा गप्पांचा फड जमविला. लॉकडाउनच्या काळात एकमेकांना व्हिडिओ कॉल होत असले, तरी ‘फ्रेंडशिप डे’ला गप्पा मारण्याची मजा इतर वेळी येत नाही, याचा प्रत्यय सर्वांना आला. 

कॉलेजमधील कट्टे आणि भेट घेण्याचे ठरावीक ठिकाणे अनेकांनी ‘मिस’ केली. मस्तपैकी कॉफी किंवा चहाचे घोट घेत मैत्रीच्या नात्याला आणखी गहिरे करता आले नसले, तरी ती भूक व्हर्च्युअल जगताद्वारे पूर्ण केली. वेगवेगळ्या मेसेजच्या माध्यमातून मैत्रीला उजाळा दिला गेला. 

पु. ल. देशपांडे म्हणतात तसे -
रोज आठवण यावी असं काही नाही, 
रोज भेट व्हावी असं काही नाही
एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही
पण मी तुला विसरणार नाही
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com