तसा मी प्रामाणिकच!

Ten
Ten

दिल तो बच्चा है! - नितीन थोरात
म्हणजे तसा मी प्रामाणिक आहे. चार लोक पाहणार असतील, तर मी प्रामाणिकपणेच वागतो. म्हणजे मला एकदा रस्त्यावर दहाची नोट दिसली होती, तेव्हा ती इतरांनाही दिसली होती. मी ती नोट उचलून इतरांना विचारलं, की कुणाची आहे का? सगळ्यांनी नकार दिला. मग इच्छा नसताना मी ती नोट भिकाऱ्याला दिली.

थोडक्‍यात सांगायचं, तर दोन महिन्यांपूर्वी मी आमच्या स्वीटहोमवाल्याला फसवलं होतं. तसा तो राजस्थानचा असावा, पण सहा वर्षांपासून मी त्याच्याकडूनच दूध आणतो म्हणून आमचा. सात वर्षांत आमचं छान रिलेशन डेव्हलप झालंय. म्हणजे त्याला माझं नाव माहिती नाहीये की मलाही त्याचं नाव माहीत नाही. पण, आम्ही डोळ्यांनी एकमेकांना चांगलं ओळखतो. त्याच्या इथे नवीन पोऱ्या कामाला आला होता. त्याचा हिशेब चुकला आणि त्यानं मला जादा पन्नास रुपये दिले. आता मी प्रामाणिकपणा दाखवून त्याला पैसे परत द्यावे, की पन्नास रुपयांचा फायदा पाहावा, असा प्रश्‍न माझ्यापुढं निर्माण झाला. 

‘जाऊ दे मरू दे. तसाही हा रोज कमावतोच की. आधी दोन पोरं कामाला होती, आता सात पोरं कामाला आहेत. म्हणजे चांगले पैसे छापतोय. कशाला त्याची काळजी करायची,’ असं म्हणत मी पन्नास रुपये खिशात घातले. त्यानंतर दोन महिने त्याच्याकडून रेग्युलर दूध आणले. विशेष म्हणजे, रोज त्याच्या स्वीटहोममध्ये गेल्यावर मला माझ्या चुकीची आठवण होतेच होते. पण, त्याला हे माहिती नाही. तो बिचारा रोज स्वीट स्माइल देतोच देतो. कारण, त्याच्या दृष्टीनं मी प्रामाणिक आहे ना!
दरम्यान, मी एक आठवडा पुण्याबाहेर सुट्टीला गेलेलो. आठवड्यानं आल्यानंतर सकाळी सकाळी त्याच्याकडं दूध आणायला गेलो, तर स्वीटहोमवाल्यानं मला चौदा रुपये दिले. मी गडबडलो. माझा प्रश्‍नार्थक चेहरा पाहून म्हणाला, ‘अरे सात दिन पेहले फोनपर बात करते करते आप इधर ही भूल गये थे.’ 

मी शॉक झालो. काय बोलावं तेच समजेना. गडबडीत म्हणालो, ‘अरे पक्का मेरेही है ना? ठिकसे याद कर किसी और के होंगे?’

तसा तो बोलू लागला, ‘अरे साब आप कित्ते सालोंसे हमारे रेग्युलर कस्टमर है. आप जैसे नेक लोगोंकी वजहसे धंदे में बरकत है. आपको कैसे भूल सकते हैं?’
वाक्‍य बोलून तो त्याच्या कामाला लागला. हातातले चौदा रुपये मात्र माझ्याकडं पाहून मोठमोठ्यानं हसत होते. मला माझी लायकी दाखवत होते.
(लेखक सामान्य नागरिकांच्या रोजच्या अनुभवांवर आधारित लघुकथांचे लेखन करतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com