दिल तो बच्चा है! : मला लाज वाटती राव!

Tajmahal
Tajmahal

‘रस्त्याव थांबून मी भाजीपाला विकला असता रं. पण, मला लाज वाटती राव.’
सिगारेटचा कश ओढत संत्यानं गॉगल डोळ्यांना लावला आणि एक सेल्फी काढला. गॉगल काढून खिशात ठेवत त्यानं चहाचा घोट घेतला आणि पुढं बोलू लागला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘मास्टर डिग्री घेऊन चार वर्षं चकाचक ऑफिसमधल्या एसीमध्ये बसून मी काम केलंय. गुबगुबीत खुर्चीवर बसायचं. दिवसातून चार वेळा कॉफी घ्यायची. ऑफिसबॉयवर रुबाब झाडायचा. इस्त्रीचे कपडे घालून मीटिंग अटेंड करायच्या. विकएण्डला बायकोसोबत सिंहगड, कामशेत, भीमाशंकरला जायचं, असं माझं रुटीन होतं. अन्‌ आता त्याच रस्त्यावर मी भाजीपाला विकायला बसलो, तर लोकं काय म्हणतील यार? जी लोकं माझ्याकडं आदरानी पाहायची तीच लोकं आता मला हसणार नाय का?’

कोरोनातल्या कामगारकपातीत संतोषचा नंबर लागला होता. त्याला जॉबवरून कमी करण्यात आलं. दुसऱ्या कंपनीत जॉब मिळंना. पाच-सहा कंपन्यांमध्ये अर्ज देऊन झाले. साहेब लोकांच्या पाया पडून झाले. परंतु, शून्य. अखेर काळजातली खदखद व्यक्त करायची म्हणून त्यानं मला फोन केला आणि आम्ही भेटलो. मी त्याला सरळ भाजीपाला विकायचा सल्ला दिला. त्यावर तोंडावर हात ठेवत तो मोठमोठ्यानं हसला. क्षणभरानं शांत झाला आणि व्यथित मनानं बोलू लागला. 

‘एवढं सोपं वाटतं का तुला? अरे बोलायला काय जातंय? भाजीपाला विक, फुलं विक, अगरबत्या विक, ज्यूस विक, गारीगार विक हे म्हणणं लय सोप्पं असतं. पण, जेव्हा आपण शिक्षण घेतो ना, तेव्हा ‘लाज’ नावाचा अजगर आपल्या मनाला विळखा घालतो. तो विळखा सहजासहजी सुटत नाय. आपण व्हाईट कॉलर बनतो आणि या व्हाईट कॉलरला माती लागण्याची पण भीती वाटू लागती. जी लोकं आपल्याला आदर देतात, तो आदर कमी होईल याची चिंता सतावू लागती.’

तसा मी त्याच्यामध्ये ऊर्जा भरत म्हणालो, ‘आरं पण संत्या, तुझ्या आईबापानी असाच भाजीपाला विकून तुला शिकवलं. त्यांनी जे काम केलं तेच कर म्हणतोय. वेगळं काही सांगत तर नाय ना? तू लहानपणी त्यांच्यासोबत रस्त्याव बसायचा की. मग आता नोकरी गेली म्हणून पोटापाण्यासाठी लाज सोडलीच पाहिजे. अन्‌ चोऱ्यामाऱ्या करण्यापेक्षा किंवा याच्या त्याच्या पाया पडण्यापेक्षा कष्टानं पैसा कमावणं चांगलच आहे ना?’ तसा संत्यानं माझ्यापुढं हात जोडले आणि म्हणाला, ‘ओ लेखक महाशय, भाषण देणं आणि प्रत्यक्ष कृती करणं लय वेगळं असतंय. हवा करण्यासाठी कुणीही झाडू हातात घेऊ शकतं. पण, मनापासून झाडू हातात घ्यायला वाघाचं काळीज लागतं. तू स्वत: या लॉकडाऊनमुळं होरपळलाय की. मग तू का नाय रस्त्यावर उतरून एखादा व्यवसाय चालू केला?’ संत्यानं चहाचा शेवटचा घोट घशात ढकलला आणि गाडीला किक मारून निघून गेला. 

माझ्या डोक्‍यात मात्र विचारांचं पाणी वाहतच होतं. मी मास कम्युनिकेशनची डिग्री घेतली. मी सहा-सात कादंबऱ्या लिहिल्या, मला राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला. आता मी रस्त्यावर उभं राहून एखादा धंदा करू शकतो? तेवढी हिंमत माझ्यामध्ये आहे? मला लाज नाही वाटणार का? लोकं काय म्हणतील? संत्याला सल्ला देणं खूप सोप्प होतं. परंतु, त्याला सल्ला दिला त्यानुसार मला वागणं शक्‍य आहे?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com