दिल तो बच्चा है! : सुरकुतल्या चेहऱ्यामागची वेदना...

दिल तो बच्चा है! : सुरकुतल्या चेहऱ्यामागची वेदना...

चौकातल्या नळापाशी एक म्हातारी बसलेली. जुनाट साडी, विस्कटलेले पांढरे-तांबडे केस, जवळपास ऐंशी गाठलेली असावी तिनं. पार खंगलेली. भलामोठा हंडा उचलण्याची हिंमत गोळा करत मंद श्‍वास घेत होती. धावणाऱ्या गाड्या बघत कपाळाला हात लावून बसलेली. मी नेमका मेडिकलमधी गेलेलो. म्हातारी पाहून तिच्याकडं निघालो. हंडा उचलला. पण, तिची तब्येत पाहून तो हंडा तिच्या कंबरेवर देण्याची इच्छाच होईना.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

म्हतारीला म्हणालो, ‘आज्जी कुठं जायचंय तुम्हाला?’ तिनं फक्त इशाऱ्यानी रस्ता दाखवला. तिच्यासोबत निघालो. पुण्यात मिटिंगला जायचं म्हणून नवा कोरा शर्ट घातला होता. त्यावर पाण्याचे डाग पडल्यानं, कुठून दुर्बुद्धी सुचली अन्‌ समाजसेवा करायला आलो काय माहिती, अशी भावना मनात येत होती. परंतु, आता केलाय मूर्खपणा अशा विचाराची माती मी त्या भावनेवर टाकत राहिलो. 

दोन-तीनशे फूट गेल्यावर ती म्हातारी एका जुनाट पडक्‍या दगडी खोलीत गेली. तिच्यामागोमाग जायला मला भितीच वाटली. ही हाडळ तर नसेल, असा विचारही क्षणभर मनात आला. इकडं तिकडं पाहत मीही तिच्या मागोमाग गेलो. कोपऱ्यात चूल, तांब्याची, पितळाची दोन चार भांडी. कोपऱ्यात कचरा, तिथंच गोधडी. पाण्याचा माठ, खिडकीला कापड बांधलेलं. एका भिंतीवर गवत उगवलेलं. डोक्‍यावर सारी जळमटं. ते पाहून आवंढाच गिळला. 
माघारी फिरलो तोच भिंतीवर एका गोऱ्यागोमट्या पोराचा फोटो दिसला.

निरखून पाहिलं तर त्या पोराच्या गळ्यात कुठल्या तरी इंग्लिश मिडियमच्या शाळेचं आयकार्ड होतं. तो फोटो पाहत म्हणालो, ‘आज्जी कोणहे हा? नातूहेका तुमचा?’ तशी ती म्हातारी रागानं माझ्याकडं पाहत खेकसलीच, ‘तू निघ हितून. आलाय मोठा शाणा. मी काय हाडळ वाटले का काय तुला? माझा पप्याहे तो. मी कशाला त्याला मारील तवा? तो गेलाय त्याच्या आज्ज्याबरं खेळायला. दोघं आता शिवणापाणी खेळत असत्यानं. त्याची मायच हाडळहे. नुसती पोराला अभ्यास करायला लावती. ही बुकं झालं की ती बुकं वाच, ती झालं की जा शिकवणीला. आला की कर अभ्यास. झोपताना अभ्यास, उठल्याव अभ्यास.

पोरगं पार सुकलं होतं. त्यालाहेना होक असा दम लागायचा, दम. मग त्यालाहेना तसली नळी लावाय लागायची तोंडाला. त्याच्या आज्जालाबी तसली नळी लावली अन्‌ आज्जा मेला. पप्यालाबी हित करमत नव्हतं. म्हणून मग त्यालाबी नळी लावली अन्‌ तोबी गेला आज्ज्याकडं खेळायला. मी नाय मारलं त्याला.’

एका दमात आज्जी एवढं सगळं बोलली आणि मिचमिच्या डोळ्यातल्या आसवांना टिपू लागली. मला काय बोलावं समजेना. तसा धीर एकवटत म्हणालो, ‘पण मग तुम्ही हितं एकट्या का राहता?’ तशी ती आज्जी पुन्हा उचकली. म्हणाली, ‘गपय तू. लागला मोठ्या सायबावानी बोलायला. आधी तुझ्या बायकुला समजून सांग. मला म्हणती माझं लेकरु मरण्यापेक्षा तुम्ही मेला असता तर परवडला असता. खायला काऱ्ह अन्‌ धरणीला भार, म्हणती मला तुझी बायकू. माझी मी चट करून खाईल ह्या खुलीत. पण, तुझ्या बंगल्यात येणार नाय. चल निघ.’ मी शांतपणे हात जोडले अन्‌ मागे न बघता चालत निघालो. 

आज्जीच्या बोलण्यावरून अंदाज आला. तो गोंडस पप्या वारला होता. पप्या गेला याला त्याची आईच जबाबदार आहे, अशी या आज्जीची समजूत. तर पप्या जाण्यापेक्षा तुम्ही गेला असता तर बरं झालं असतं असं त्या सुनेचं मत. त्या वादातून आज्जी घर सोडून या खोलीत रहात असावी. बाकी काही असो. पप्या गेला हे वाईट झालंच. पण, आज्जी म्हणत होती, तसा तो आजोबासोबत खेळत असेल तर तो खरोखरच सुखी होता.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com