
‘आपण असलं भारी पुस्तक लिहिणार ना भाऊ, अख्ख्या राज्यात फक्त आपलंच नाव झालं पायजे. प्रत्येक वाचकाच्या तोंडावर फक्त आपलाच उदो उदो पायजे. असलं काहीतरी भन्नाट, अद्भुत आणि दणका पुस्तक लिहायचं ना, की इतिहासच झाला पायजे.’’
‘आपण असलं भारी पुस्तक लिहिणार ना भाऊ, अख्ख्या राज्यात फक्त आपलंच नाव झालं पायजे. प्रत्येक वाचकाच्या तोंडावर फक्त आपलाच उदो उदो पायजे. असलं काहीतरी भन्नाट, अद्भुत आणि दणका पुस्तक लिहायचं ना, की इतिहासच झाला पायजे.’’
मस्तानी तलावाशेजारी बसल्या बसल्या जोडीदारासोबत बोलत होतो. जोडीदार निवांत पाण्याकडं पाहत तंबाखू मळत होता. त्यानं दाढेखाली तंबाखूची गोळी ठेवली अन् माझ्याकडं पाहत म्हणाला, ‘थोडक्यात तुला लेखक व्हायचंय म्हण की.’
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तसा मी चकित होत म्हणालो. ‘व्हायचंय म्हंजी? लका मी लेखकचहे की.’ तसा तो हसत म्हणाला, ‘तू लेखक होता. आता नाय.’ मला त्याचं म्हणणं काय समजेना. तशी त्यांन बाजूला तोंड करत पिचकारी मारली. तोंड पुसत म्हणाला, ‘माणसाच्या डोक्यात हवा गेली की तो माणून राहत नाय. तुम्हा डोक्यात हवा गेलेल्या लेखकांना विचारलं ना, की बाबा तू माणूसहे का लेखकहे? तर तुमी गयबानी कॉलर टाईट करता अन् म्हणता, आम्ही लेखक आहोत. म्हंजी आपण लेखक असल्याचं वारं तुमच्या इतकं डोक्यात जातं की तुम्ही तुमच्यातला माणूसच मारुन टाकता. अन् तुमच्यातला माणूस मेल्याव काय माती इतिहास लिहिणार रं तुमी?’’
सातवीपासून शाळा सोडून दिलेल्या ह्या अडाणी जोडीदारानी मला दिवेघाटावरुन खाली ढकलून दिल्यासारखं वाटत होतं. विशेष म्हणजे, माझा एवढा पाणउतारा करुनही त्याला हसू येत नव्हतं. तो शांत होता. कदाचित भरपूर लेखन केल्यावर लेखकाच्या डोक्यात हवा जाती याचं त्याला आकलन झालेलं असावं. मातीत, हिरव्या रानात, डोंगरदऱ्यात, माळरानात भटकून त्यानं त्याच्यातला माणूस जीवंत ठेवला होता. तंत्रज्ञान, सोशल मिडीया, व्हर्च्युअल जगात वावरल्यानं माझ्यातला माणूस गुदमरत चालला होता. तो स्थिर होता. मी चंचल होतो. त्याला प्रसिद्धीची हाव नव्हती. मला मोह होता. तो अडाणी असला तरी त्याचा दृष्टीकोन व्यापक होता. मी सुशिक्षित असूनही संकुचित होतो.
तरीही आपण याच्यापेक्षा जास्त पुस्तकं शिकलोय आणि एका अडाणी माणसाकडून बोलण्यात आपण कसंकाय हारु शकतो, असा विचार करत मी म्हणालो, ‘‘आम्हा लेखकांच्या मनात माणूस मुरलेला असतोय. आम्हाला माणसाच्या भावना समजतात. आम्ही भावनाप्रधान असतो म्हणून माणसांच्या मनाचा ठाव घेतो. मानवी भावना कागदावर मांडतो. पण, तुम्हाला आमच्या भावना काय समजणार? अहंकार, द्वेष, मत्सर आम्हाला स्पर्शही करत नाही.
कदाचित म्हणूनच आम्ही पाण्यासारखं नितळ लेखन करत असतो.’’ मी पुढं बोलत होतो. पण, जोडीदारानं दुर्लक्ष करत तोंडातल्या तंबाखूची गोळी फेकून दिली. काही न बोलता दगडावरुन उठला आणि गुरांमागं निघून गेला. बैलाच्या पाठीवरुन हात फिरवू लागला. कुत्र्याकडं पाहत हसू लागला. काळ्या मातीत बसलेल्या बगळ्यांकडं प्रेमानं पाहू लागला. त्याच्या लेखी मी बाद होतो. डोक्यात हवा गेली की प्रत्येकजण बादच असतो...
Edited By - Prashant Patil