गप्पा ‘पोष्टी’ : तुमचा-माझा देश! 

My-Country
My-Country

मला आपल्या स्वातंत्र्य दिनापेक्षा प्रजासत्ताक दिन जास्त आवडतो! खरं तर, दोन्ही दिवशी सुट्टीच असते, जमलंच तर कुठंतरी झेंडावंदन करायचं अन् दिवसभर निवांत पडीक राहायचं किंवा लाँग वीकएण्ड असला, तर चिल मारत कुठंतरी ट्रिपला जायचं. पंधरा ऑगस्टला पावसाळी ट्रिपला जायचं आणि सव्वीस जानेवारीला हिवाळी ट्रिपला.  

हे एवढं सोडलं तर दोन्हीत फरक काय? आणि एकापेक्षा दुसरा दिवस जास्त आवडायचं कारण काय आहे असा प्रश्न पडणं अगदीच स्वाभाविक आहे. तसंच ह्या दोन्ही दिवशी देशभक्तीचे मेसेजेस व्हॉट्सॲपवर मोठ्याप्रमाणात फॉरवर्ड करायचे असतात, एवढं सोडलं तर यात आवडण्यासारखं विशेष काय आहे असंही वाटणं स्वाभाविक आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ह्या साऱ्या प्रश्नांचं एका वाक्यातलं उत्तर असंय की ‘देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात माझा काहीही सहभाग नव्हता (कारण मी स्वातंत्र्यानंतरच जन्मलो!) पण देश प्रजासत्ताक असण्यात आणि राहण्यात माझा खारीचा वाटा मी देत राहू शकतो!’ 

२६ जानेवारीला आपली राज्यघटना अमलात येऊन त्यानुसार आपण ‘प्रजासत्ताक’ देश बनलो म्हणून हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे, हे आपण दोन मार्कांच्या उत्तरासाठी नागरिकशास्त्रात शिकलोच होतो. पण त्या दोन मार्कांच्या आणि मग जन्मभर मिळणाऱ्या हक्काच्या सुट्टीच्या पलीकडं ह्या दिवसाकडं पाहातच नाही आपण. नाही म्हणायला शाळेतली बच्चेकंपनी उत्साहानं संचलन करायला शाळेत जाते, काही थोरली मंडळी अजूनही भारावून जाऊन दिल्लीतलं लष्कराचं संचलन वगैरे बघतात, अन् सोशल मीडियावर देशभक्तिविषयक पोस्ट्सचं उधाण येतं. ह्या सगळ्याच्या पलीकडं जाऊन २६ जानेवारीचा दिवस हा आपल्या सगळ्यांनाच आवडायला हवा कारण आजच्या दिवशी हा देश तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या हक्काचा, आपल्या सगळ्यांचं आपल्यावरच राज्य असलेला ‘प्रजासत्ताक’ झाला! 

आपण प्रजा आहोत अन् आपणच राजे. आपणच जनता आहोत, आपणच नेते. आपण सारेजण ह्या देशाचे भाग्यविधाते आहोत. ह्या साऱ्याची जाणीव अत्यंत प्रखरपणे आजच्या दिवशी आपणच स्वीकारलेल्या ‘वुई, द पीपल ऑफ इंडिया’ म्हणजे ‘आम्ही भारतीय’ ह्या वाक्यानं सुरू होणाऱ्या आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिली. भारत हा तुमचा, माझा, आपल्या सगळ्यांचा देश आहे. आपल्या राज्यघटनेनुसार तो सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आहे. हा देश न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ह्या अत्यंत उदात्त तत्त्वांवर आधारित आहे. ह्यातलं कोणतंही एक तत्त्व घेऊन त्यावर फक्त चिंतन करणं किंवा ते खरोखर अमलात येण्यासाठी प्रयत्न करणं ह्यासाठी अगणित माणसं आपापली आयुष्यं झोकून देत आली आहेत, अजूनही देत आहेत! 

ह्या अशा, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या हक्काच्या असलेल्या प्रजासत्ताक देशात माझा जन्म झालाय हे मी माझं भाग्य आहे असं समजतो. हा देश असाच, तुमच्या माझ्या, इथं जन्मलेल्या अन् राहणाऱ्या सगळ्यांच्याच मालकीचा ‘प्रजासत्ताक’ राहावा, आपण सगळेच ह्या देशाचे सर्वोच्च, सार्वभौम रहो हे माझं आणि आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे असं मला वाटतं. 

अन् ह्याची जाणीव दर २६ जानेवारीला मला होते. म्हणून, मला आपल्या स्वातंत्र्य दिनापेक्षा प्रजासत्ताक दिन जास्त आवडतो...

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com