गॅजेट्स : तंत्रज्ञानाच्या साह्याने जपा आरोग्य!

ऋषिराज तायडे
Wednesday, 17 June 2020

कोरोनामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेला लॉकडाउन आता टप्प्याटप्प्याने शिथिल होत आहे; मात्र राज्यासह देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढत चालला आहे.

कोरोनामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेला लॉकडाउन आता टप्प्याटप्प्याने शिथिल होत आहे; मात्र राज्यासह देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढत चालला आहे. कोरोनाची साथ कधी संपेल माहिती नसल्यामुळे प्रत्येकाला आपापली वैयक्तिक काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याच अनुषंगाने आपल्या आरोग्यावर देखरेख ठेवणाऱ्या काही गॅजेट्सबद्दल...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

1) कॉन्टॅक्टलेस थर्मल स्कॅनर
कोरोनाचे प्रमुख लक्षण म्हणजे ताप होय. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने एखाद्याचे तापमान मोजताना सोशल डिस्टन्सिंगचे भान राखावे लागते. त्यामुळे कॉन्टॅक्टलेस थर्मल स्कॅनरचा वापर केला जातो. इन्फ्रारेड किरणांच्या मदतीने हे थर्मल स्कॅनर व्यक्तीचे तापमान मोजते. कार्यालये, मॉल, दुकानांमध्ये दिसत असलेल्या या थर्मल स्कॅनरची पुढील काळात प्रत्येक घरी आवश्यकता असेल. 

2) पल्स ऑक्सिमीटर
रक्तातील ऑक्सिजनची पातळी खालावल्यास रुग्णाला श्‍वास घेण्यास त्रास होतो. त्याशिवाय श्‍वास घेण्यास त्रास होणे, हे कोरोनाचे लक्षण समजले जाते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण नियमितपणे तपासणे आवश्यक आहे. पल्स ऑक्सिमीटर हे वापरण्यास सोपे असून, त्यात हाताचे बोट ठेवल्यास अवघ्या काही क्षणात तुमच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कळेल. सामान्यपणे रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९५ टक्के असते. त्यापेक्षा कमी असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.

3) ब्लड प्रेशर मॉनिटर
सध्याच्या धकाधकीच्या काळात अनेक जणांना तणावाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेकांना रक्तदाबाचा त्रास असल्याचे आपण जाणतो. त्याशिवाय रक्तदाबाची पार्श्‍वभूमी असलेल्या कोरोना रुग्णांची अधिक काळजी घ्यावी लागते. त्यामुळे रक्तदाब तपासण्यासाठी प्रत्येकवेळी दवाखान्यात न जाता घरच्या घरी रक्तदाब मोजण्यासाठी ऑटोमॉटिक ब्लड प्रेशर मॉनिटरचा वापर करता येईल.

4) ग्लुकोमीटर
कोरोना-बाधितांच्या मृत्यूमध्ये मधुमेहाची पार्श्‍वभूमी असलेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात मधुमेह असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्यासाठी ग्लुकोमीटर घरी असणे संयुक्तिक ठरते. शक्यतो ग्लुकोमीटरचा वापर डॉक्टरांच्याच सल्ल्याने करावा.

5) पोर्टेबल ईसीजी मॉनिटर
कोरोनामुळे अनेकांमध्ये नैराश्य, चिंता, चिडचिडेपणा वाढला आहे. त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या हृदयावर होत असतो. हृदयाचे कामकाज सुरळीत सुरू आहे की नाही, हे तपासण्यासाठी ईसीजीचा वापर केला जातो. दवाखान्यात तुमच्या छातीला इलेक्ट्रोड लावून हृदयातील ठोक्यांनुसार ते आलेखाच्या स्वरूपात दिसते. कालांतराने त्यात नवनवीन बदल झाले आहे. आता तर एका छोट्या डिव्हाईसवरील बटणांवर दोन्ही हातांचे बोटे ठेवून ईसीजीचा निकाल त्या डिव्हाईसला जोडलेल्या मोबाईलवरील ॲपमध्ये दिसू शकेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rushiraj tayade on health care by technology