गॅजेट्स : तेरी बॅटरी ‘लो’ है क्या?

गॅजेट्स : तेरी बॅटरी ‘लो’ है क्या?

सध्या नवा मोबाईल विकत घेताना ग्राहक म्हणून आपण ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष देतो, ते म्हणजे मोबाईलचा कॅमेरा, प्रोसेसर आणि बॅटरी. इंटरनेटचा वाढता वापर आणि मोबाईलवरील वाढलेल्या अवलंबित्वामुळे मोबाईलची बॅटरी वेगाने कमी होते. त्यामुळे प्रसंगी अनेकांना पॉवर बँक किंवा अतिरिक्त मोबाईलचा वापर करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे मोबाईलची बॅटरी लवकर डिस्चार्ज होऊ नये म्हणून सोप्या टिप्स...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजच्या तंत्रज्ञानाच्या आणि धावपळीच्या युगात तुमच्या-आमच्या आयुष्यात मोबाईलचे महत्त्व वाढले आहे. देशात इंटरनेटची सहज उपलब्धता झाल्याने हवे ते सर्फिंग करता येऊ लागले. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळेही मोबाईलवरील स्क्रीन टाइममध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यापाठोपाठ आता लॉकडाउनच्या काळात अनेक कार्यालयीन कामे मोबाईलवरच केली जात आहेत. त्याशिवाय शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणामुळेही अनेक विद्यार्थी मोबाईलवरच अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. एवढेच नव्हे, तर बदलत्या काळानुसार ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवरील वेबसीरिज, शोज्, इव्हेन्ट्स आणि आता सुरू असलेल्या आयपीएलचे सामनेही मोबाईलवरच पाहिले जातात. या सगळ्याच गोष्टींसाठी मोबाईलचा वापर केला जात असल्याने मोबाईलची बॅटरी वेगाने डिस्चार्ज होते.

सतत केले जाणारे ब्राउझिंग, नेव्हिगेशन, मीडिया प्लेबॅकमुळे बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्याची समस्या जाणवते. बॅटरी लवकर डिस्चार्ज होत असल्यास काही क्लृप्त्या नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. यामुळे मोबाईलची बॅटरीलाइफ वाढण्यास मदत होऊ शकते.

ब्राइटनेस संतुलित ठेवा
आजकाल मोबाईलमध्ये सहा इंचाहून अधिक आकाराचे हाय रिझॉल्युशन डिस्प्ले मिळत आहे. त्यातच मोबाईलचा ब्राइटनेस जास्त असल्यास बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. त्यामुळे शक्यतो ब्राइटनेस कमी ठेवा. ब्राइटनेस सतत कमी-जास्त करायचा नसल्यास तो ऑटो सेव्ह मोडवर ठेवल्यास त्याचा बॅटरीवर फारसा परिणाम होणार नाही.

ऑलवेज ऑन डिस्प्ले नकोच
आपल्यापैकी अनेकांना डिस्प्ले फिचर सतत ऑन ठेवायची सवय असते. मोबाईलचा डिस्प्ले सतत सुरू राहिल्यास मोबाईलची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. त्यामुळे शक्यतो डिस्प्ले फीचर २५ ते ३० सेकंदांनंतर आपोआप बंद करण्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन ते बदल केले पाहिजेत. त्यामुळे मोबाईलची बॅटरी अधिक काळ टिकू शकते.

लाइव्ह वॉलपेपरचा वापर टाळा
तुमच्या मोबाईलमध्ये लाइव्ह वॉलपेपरचा वापर होत असल्यास मोबाईलचा डिस्प्ले हायर फ्रिक्वेंसीवर अपडेट राहतो. त्यामुळे बॅटरी वेगाने डिस्चार्ज होते. त्यामुळे मोबाईलची बॅटरी अधिक काळ टिकविण्यासाठी लाइव्ह वॉलपेपरचा वापर टाळलेलेच फायदेशीर आहे.

जीपीएस आणि ब्लू टूथ खर्चीक
एखाद्या ठिकाणचा पत्ता शोधण्यासाठी किंवा त्या ठिकाणी जाणारा मार्ग शोधण्यासाठी हल्ली जीपीएस वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, जीपीएस कायम सुरू असल्यास मोबाईलची बॅटरी वेगाने डिस्चार्ज होते. त्यामुळे जीपीएस वापरात नसल्यास ते बंद करूनच ठेवा. त्याशिवाय ब्लू टूथमुळेही बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. त्यामुळे गरज नसताना ब्लू टूथ बंद करूनच ठेवा. केवळ गरजेच्या वेळीच त्याचा वापर करायला हरकत नाही.

बॅकग्राउंड ॲप्स काढूनच टाका
हल्ली प्ले-स्टोअर असो किंवा अॅप-स्टोअरवर लाखो अॅप्स उपलब्ध आहेत. त्याशिवाय सोशल मीडियावरील आपल्या आवडी-निवडीनुसार संबंधित अॅपच्या जाहिराती आपल्याला दिसतात. ते आपण सहज डाउनलोड करतो. सुरुवातीला काही दिवस हे अॅप्स वापरल्यानंतर ते अडगळीतच असतात. अनेकदा बॅकग्राउंडला हे ॲप्स फोनच्या प्रोसेसरला व्यग्र ठेवतात, त्यामुळे मोबाईलची बॅटरी खर्च होते. प्रोसेसरचा वापर कमी करण्यासाठी आणि बॅटरी टिकविण्यासाठी अनावश्यक आणि बॅकग्राउंड ॲप्स अनइन्स्टॉल करा.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com