यिनच्या मंत्रिमंडळात शेतकरी हाच केंद्रबिंदू असला पाहिजे - रविकांत तुपकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिनच्या मंत्रिमंडळात शेतकरी हाच केंद्रबिंदू असला पाहिजे - रविकांत तुपकर

यिनच्या मंत्रिमंडळात शेतकरी हाच केंद्रबिंदू असला पाहिजे - रविकांत तुपकर

मुंबई, ता.२३: शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून राज्यात आणि केंद्रात ही सरकार चालत नाही. कारण शेतकऱ्यांची कोणतीही वोट बँक नाही. मतदानाचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी "हिंदू खतरे मे है" असा प्रचार सुरू होतो. तर दुसरीकडे जातीसंबंध, नातेवाईक आणि पक्षही आडवे येतात. त्यामुळे शेतकऱ्यांची, त्यांच्या प्रश्नाबद्दलची भीती राजकारण्यांना वाटत नाही ती भीती वाटली पाहिजे म्हणूनच यिनच्या मंत्रिमंडळात शेतकऱ्यांचे विषय अजेंड्यावर आले पाहिजेत. असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भरलेल्या यिनच्या अधिवेशनात तुपकर हे "लीडर कसा असावा" या विषयावर बोलत होते. राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांना सामोरे जावे लागत असलेल्या विविध समस्यांचा मागवा घेत त्यांची उकल तुपकर यांनी केली. यावेळी यिनच्या प्रतिनिधींनी तुपकर यांना टाळ्या वाजवून मोठा प्रतिसाद दिला.

देशात आणि राज्यात शेतकऱ्यांची वोट बँक तयार झाली पाहिजे तरच त्यांच्या प्रश्नाला राजकारणी प्राधान्य देतील असेही तुपकर म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाचे जगणे सुखकर करण्यासाठी तशी व्यवस्था निर्माण केली होती. तशीच व्यवस्था निर्माण झाली पाहिजे असेही ते म्हणाले.

येत्या काळात तुमच्यातले बरेच जण राजकारणात येतील. मात्र, तरुणांनी प्रचंड वाचन केले पाहिजे वाचनाशिवाय काही कळत नाही. माणसे अनुभवा. शॉर्टकटचा मार्ग अवलंबू नका. लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांच्या जोरावर या देशातील सत्ता परिवर्तन करून एक क्रांती घडवून आणली होती. ती ताकद विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्या ताकतीचा आपण विचार करा असे आवाहनही तुपकर यांनी यावेळी केले. तसेच कोणताही संघर्ष आणि आंदोलन करताना त्यातून लोकांच्या पदरात काहीतरी पडले पाहिजे. चळवळीच्या माध्यमातून वैचारिक बैठक असली पाहिजे. तरच राजकारणात याला हरकत नाही. समाजाकडून मोठेपणा मोठेपण हवे असेल तर तुम्हाला यातना सहन करावे लागतील हे मनाशी ठरवूनच ठेवा. मंत्री, आमदार हे हुशार असतात हेही डोक्यातून काढा. तुमच्या नावाचा ब्रँड समाजात कायम राहील जाईल असे काम करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या सुरक्षेचा कायदा आणला पाहिजे. त्यामुळे आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल. देशातील सर्व चित्र लक्षात घेता लोकशाही धोक्यात आली आहे. तिला आणि आपल्याला देश वाचवायचा आहे. त्यामुळे राजकारणात येताना तुम्हाला स्वतःची आहुती द्यायची तयारी ठेवली पाहिजे. तरच समाजाला काहीतरी देता येईल. त्यामुळे संघर्षाचा मार्ग निवडायचा असेल तर परिणामाची चिंता करू नका. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही म्हणून मी राज्यमंत्रीपदाच्या निमित्ताने मिळालेल्या लाल दिव्याच्या गाडीला लाथ मारून एसटीने गावी प्रवास करत गेलो चांगले काम करत जा. समाज आपल्याला कमी पडू देत नाही. तुमची तुमची प्रतिभा, तुमची क्षमता तुमच्यात असलेले अंगभूत कौशल्य याचा वापर समाजाच्या विकासासाठी झाला पाहिजे. भविष्यात प्रामाणिक माणसाला किंमत येणार आहे. प्रामाणिक माणसाच्या शोधात लोक असतात. त्यामुळे सामान्य माणसाला आपला आधार वाटला पाहिजे. नेता हा कायमच लोकांनाही आधार देणारा असला पाहिजे. नेतृत्व हे सगळ्या क्षेत्रात असते मात्र त्यापेक्षा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्या क्षेत्रात तुम्ही बाप असले पाहिजे. त्यामुळे युनिक पद्धतीने राजकारण करा. नेत्यांचे वाढदिवस साजरे करणे बंद करा आपल्या आई-वडिलांचे घरात फोटो ठेवा आणि शेतकऱ्यांना केंद्रित ठेवून आपले मार्ग निवडा असे आवाहनही त्यांनी केले.