esakal | लग्नाची गोष्ट : एकदम ‘सही’ सिल्व्हर ज्युबली!
sakal

बोलून बातमी शोधा

Kedar and Bela Shinde

लग्नाची गोष्ट : एकदम ‘सही’ सिल्व्हर ज्युबली!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आपल्या आजूबाजूला अशी अनेक जोडपी असतात, ज्यांनी छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करून आपलं जग निर्माण करत आज यशाचं शिखर गाठलं आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील अशीच एक जोडी म्हणजे केदार शिंदे आणि त्यांच्या पत्नी बेला शिंदे. केदार शिंदे हे आपल्या सर्वांनाच परिचित असलेले लेखक-दिग्दर्शक आहेत, तर त्यांच्या पत्नी बेला निर्मात्या आहेत. या दोघांची पहिली भेट ही ‘महाराष्ट्रची लोकधारा’ या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाली होती. ते दोघंही या कार्यक्रमाचा भाग होते. यादरम्यानच त्यांच्यात छान मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यांनी १९९६मध्ये लग्न झालं व केल्यावर नुकतीच त्यांच्या सहजीवनाची २५ वर्षे पूर्ण केली आहेत.

बेला यांनी सांगितलं, ‘‘केदारचा स्वभाव हा अत्यंत मनमिळाऊ आणि गप्पिष्ट आहे. त्याला लोकांशी संवाद साधायला खूप आवडतं. समोरच्याशी नीट ओळख होईपर्यंत तो मितभाषी असतो आणि एकदा समोरच्या व्यक्तीशी छान ओळख झाल्यावर तो भरपूर गप्पा मारतो, मजा-मस्करी करतो. यासोबतच तो खूप शांत आणि संयमी आहे. तो खूप चिडलाय असं क्वचितच झालं आहे. कामाच्या बाबतीत तो भरपूर मेहनती आहे. त्याची काम करण्याची निष्ठा मला आत्मसात करायला नक्कीच आवडंल. तो करत असलेल्या प्रोजेक्टमध्ये माझाही काही सहभाग असल्यास मी आवर्जून सेटवर असते. पण त्याचं दुसऱ्या कोणत्या प्रोजेक्टचं काम सुरू असल्यास मी फारच कमी वेळा त्याच्या सेटवर जाते. दिग्दर्शक म्हणून सेटवरती तो नेहमीच उत्साही असतो. त्याच्या या उत्साहामुळं त्या सेटवरचं वातावरणही अगदी आनंदी असतं. दिग्दर्शक महणून तो खूप काटेकोर आणि शिस्तबद्ध आहे. त्याला जसं हवं तसं कामं तो उत्तमरीत्या कलाकारांकडून करून घेतो. एखादा सीन त्याच्या मनासारखा होईपर्यंत व्यवस्थित वेळ घेऊन केदार त्यावर काम करत राहतो.’’ आतापर्यंत केदार शिंदे यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट, नाटकं, मालिकांचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी केलेल्या सगळ्याच कलाकृती बेला यांना आवडतात. परंतु ‘सही रे सही’ आणि ‘श्रीमंत दामोदरपंत’ ही नाटकं आणि ‘अगंबाई अरेच्चा’ आणि ‘जत्रा’ हे चित्रपट त्यांच्या विशेष आवडीचे आहेत.

‘माझं आयुष्य सुंदर बनवण्यामध्ये बेलाचा मोठा वाटा आहे,’ असं सांगत केदारही बेलाबद्दल भरभरून बोलले. ते म्हणाले, ‘‘मनोरंजन क्षेत्र अनेक चढ-उतारांनी भरलेलं असतं. कधी आपल्या हातात काम असतं तर कधी नसतं. त्यामुळं या सगळ्या गोष्टींची सवय आम्हा दोघांनाही सुरुवातीपासूनच आहे. नुकतीच आमच्या संसाराला २५ वर्षं पूर्ण झाली आणि हा प्रवास खूप रोमांचकारी होता. याचं कारण म्हणजे मी कधी कुठं स्थिरावलो नाही. नाटकात माझं बस्तान बसेपर्यंत मी मालिकांकडं वळलो, तिथं स्थिरावत नाही तोवर मी चित्रपट करायला सुरुवात केली. माझ्या या संपूर्ण प्रवासात बेलाची मला पावलोपावली साथ लाभली आहे. बेला ही माझी उत्तम समीक्षक आहे आणि ती माझ्या आयुष्यातली एकमेव व्यक्ती जी मला हक्काने सगळं बोलू शकते. ती मला माझी स्पेस देते. तिचं प्रत्येक म्हणणं मी ऐकायलाच पाहिजे, असा तिचा कधीच अट्टहास नसतो. ती सगळ्यांना सामावून घेते. प्रत्येक माणसावर तिचा तितकाच जीव असतो. ती अत्यंत निरपेक्ष मनानं काम करते; आपण असं केल्यानं लोक आपलं कौतुक करतील, आपल्याला छान म्हणतील अशी ती कधीही अपेक्षा करत नाही. तिचा हा गुण मला विशेष भावतो. तिच्या माझ्या आयुष्यात येण्यानं माझ्यात अनेक साकारात्मक बदल झाले आहेत, माझं आयुष्य आणखीन सुंदर झालं आहे हे मी खात्रीनं सांगू शकतो."

अशाप्रकारे एकमेकांना सांभाळत, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, प्रत्येक निर्णयात एकमेकांची साथ देणारी ही जोडी खरोखर सर्वांसाठीच आदर्श आहे.

(शब्दांकन - राजसी वैद्य)