छोटे-मोठे बिझनेस करतोय!

hurda
hurda

‘बायको डॉक्‍टर आहे. सध्या तिच्याच पगारावर घर चालूहे. मी असे छोटे-मोठे बिझनेस करून घराला हातभार लावतोय.’ 

एवढं स्पष्ट बोलायला हिंमत लागते आणि ती या पोराच्या शब्दात होती. ‘एरवी माझ्या पैशावर घर चालते आणि बायको घराला हातभार लावते,’ असं वाक्‍य प्रत्येक पुरुषाच्या तोंडातून येतं. पण, पुरुषप्रधान विचारांना खणखणीत टोला देत अमित नावाच्या पोरानं बोलायला सुरवात केली. एक वर्षं मी त्याला फेसबुकवर ओळखत होतो. पण, कधी भेटलो नव्हतो. परवा भेट झाली आणि हा पोरगा व्यक्त होऊ लागला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘लॉकडाउनच्या टायमाला बाकी लोकांसारखं आम्हीपण पुणे सोडून गावाला गेलो होतो. तिकडं दवाखानाही टाकला. पण, पुणे सोडून गावाला जाणं हे प्रत्येकाच्या लेखी मोठं अपयश समजलं जातं. तिकडं बायकोचा दवाखाना चालू झाला, पण खेडेगावात मला नोकरी कुठून मिळणार? बायकोच्या पैशावर जगतो, असंही लोकं म्हणायचे. लोकांनी नावं ठेवली, की मला लाज वाटायची. बायको धीर द्यायची, पण मन स्वस्थ राहत नव्हतं. कसेबसे दोन महिने घालवले आणि लॉकडाउन संपल्यावर पुन्हा पुण्याला आलो. आता बायको मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरीला जाते आणि मी असे छोटे मोठे बिझनेस करतोय.’ 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

छातीवर भार देणारं भलमोठं आव्हान तो सहज व्यक्त करत होता, त्यामुळं त्याचं कौतुक वाटतं होतं. त्यानं हुरड्याचं पाकिट दाखवलं आणि म्हणाला, ‘घरपोच हुरड्याचा बिझनेस चालू केलाय. तेच पॅकेट द्यायला आलो होतो इकडं.’ मी म्हणालो, ‘तुला छोटे मोठे बिझनेस करायची लाज वाटत नाही, हीच खूप मोठी गोष्ट आहे.’ तसा तो हसत म्हणाला, ‘बिझनेस दिसायला छोटा दिसतो, पण उत्पन्न चांगलं मिळतं. मला तर वाटतं प्रत्येकानी असे छोटे मोठे बिझनेस करायला पाहिजेत. नवनव्या आयडिया लढवल्या पाहिजेत. सगळा पैसा आयडियाचा असतोय. आता मला सांगा, या हुरड्यात काय नवीन आहे तेव्हा? दर हिवाळ्यात खातो तसा हा हुरडा. पण, कोरोनाच्या टेंशनमध्ये तुम्हाला हाच हुरडा घरपोच मिळणार असेल तर? झाला की नाही बिझनेस? माणसाच्या गरजा खूप कमी असतात, पण त्या गरजा पूर्ण करण्याचे मार्ग हजार आहेत. त्या मार्गामध्ये तुम्ही एका नव्या मार्गाची भर टाकली की तुमचा  व्यवसाय सुरू.’ 

अतिशय कमी शब्दांत एका तरण्या पोरानं व्यवसायाचं मर्म उलगडून दाखवलं होतं. व्यवसाय करण्यासाठी मोठ्या शिक्षणाची, भरपूर पैशांची किंवा बारा लाख भाषणं ऐकण्याची गरज नसते. गरज असते फक्त स्वत:ला ओळखण्याची. आपल्या गरजा समजून घेण्याची आणि कुटुंबाचं पोट भरण्याच्या तळमळीची. अमित करतोय तसा आपणही प्रामाणिकपणे नव्या आयडिया घेऊन व्यवसाय केला, तर आपणही भरपूर पैसे कमावणारे मोठे उद्योजक होऊ शकतो. फक्त एक मिनिट डोळे बंद करून विचार करून पाहा. मार्ग आपल्यासमोरच असेल. कारण हा अमित आपल्यासारखाच साधा सरळ माणूस आहे, देव नाही. विचार करा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com