मी सरड्याचा वंशज...

मी सरड्याचा वंशज...

वडिलांना पॅरालिसिसचा झटका आला म्हणून त्यांना एका पंचतारांकित दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. मेडिक्‍लेम असला की विनाकारण आपण श्रीमंत असल्याचा फिल येतो, तसा तो येत होता. आयसीयूबाहेर बसून कंटाळा आला म्हणून चहा घ्यायला कॅंटीनमध्ये आलो. नेमका एकजण तिथे भेटला. म्हणाला, ‘नितीन थोरात ना?’ मी होकार दिला. कपड्यांवरून तर तो गावाकडच्या गरीब घरातला वाटला. मी स्मित करत म्हणालो, 

‘तू इकडे कसा?’

तो वयाने लहान होताच. पण, कपडे पाहून त्याला अरेतुरे करावं असंच वाटलं. गरिबाला कधी कुणी अहोजाहो करतं का? मीही नाही केलं. 

तो म्हणाला, 

‘बहिणीच्या गाडीखाली एक म्हतारी आली, म्हणून त्या म्हातारीला दवाखान्यात आणलयं.’

असं तो बोलत होता तोच आजूबाजूचे पंधरा वीस लोक त्याच्याभोवती गोळा झाले. सगळे एकदम ब्रॅंडेड कपडे घातलेले आणि श्रीमंत घरातले दिसणारे. तशी एक मुलगी समोर आली आणि माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलू लागली.

‘म्हणजे त्या आज्जीच ऑडीच्या बोनेटसमोर आल्या. त्यांना धक्काही लागला नाही. पण, त्यांचे रिलेटिव्ह म्हणताहेत, की आज्जींचा पाय चाकाखाली गेला. पण, त्यांच्या पायाला जखमही नाही. तुम्हीच सांगा, आपण कसा त्यांचा खर्च द्यायचा?’

फेसबुकवरच्या त्या मित्राची संपूर्ण श्रीमंत फॅमिली माझ्यासमोर उभी होती. त्यांच्याकडं ऑडी कार होती. ते इंग्लिशमध्ये बोलत होते. लगेच मी रंग बदलला. ‘तुम्ही त्यांना खर्च नाहीच दिला पाहिजे. त्या आज्जीच आपल्या गाडीखाली आल्या होत्या ना?’ मी असं म्हणताच मी त्यांच्यातला झालो. मलाही आपण श्रीमंत असल्याचा फिल येऊ लागला. इतक्‍यात त्या आज्जीचा मुलगा आणि सून समोर आले आणि म्हणू लागले, ‘अहो, पण डॉक्‍टर एक लाख रुपये खर्च सांगताहेत. एवढा खर्च करणं आम्हाला कसं शक्‍य आहे?’

आज्जीचे नातेवाईक गरीब वाटत होते, तर फेसबुकच्या मित्राचे नातेवाईक श्रीमंत. पण, मी आता स्वतःला श्रीमंत समजू लागलो होतो. मी आज्जीच्या नातेवाइकांना म्हणालो, ‘अहो, पण आज्जींचं वय झालंय. आमच्या ऑडीचं चाक त्यांच्या पायावरून गेलंही नाही. उलट आम्हीच त्यांना दवाखान्यात आणलंय ना?’ 

बहुतेक त्या श्रीमंतांनाही मी त्यांच्यातला वाटू लागलो होतो. मी श्रीमंतांचा झालो होतो आणि ते लोक गरीब. इतक्‍यात फोन आला म्हणून मी पाच मिनिटांसाठी बाजूला गेलो. फोनवर बोलून पुन्हा त्या घोळक्‍याकडं आलो. समोर बघतो तर आज्जीच्या नातेवाइकांच्या बाजूची गर्दी वाढलेली. त्यात आठ दहा जण बॉडीबिल्डर. म्हणजे बाउन्सर असतात ना, तशा तब्येतीवाले. कुणाच्या दंडावर टॅटू काढलेला तर कुणाचे केस वाढलेले. साउथच्या फिल्ममध्ये गुंडांची फौज असते ना, तसे सगळेजण. त्यांना पाहून मी आवंढाच गिळला. तोच त्या फेसबुक फ्रेंडची बहीण मला म्हणाली, ‘तुम्हीच सांगा आपण कसा काय खर्च करणार?’

आता मला कोणता रंग घ्यावा तेच समजेना. समोरचे बॉडीबिल्डर हाताची घडी घालून माझ्याकडं बघत होते. त्यांचे बायसेफ दिसत होते. मी क्षणभर विचार केला, इथं हाणामारी झाल्यास हे गरीब लोक श्रीमंतांना चांगलेच चोपतील. 

मी क्षणात रंग बदलला आणि त्या मुलीला म्हणालो, ‘माझे बाबा आयसीयूमध्ये ॲडमिट आहेत. मला अर्जंट जावं लागेल’ आणि तिथून मी जे गेलो, ते परत पाच तास खाली चहा प्यायलाही आलो नाही.

आज अचानक असं जाणवतंय की मी माकडाचा नाही सरड्याचा वंशज असेल. तुम्ही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com