झूम : इथोनॉल, स्वदेशी इंधनाचा स्वस्त पर्याय

पेट्रोल-डिझेलच्या शंभरीतील दरांमुळे एकीकडे जनता नाराज असताना सरकार पर्यायी इंधन वापरा, असा सल्ला देत आहे.
Ethanol
EthanolSakal

पेट्रोल-डिझेलच्या शंभरीतील दरांमुळे एकीकडे जनता नाराज असताना सरकार पर्यायी इंधन वापरा, असा सल्ला देत आहे. मात्र, त्याससाठी ठोस धोरण, पायाभूत सुविधांवर भर दिला जात नसल्याने नागरिकही या इंधनांकडे अजूनही वळलेले नाहीत. हे इंधन फायदेशीर आणि प्रदूषणविरहित कसे, याबाबत जनजागृती करून जनतेला दिलासा देणारे धोरण सरकारने आखणे आवश्‍यक आहे.

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्याच आठवड्यात इंधनाच्या वाढत्या दरांबाबत वक्तव्य करत सरकार वाहन उद्योगात मोठे धोरण ठरवत असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो, असेही म्हटले आहे. यामध्ये इथोनॉलमिश्रित पेट्रोलच्या वापरावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • मागील काही वर्षात देशात टप्प्याटप्प्याने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण वाढवले जात आहे. पेट्रोल-इथेनॉलच्या मिश्रणामुळे इंधनाची गुणवत्ता सुधारते. तसेच, उत्पादन खर्चही कमी होऊन प्रदूषणही घटते. २०१४ला पेट्रोलमध्ये १ ते १.५ टक्के इथेनॉल टाकले जात होते. आता हे प्रमाण ८.५ टक्क्यांवर आले आहे.

  • साखर उद्योगाबरोबरच मका व इतर धान्यांपासून इथेनॉल निर्मितीचे प्रयत्न होत आहेत. देशात निर्माण होणाऱ्या इथेनॉलपैकी निम्मे इथेनॉल साखर उद्योगापासून तर निम्मे धान्यापासून तयार होते. इथेनॉलचा वापर वाढविण्याबरोबरच त्याची निर्मिती जास्तीत जास्त व्हावी यासाठी उद्योगांना सुविधा देणे आवश्यक आहे.

  • सध्या भारतात ६८४ कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याची क्षमता आहे. ही क्षमता १००० कोटी लिटरपर्यंत वाढविण्याची केंद्राची योजना आहे. भारतात साखरेचे उत्पादन अधिक होत असल्याने साखर कारखान्यांवर त्याचा भार पडणार आहे. परंतु इथेनॉलचे उत्पादन वाढल्यास साखर कारखान्यांना यातून दिलासा मिळणार आहे.

  • भारताला पेट्रोल-डिझेल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात तेलाची (८३ टक्के) आयात करावी लागते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी २०२५ पर्यंत देशात पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढण्याचे म्हटले आहे. एकूणच भारताची भविष्यातील इंधनाची गरज आणि इथेनॉल निर्मितीतून ती भागवण्याची क्षमता यावर सर्व काही अवलंबून असणार आहे.

फ्लेक्स फ्युएल इंजिन

केंद्र सरकार देशातील वाहनांमध्ये ‘फ्लेक्स-फ्यूएल इंजिन’ अनिवार्य करण्याचा विचार करत आहे. हे फ्लेक्स फ्युएल इंजिन एकापेक्षा जास्त इंधनांवर चालू शकते. पेट्रोल व्यतिरिक्त इथेनॉलसारखे इतर इंधन हे सर्व एकाच टाकीमध्ये साठवण्याची सुविधा फ्लेक्स फ्युएल इंजिनमध्ये असते. त्यमुळे पूर्णतः पेट्रोल किंवा इथेनॉल वापरण्याचा पर्याय मिळतो. अमेरिका, ब्राझील, कॅनडा यांसारख्या देशांमध्ये असे इंजिन वापरले जाते. या इंजिनमुळे इथेनॉलच्या वापराला अधिक वाव मिळतो. इंधनाच्या खर्चातही मोठी चत होईल.

इथेनॉलचे फायदे...

  • इथोनॉलच्या वापरामुळे पेट्रोलियम पदार्थांवरील भारताचे अवलंबित्व कमी होईल.

  • इथेनॉलच्या अधिकाधिक वापराने शेतकऱ्यांना फायदा होईल.

  • साखर कारखानदारांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील.

  • कार्बन डायऑक्साईड प्रमाण कमी केल्यास पर्यावरणाचे नुकसानही कमी होईल.

  • ग्राहकांना पेट्रोलच्या वाढत्या किमतींपासून दिलासा मिळेल.

ही काळजी घ्या...

इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहने मध्येच बंद पडत असल्याच्या तक्रारी येतात. त्याचे कारण पावसाळ्यात बऱ्याच दुचाकी उघड्यावरच असतात. यामुळे पेट्रोलच्या टाकीत पाणी जाते. पाण्याची व इथेनॉलची रासायनिक प्रक्रिया होऊन इथेनॉल पेट्रोलपासून विलग होते. पेट्रोल पाण्यापेक्षा हलके असल्याने ते तरंगते. त्यामुळे ही वाहने भररस्त्यात बंद पडतात. अशा घटना टाळण्यासाठी इंधनाच्या टाकीत पाणी जाऊ नये, याची दक्षता घेणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com