esakal | झूम : वाहन सुरक्षेचे सोबती
sakal

बोलून बातमी शोधा

Vehicle Security

झूम : वाहन सुरक्षेचे सोबती

sakal_logo
By
प्रणीत पवार

आपल्या देशात वाढत्या अपघातांमुळे बहुतांश रस्ते आणि वाहनेही असुरक्षित मानली जातात. काही रस्ते तंत्रशुद्ध पद्धतीने बनवलेले नसतात, तर वाहनांमध्ये सुरक्षेची वानवाच असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत चारचाकी वाहने, अर्थात विविध कारमध्ये सुरक्षात्मक बाबींकडे दुर्लक्ष केले जायचे. कालांतराने वाढते अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी लक्षात घेऊन कार निर्मिती कंपन्यांनी आपापली वाहने आणि त्यांतील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘सेफ्टी फिचर्स’कडे लक्ष देत विविध बाबींचा अंतर्भाव केला. त्यात केंद्र सरकारनेही काही सुरक्षात्मक बाबी कारमध्ये अनिवार्य केल्या आहेत. यापूर्वी आपण कार क्रॅश टेस्टवर प्रकाशझोत टाकला होता. आता कारमध्ये कोणत्या सुरक्षात्मक बाबी अत्यावश्यक आहेत, याचा आढावा आपण घेणार आहोत.

1) एअर बॅग

केंद्र सरकारने प्रत्येक कारमध्ये एअर बॅग अनिवार्य केले आहे. एअर बँग वाहनाची टक्कर झाल्यानंतर चालक, तसेच सहप्रवाशांना झटक्यांपासून वाचवते. हल्ली प्रत्येक वाहनांत दोन ते सातपर्यंत एअर बॅग असतात. अनेक मोठ्या अपघातांमध्ये केवळ एअर बॅगमुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. त्यामुळे सुरक्षा कवच म्हणून एअर बॅगकडे पाहिले जाते. प्रवाशांच्या अधिक सुरक्षेसाठी एअर बॅगचे कवच कारमध्ये समोर असण्याबरोबरच बाजूने असणेही आवश्यक आहे.

2) एबीएस (अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम)

अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम हे एक असे सेफ्टी फिचर आहे, जे दुचाकी अथवा कारला अचानक ब्रेक दाबल्यानंतर घसरण्यापासून रोखते. त्याचबरोबर वाहनाला नियंत्रणात ठेवते. अचानक ब्रेक लावल्यावर यामध्ये लावण्यात आलेले वॉल्व्ह आणि स्पीड सेंसरमुळे वाहनाची चाके लॉक होत नाहीत. परिणामी वाहन न घसरता थांबते. एबीएसमुळे चालकाला एकावेळी ब्रेक आणि स्टेअरिंगवरील नियंत्रणही राखता येते.

3) पार्किंग सेन्सर आणि कॅमेरा

वाहने पार्किंग करताना बहुतांश वेळा पाठीमागील बाजूचा अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले आहेत. यासाठीच रिअर पार्किंग सेन्सर आवश्यक आहे. या सेन्सरच्या जोडीला कॅमेरा असेल, तर वाहने पाठीमागे घेताना आणखी सुलभ होते. पार्किंग सेन्सर अंतराच्या तत्त्वावर चालते. कारपासून जवळच्या टप्प्यात काही अडथळा आल्यास पार्किंग सेन्सर वाजतात. त्यामुळे पाठीमागे धोका असल्याचे चालकाच्या लक्षात येताच आवश्यक ती काळजी घेतली जाते.

4) टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम

टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस) हे टायरमधील हवेची माहिती देते. या सिस्टिममध्ये पाच प्रकारचे सेन्सर लागलेले असतात, जे टायरमध्ये भरलेल्या हवेवर लक्ष ठेवतात. हवा आवश्यक पातळीपेक्षा कमी होते, तेव्हा कारमधील डॅशबोर्डवर लावलेल्या स्क्रिनद्वारे त्वरित याची सूचना दिली जाते. महामार्गावर टायरमधील हवेचा दाब वाढतो, त्यामुळे टायर फुटण्याचा धोका असतो किंवा रस्त्यावर टायर अचानक पंक्चर होऊन होणारी दुर्घटना या सिस्टिममुळे टळते.

5) सिट बेल्ट रिमाइंडर

कारमध्ये एअर बॅगप्रमाणेच सिट बेल्टचे महत्त्व आहे. कारची टक्कर झाल्यानंतर चालक किंवा सहप्रवाशांना बाहेर फेकण्यापासून हे सिट बेल्ट रोखते. प्रवासादरम्यान बरेचसे चालक, तसेच सहप्रवासी कारमध्ये सिट बेल्ट लावणे विसरतात किंवा जाणूनबुजून ते लावलेही जात नाहीत. यासाठीच कारमध्ये सिट बेल्ट रिमाइंडर असणे आवश्यक आहे. जोपर्यंत सिट बेल्ट लावत नाहीत तोपर्यंत कारमध्ये ‘बीप’ आवाज चालक तसेच सहप्रवाशांना सिट बेल्ट लावण्याची आठवण करून देत राहते.

loading image