esakal | गप्पा ‘पोष्टी’ : अद्य एव ‘मरण’ सिद्धांत
sakal

बोलून बातमी शोधा

My Bucket List

गप्पा ‘पोष्टी’ : अद्य एव ‘मरण’ सिद्धांत

sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

‘अद्य एव मरण सिद्धांत’ नावाची थिअरी मी तरुणपणी कुठल्याशा वर्कशॉपमध्ये शिकलो होतो. (म्हणजे मी अजूनही तरुणच आहे, पण ते असो!) थिअरी अगदी साधी सोपी होती. पहिली गोष्ट म्हणजे आपण कधीतरी मरणार आहोत, हे मनोमन स्वीकारायचं. म्हणजे, आज, उद्या, दहा-वीस-पन्नास वर्षांनी, कधीतरी मरणार आहोत हे आपल्याला माहीत असतंच. नक्कीच मरणार आहोत याची खात्रीही असते, पण ही माहिती किंवा खात्री काहीशी थिअरॉटिकल किंवा पुस्तकी असू शकते. तर ती तशी न ठेवता, ‘मी कधीतरी मरणार आहे,’ हे सत्य मनोमन स्वीकारायचं!

समजा, आपण कधी मरणार आहोत हे आपल्याला पक्कं माहीत असेल तर, आजपासून मरेपर्यंत आपल्याला नक्की काय काय करायचं आहे, काय काय अनुभवायचं आहे याची यादी करायला घ्यायची. म्हणजे समजा आपण आजपासून चाळीस वर्षांनी आपण मरणार आहोत हे माहीत असेल, तर पुढची चाळीस वर्षं आपल्याला काय करायचं आहे, काय अनुभवायचं आहे ह्याची यादी करायची. ह्या यादीत काय असावं आणि काय नाही याला काही नियम नाहीत, नियम ठेवायचेच नाहीत. अक्षरशः आजपासून ते पुढची चाळीस वर्षं आपल्याला काय काय करावंसं वाटतंय, काय काय अनुभवावंसं वाटतंय हे लिहीत राहायचं. ‘एव्हरेस्टवर जाणं, अंटार्टिका बघणं’ असो, ‘जगप्रवास करणं’ असो, आलिशान बंगले, गाड्या वगैरे असलेला कोट्यधीश बनणं’ असो. जे जे मनात येईल ते लिहीत राहा. छोट्या वन लायनर स्वप्नापासून ते मोठ्या पानभर निबंधापर्यंत काहीही! भली मोठी यादी होईल ती. ह्या यादीला कोणी ‘विश लिस्ट’ म्हणतं, कोणी ‘बकेट लिस्ट’.

आता महत्त्वाची स्टेप आहे. ही सगळी यादी आपण केली, ती आपण आणखी चाळीस वर्षे जगू असं गृहित धरुन! आता समजा चाळीस ऐवजी वीसच वर्ष जगणार आहोत असं गृहित धरा. मग त्या यादीत काटछाट करायला लागा. वीस वर्षांतच करू शकू, करता येतील एवढ्याच गोष्टी त्या यादीत ठेवायच्या. मग वीस ऐवजी दहाच वर्षं, दहा ऐवजी पाचच वर्षं, पाच ऐवजी दोनच वर्षं जगणार असू असं समजून ती यादी काटछाट करून सुटसुटीत बनवत जायची. अन् मग आपण उद्याच मरणार आहोत, आपली आपल्यासाठीची जगबुडी उद्याच आहे असं गृहित धरून त्या यादीतल्या इच्छांची फायनल काटछाट करायची.

मग त्या यादीत ज्या इच्छा उरतात. जे करावंसं वाटतं, जे जगावंसं, अनुभवावंसं वाटतं ते ह्या क्षणी करायला, जगायला, अनुभवायला लागायचं! हे असं जगायला लागलं, की उद्या मरण येईल न येईल, उद्या जगबुडी होईल न होईल, आपलं मनमुराद जगणं, आपलं समाधान आणि आपला मोक्ष ग्यारंटेड असतो!

हाच तो ‘अद्य एव मरण सिद्धांत!’

loading image