esakal | टेक्नोहंट : ट्विटरची अफलातून ‘स्पेस’
sakal

बोलून बातमी शोधा

Twitter

टेक्नोहंट : ट्विटरची अफलातून ‘स्पेस’

sakal_logo
By
ऋषिराज तायडे

सध्या लॉकडाऊनच्या काळात समाज माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आतापर्यंत चॅटिंग, ग्रुप चॅटिंग, ब्रॉडकास्ट, व्हिडिओ कॉलिंग आदी सुविधा समाज माध्यमांवर मिळत होत्या. मात्र, बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर नवनवीन फीचर्स उपलब्ध करून दिले जात आहेत. अशाच प्रकारे सध्या चर्चा आहे ती ट्विटर स्पेसची. नेमके काय आहे ट्विटर स्पेस, जाणून घेऊया..

ऑडिओ बुक्स, पॉडकास्टसारख्या ऑडिओ प्लॅटफॉर्मची क्रेझ वाढत आहे, त्याचप्रकारे एकाचवेळी अनेकांशी संवाद साधण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी किंवा एखाद्या विषयावरील चर्चा रंगवण्यासाठी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ऑडिओ सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेला पर्याय म्हणजे ट्विटर स्पेस. ऑडिओ चॅट रुमसारखे स्वरूप असलेल्या ट्विटर स्पेसची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा आहे. सुरूवातीला केवळ बीटा युजर्ससाठी असलेली सुविधा नुकतीच आयफोन व अॅण्ड्रॉईड युजर्ससाठीही उपलब्ध केली होती. तुम्हाला तुमच्या फॉलोअर्सशी गप्पा करायच्या असतील किंवा एखाद्या विषयावर चर्चा करायची असल्यास स्पेस निर्माण करून तुमच्या फॉलोअर्सला नोटिफिकेशन तर जाईलच, सोबत तुम्ही स्पेसची लिंक शेअर करून त्यांना निमंत्रित करू शकता. त्याशिवाय तुम्हाला श्रोता म्हणूनही इतर व्यक्तींच्या स्पेस सहजपणे एकता येते. ट्विटरवरील वरच्या बाजूला असलेल्या फ्लिटमध्ये स्पेस सुरू असल्याचे दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्हाला स्पेस जॉईन करता येईल. तुम्हालाही स्पेसमध्ये बोलायचे असल्यास खालील बाजूला माईकच्या पर्यायावर क्लिक करून जॉईन होण्याबाबत आयोजकास रिक्वेस्ट पाठवता येते. आयोजकाने रिक्वेस्ट स्वीकारल्यास तुम्हालाही संवाद साधता येईल.

ट्विटर स्पेस कशी सुरू करायची?

  • कम्पोझ ट्विटवर क्लिक केल्यावर चार पर्याय येतात, त्यापैकी सर्वांत वरील स्पेस पर्यायावर क्लिक करा.

  • त्यानंतर तुमच्या स्पेसचा विषय आणि त्याबाबत थोडक्यात लिहून ‘स्टार्ट युअर स्पेस’वर क्लिक करा.

  • अशाप्रकारे तुमची ट्विटर स्पेस सुरू होईल. तुमच्यासोबत तुम्ही इतर दहा जणांनाही वक्ते म्हणून सहभागी करू शकता.

  • तुमच्या स्पेसवर इतरांना निमंत्रित करण्यासाठी शेअर पर्यायावर क्लिक करून स्पेसची लिंक इतरत्र शेअर करता येईल.

पर्याय क्लबहाऊस आणि फेसबुक हॉटलाईनचा..

ट्विटरची स्पेस येण्यापूर्वी क्लबहाऊस हा ऑडिओ चॅट रूम प्लॅटफॉर्मचा पर्याय उपलब्ध होता. क्लबहाऊस हे अॅप सध्यातरी केवळ आयफोन युजर्ससाठी मर्यादित असले, तरी लवकरच ते अॅण्ड्रॉईड युजर्ससाठीही उपलब्ध होणार आहे. त्यासोबतच फेसबुकही हॉटलाईन नावानेही या प्रकारची सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. सध्यातरी अॅण्ड्रॉईड युजर्ससाठी ट्विटर स्पेस हा एकमेव पर्याय असला, तरी क्लबहाऊस आणि हॉटलाईन सुरू झाल्यावर नेमकी कोणाला पसंती मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.