अशा रोखा अफवा... 

सम्राट फडणीस
बुधवार, 18 मार्च 2020

जबाबदार सोशल मीडिया सिटिझन म्हणून एक गोष्ट करा : फसव्या वाटणाऱ्या माहितीचा स्रोत तपासा. तो सापडत नसल्यास माहिती पुढे पाठवू नका. 

एखादी माहिती आपण आधी वाचतो, पाहतो किंवा ऐकतो. ती पटली, आवडली किंवा उपयुक्त वाटल्यास ती आपल्या माहितीतल्या चार-सहा लोकांनाही सांगतो. ही गोष्ट जशी गावच्या पारावर घडते, तशीच सोशल मीडियातही. फरक एकच असतो; गावच्या पारावर किती लोकांनी जमावं, याला एक मर्यादा आहे; सोशल मीडियात तशी मर्यादा नाही. हजार-पाचशे लोक गल्लीच्या कट्ट्यावर, गावच्या पारावर, गप्पांच्या अड्ड्यावर नसतात. त्यामुळं माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा वेग स्लो असतो. सोशल मीडियात शंभर गावांतले पाचशे लोक ‘फ्रेंड लिस्ट’, ‘फॉलोअर’ असू शकतात. त्यामुळं माहिती शंभर ठिकाणी क्षणात प्रवास करते. आजच्या जगात जे काही ‘झपाट्यानं’ म्हणून घडतं आहे, त्यात माहितीच्या वेगाचा मोठा वाटा आहे. उपयुक्त माहितीचा झपाट्यानं प्रसार होण्यात हरकत असण्याचं कारण नाही; धोका आहे तो चुकीच्या अथवा फसव्या माहितीचा. ‘मला माहिती आहे,’ हे सांगण्याच्या मोहापोटी माझ्याकडील फसवी माहिती झपाट्यानं प्रसारित होण्याचं प्रमाण वाढतं आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान माजवलेलं आहे. अशा प्रसंगात ‘माझ्याकडंही माहिती आहे,’ हे सांगण्याचा मोह टाळणं अत्यावश्‍यक आहे. तुमच्याकडची माहिती फसवी असू शकते आणि ती घात करू शकते, याची जाणीव सोशल मीडिया युजर म्हणून आपल्याला असणं महत्त्वाचं आहे. कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी जगभरातले हजारो तज्ज्ञ आपलं सारं ज्ञान आणि कॉम्प्युटर्स पणाला लावून प्रयत्न करताहेत. अशा वेळी ‘अमुक रोज खा आणि कोरोना बरा करा,’ असला संदेश कोणी देत असेल, तर ती माहिती नव्हे; सापळा आहे. या सापळ्यात आपण, आपला परिवार, माहितीतले लोक अडकू शकतात. सारा समाज अशा फसव्या माहितीचा बळी ठरू शकतो.

जबाबदार सोशल मीडिया सिटिझन म्हणून एक गोष्ट करा : फसव्या वाटणाऱ्या माहितीचा स्रोत तपासा. तो सापडत नसल्यास माहिती पुढे पाठवू नका. 

स्रोत तपासण्यासाठी #TweetToSakal या हॅशटॅगवरही विचारणा करू शकता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samrat Phadnis article rumors on social media