कम्युनिटींचे कळप

कम्युनिटींचे कळप

टाटा कंपनीच्या ‘तनिष्का’ ब्रॅंडच्या जाहिरातीभोवती उठलेलं वादळ आणि त्यानंतर ब्रॅंडनं रद्द केलेली जाहिरात सोशल मीडिया कम्युनिटींच्या वाढत्या ध्रुवीकरणाचा इशारा मानायला हवा.

ट्‌विटर ट्रेंडबद्दल आपण सातत्यानं बोलतो आहोत. एखाद्या विषयाचा ट्रेंड कसा सुरू व्हावा, याचे अल्गॉरिदम असतात. ट्‌विटरवर एखाद्या विषयावर अनेक जण एकाचवेळी लिहायला लागले, की तो विषय ट्रेेंडमध्ये येतो, असं सोप्या भाषेत सांगता येईल. यामध्ये ‘अनेक जण’ म्हणजे अनेक ट्‌विटर प्रोफाइल्स; ती खरी असू शकतात तसेच बनावट आणि एकाचीच अधिकही असू शकतात. त्यामुळं, ‘अनेक’ म्हणजे चारशे-पाचशे प्रोफाइल्स पुरेशी झाली. या चारशे-पाचशे प्रोफाइल्सवरून प्रत्येकी दहा ट्‌विट केले, तरी चार-पाच हजार ट्‌विट होतात आणि तो विषय ट्रेंडमध्ये येतो. विषय ट्रेंडमध्ये आल्यानं ट्‌विटर वापरकर्त्यांच्या नजरेत भरतो आणि चर्चेत येतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गंभीर आरोपांखाली तुरुंगात असणाऱ्यांचा गौरव करणारेही ट्रेंड ट्‌विटरवर दैनंदिन असतात. त्या व्यक्ती किंवा विषय ट्रेंडमध्ये येण्यामागं ‘एकाच विषयावर अनेक जण एकाचवेळी’ ट्‌विट करतात, हे सोपं कारण असतं. असे ट्‌विटर ट्रेंड ठरवून आणलेले असतात आणि विरोधी मताचा कचराच करायचा स्पष्ट उद्देश असतो. मत-मतांतराला, वैविध्याला तिथं वाव नसतो. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘तनिष्क’नं दाखवलं, की सोशल मीडिया अधिकाधिक ध्रुवीकरणाकडं जात आहे. ध्रुवीकरण धार्मिक तर आहेच; शिवाय जातीय, भौगोलिकही आहे. ध्रुवीकरणाला सोशल मीडियाच्या गोंडस भाषेनं ‘कम्युनिटी’ ठरवलंय. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी गेल्या तीन वर्षांत सातत्यानं म्हटलंय, की त्यांना कम्युनिटी बांधायच्या आहेत! 

‘कम्युनिटी’ या शब्दाचा अर्थ आहे, सामायिक गुणधर्म असणारा जनसमुदाय.  वास्तव जीवनात आपण सारेच कम्युनिटीत राहतो. अनेक प्रकारच्या कम्युनिटींमधून सोसायटी (समाज) बनतो. म्हणजे जात-धर्म, भौगोलिक वगैरे साधर्म्य आपल्या आसपास बागडत असतं. त्याचवेळी आपण समाजातही राहतो. समाजामध्ये वेगवेगळ्या कम्युनिटी असतात; त्यांच्याशी व्यवहार होत राहतो. सोशल मीडियाच्या आभासी कम्युनिटींमध्ये वास्तवातल्या समाजासारखी रचना नाही. परिणामी, सदस्यांनाही आपण आहोत, त्या कम्युनिटीचेच गुणधर्म सगळीकडं दिसायला हवे असतात. वैविध्य किंवा विरोधी मत याच्याशी आभासी कम्युनिटींचं वावडं असतं. स्वाभाविक सतत सोशल मीडिया वापरणाऱ्याच्या दृष्टीनं ते आहेत, तेवढाच समाज असतो. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘तनिष्क’च्या जाहिरातींत दाखविल्यासारखं वास्तव अपवादात्मक कुटुंबात जरूर असू शकतं. त्यातूनच वास्तवातल्या समाजाचं वैविध्य समोर येतं. मात्र, कम्युनिटीपलीकडं समाजात असं वैविध्य असू शकतं, हे स्वीकारण्याची आणि दर्शविण्याची व्यवस्था सोशल मीडियात नसल्यानं वैविध्य नाकारलं जातं. अशा परिस्थितीत कम्युनिटींचा कळप बनतो आणि कळपाचा नेता सांगेल तो विषय ट्रेंड होतो. 

कळपात राहायचं की आभासी कम्युनिटींमधून प्रत्यक्ष समाजाकडं डोळे उघडून पाहायचं, हे ‘तनिष्क’च्या वादानं जरूर शिकवलंय. सोशल मीडिया वापरताना हा धडा कायम लक्षात ठेवण्यासारखा आहे. कारण, आजच्या काळात कम्युनिटींचे प्रयोग सोशल मीडियावर प्रत्येक क्‍लिकमागे दडलेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com